Friday, March 13, 2026

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा

Share

पंढरपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्यनारायण रौद्ररूप धारण करू लागले आहेत. पंढरपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला उकाड्यापासून त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘चंदन उटी’ पूजा गुढीपाडव्यापासून सुरू होईल.

मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा ७ जून रोजी मृग नक्षत्र निघेपर्यंत दररोज दुपारी ४ वाजता केली जाईल. यासाठी लागणारे शुद्ध चंदन प्रतिवर्षी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथून खास मागवले जाते. सहाणेवर चंदन उगाळण्यासाठी रोज साडेतीन ते चार तास लागतात. या थंडगार चंदनाचा लेप मूर्तींना लावल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिकच सात्विक आणि मनमोहक दिसते.

यंदाच्या वर्षी विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी २१ हजार रुपये, तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी ९ हजार रुपये देणगी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. केवळ बाह्य उपचारच नव्हे, तर देवाला थंडावा मिळावा म्हणून नैवेद्यातही बदल केला जातो. यामध्ये गायीच्या तुपातील गोडाचा शिरा, पोहे, वाटली डाळ, सुकामेवा यांसह कैरीचे पन्हे आणि लिंबू सरबत यांचा विशेष नैवेद्य दाखवण्यात येतो.

उन्हाळ्याच्या या चार महिन्यात होणारी ही सेवा पाहण्यासाठी आणि विठ्ठलाचे शीतल रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने पंढरीत दाखल होत आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख