Sunday, September 8, 2024

माझी शपथ आहे तुम्हाला! पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना विनंती, म्हणाल्या…

Share

बीड : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा बीड लोसभा मतदार संघात (Beed Lok Sabha Constituency) निसटता पराभव झाला. शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे जिल्ह्यात तणावग्रस्त वातावरण आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. राज्यात लोकसभा निकालानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ प्रसिद्ध करत आपल्या समर्थकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, नमस्कार काय बोलू, मी तुमच्या सगळ्यांशी हे कळत नाही. मी आवाहन केले, माझं आवाहन तुमच्या दु:खाच्या, नैराश्याच्या पलीकडे ते आवाहन पोहोचत नाही की काय, असं दिसत नाही. गेल्या काही दिवसांत ज्या तरुणांनी आत्महत्या केल्यात, त्यामुळे माझ्याइतकं कोणी खचलं नसेल. मी अहमदपूरमधल्या त्या तरुणाच्या आईशी बोलले, ज्या दिवशी हि घटना घडली ती माऊली म्हणाली की, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा तुमच्यावर खूप जीव होता. इतकं प्रेम याला मला शब्द मला सापडत नाहीत. कदाचित तुम्ही माझ्यावर अघोरी प्रेम करताय. प्रत्येकक्षणी एक-एक कर्ज माझ्यावर चढवत आहात.

तुम्ही मला पाहिलंय, गेली 20-22 वर्षात, मुंडे साहेबांसारख्या पहाडासारख्या नेत्याला मी भावनिक होताना आणि खचतांना पाहिलेलं आहे. मी त्यांना आधार दिला. मी त्यांना आधार देण्याइतकी मोठी नाही. पण मी आधार द्यायचा भाव आणला, कारण त्यांना वाटायला नको की, आपल्याला मुलगी आहे आणि ती खूप कोमल आहे. नाही बाबा, मी खूप कठीण आहे, कर्मठ आहे, मी तुमच्यासाठी लढायला मागे-पुढे पाहणार नाही. ४ जूनला मुंडेसाहेब गेले तो दिवस आठवा, दगडं पडत होती सगळ्यांच्या डोक्यावर, पण मी धावत जाऊन माईक हातात घेतला, जीवाची पर्वा केली नाही. कोणाचाही विचार केला नाही, विचार केला समाज चेंगरेल, अनेक जीव जातील, याचा केला. तेव्हा मी तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ दिली, ती शपथ तुम्ही पाळली. आता जे काही झालं ते तुमच्या जीवाला लागलं आहे, पण तुम्ही असं जिव्हारी लावून घेणार असाल आणि अशा रस्त्यावर जाणार असाल तर , माझी शक्ती बनण्यापेक्षा असं पाऊल उचलणार असाल तर मला पुढचं राजकीय पाऊल उचलताना मला प्रश्न पडतो.

कारण माझ्या राजकारणात स्वार्थ नाही, मला स्वतःसाठी काही पाहिजे म्हणून मी काही करत नाही. माझं आजपर्यंतचं राजकारण उद्देशाचं होतं, जेव्हा पद मिळालं तेव्हा गरिबांसाठी काम केलं, जेंव्हा नाही मिळालं तेव्हा ती गोष्ट हसतखेळत सकरात्मकतेनी झेलली. हे राजकारण आहे, राजकारणात अशी वेळ येत असते. मला माहितीये आतापर्यंतच्या इतिहासात थेटपणे एखाद्या व्यक्तीला, वर्णाला हीन लेखून प्रचार झाला नाही, ते तुमच्या मनाला लागलाय, जिव्हारी लागलं आहे, हे मला माहिती आहे. आपल्याला वंचितांचा आवाज बनायचं आहे, आपल्याला त्या सगळ्यांना ताकदी देणारी फौज बनायचं आहे. असं जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, मग मी कसं काम करु, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुमच्याकडे यायलेय, पण माझा पायच उचलत नाही, सांत्वनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी येत आहे. कृपा करुन माझी शपथ आहे तुम्हाला, मी साहेबांची शपथ घालून पाहिली, पण स्वत:च्या जीवाला काही करु घेऊ नका.

अन्य लेख

संबंधित लेख