Wednesday, October 23, 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप २९ पदकांसह भारत १६ व्या स्थानी

Share

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे. भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकं मिळवून  स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची  नोंद केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नवदीप सिंगनं काल सुवर्णपदक मिळवलं. इराणच्या खेळाडूनं प्रथम क्रमांक पटकावला होता, मात्र अयोग्य वर्तनासाठी त्याला अपात्र ठरवण्यात आल्यानं नवदीपला सुवर्णपदकाचा मान मिळाला.

धावपटू सिमरन शर्मानं महिलांच्या २०० मीटर ट्रॅक स्पर्धेत कास्यपदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी काल प्रवीण कुमार आणि होकातो होतोझे सेमा या पदक विजेत्या खेळाडूशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांची प्रशंसा केली.

वयाच्या ४०व्या वर्षी आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कास्य पदक पटकावणाऱ्या होकातो होतोझे सेमा याचं त्यांनी अभिनंदन केलं. दरम्यान, पॅरिसहून परतलेल्या पॅरालिम्पिक खेळाडूंचा नवी दिल्लीत केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला. यामध्ये अवनी लेखरा, मनीष नरवाल, प्रणव सूरमा, मोना अग्रवाल, रुबिना फ्रान्सिस आणि राकेश कुमार यांचा समावेश होता.

अन्य लेख

संबंधित लेख