Tuesday, September 22, 2026

कर्मातींच्या करामती पवित्र मक्केत हातघाई

Share

नुकतेच येमेनच्या हुती (Houthi) बंडखोरांनी  सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवर… सौदीतील अमेरिकन लष्करी तळांवर… तुफानी हल्ले केले…

सोबतच सौदी अरेबियाने मक्का शहरावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा केला आहे… मात्र हुती बंडखोरांनी हा आरोप फेटाळून लावला आहे…

१५ सप्टेंबर २०२६ रोजी मक्का शहराच्या दिशेने जाणारे एक ड्रोन सौदी अरेबियाच्या संरक्षण यंत्रणेने मक्काजवळ पाडले… मक्काची सुरक्षा ही आमच्यासाठी ‘रेड लाइन’ (अंतिम सीमा) असल्याचे सौदीने म्हटले आहे…

हुती प्रवक्त्याने मक्का किंवा इतर पवित्र स्थळांना लक्ष्य केल्याचा इन्कार केला आहे. आमचे हल्ले केवळ लष्करी तळे आणि तेल प्रकल्पांवर आहेत, पवित्र स्थळांवर नाही, असे त्यांनी

स्पष्ट केले…

मक्केसारख्या मुसलमानांच्या अत्यंत पवित्र स्थळावर हल्ला झाल्याचा दावा सौदी अरेबियाने केल्यामुळे संबंध इस्लामी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे…

मात्र हा काही मक्केवरचा पहिला हल्ला नाही…

इ.स. ९३० मध्ये कर्माती (Qarmatian) लोकांनी मक्केवर केलेले भीषण आक्रमण ही इस्लामिक इतिहासातील अत्यंत विनाशकारी आणि धक्कादायक घटना मानली जाते…

कर्माती हे शिया मुस्लीमांतील इस्माईली (Isma’ili) उपपंथाचे (विशेषतः सेव्हनर इस्माईली / Seveners शाखेचे) आहेत…

कर्माती ही ९ व्या ते ११ व्या शतकात इराक आणि पूर्व अरेबिया (बहरीन) या भागात विस्तारलेली एक अतिरेकी, गुप्तता पाळणारी, गूढवादी आणि क्रांतिकारी चळवळ होती… ‘हम्दान कर्मात’ (Hamdan Qarmat) या नेत्याने या पंथाची पायाभरणी केली, ज्यावरून त्यांना ‘कर्माती’ हे नाव मिळाले…

त्यांनी अब्बासी खिलाफतीविरुद्ध बंड पुकारले होते… फातिमीद खलिफांच्या इमाम असण्याच्या दाव्याला नकार दिला होता…

आणि मोहम्मद बिन इस्माईल हेच शेवटचे इमाम (मेहदी) म्हणून परत येतील असा त्यांचा विश्वास होता…

कर्मातींचे मक्केवरील हे आक्रमण कर्माती लोकांचा शासक अबू ताहीर अल-जन्नाबी याच्या नेतृत्वाखाली झाले होते…

११ जानेवारी ९३० रोजी, म्हणजेच पवित्र हज यात्रेच्या काळात कर्माती सैन्याने मक्केवर अचानक हल्ला केला…

अबू ताहीरच्या सैन्याने मक्केत प्रवेश करून काबाभोवती परिक्रमा (तवाफ) करणाऱ्या निष्पाप यात्रेकरूंची क्रूरपणे कत्तल सुरू केली… या आक्रमणात सुमारे ३०,००० पेक्षा जास्त यात्रेकरू व स्थानिक रहिवासी मारले गेले…

कर्माती सैन्याने मृतांचे पार्थिव पवित्र झमझम विहिरीमध्ये (Well of Zamzam) फेकून दिले आणि विहीर मृतदेहांनी भरून टाकली… त्यामुळे मक्केतील पवित्रतेचा मोठा अपमान झाला…

त्यांनी काबा मशिदीचे सोन्याचे दरवाजे, मौल्यवान पडदे (किसवाह) आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या… या आक्रमणातील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे कर्माती लोकांनी काबामध्ये असलेला अत्यंत पवित्र ‘हजर-ए-अस्वद’ (Black Stone) उपटून काढला आणि त्याचे तुकडे केले… अबू ताहीर हा दगड आपल्यासोबत बहारीन (हाजर) येथे घेऊन गेला…

हा पवित्र दगडाला परत मिळवण्यासाठी अब्बासी खिलाफतीला मोठी किंमत मोजावी लागली… तब्बल २२ वर्षांनंतर (इ.स. ९५२ मध्ये) अब्बासी (Abbasid) खलिफांकडून (त्याकाळी)  ५०,००० दिनार (काही ऐतिहासिक नोंदीनुसार अत्यंत मोठी खंडणी किंवा ‘हँडसम सम’) वसूल करून नंतर… कर्माती नेत्याच्या भावाने एका पत्रासह हा दगड कुफा (इराक) येथील एका मशिदीत गोणीत गुंडाळून फेकला होता… त्यावर लिहिले होते: “आम्ही एका आदेशानुसार हा दगड नेला होता आणि आता आदेशानुसारच तो परत आणला आहे.”

दगडाचे तुकडे झालेले असल्यामुळे, मक्केतील कारागिरांनी आणि शासकांनी ते तुकडे एकत्र जोडले… चांदीच्या चौकटीत आणि खास रासायनिक लेप (डांबर, मेण आणि सुगंधी द्रव्यांचे मिश्रण) वापरून हे तुकडे एकत्र बांधून पुन्हा काबाच्या पूर्वेकडील कोपऱ्यात सुरक्षितपणे बसवले…

कर्माती आक्रमकांनी मक्केवर हा भयंकर हल्ला केला कारण… त्यांचा मक्केच्या हज यात्रेला तीव्र विरोध होता… त्यांच्या मते, काबा (Kaaba) आणि हजच्या विधींमध्ये केली जाणारी प्रार्थना ही एक प्रकारची ‘मूर्तीपूजा’ किंवा अंधश्रद्धा होती…

कर्माती लोकांचा असा विश्वास होता की… एका नव्या ‘महदी’ (तारणहार किंवा मसिहा) चे आगमन होणार आहे, जो इस्लामचे जुने नियम संपवून एका नवीन युगाची सुरुवात करेल…

मक्केवरील या आक्रमणाद्वारे त्यांना संपूर्ण इस्लामिक जगताशी असलेले संबंध तोडून टाकायचे होते, जेणेकरून महदीच्या आगमनाचा मार्ग मोकळा होईल…

तसेच कर्माती लोकांचे बगदादच्या अब्बासी खिलाफतीशी तीव्र राजकीय आणि धार्मिक वैर होते… मक्केसारख्या पवित्र शहराचे रक्षण करण्यात अब्बासी राजे कसे अपयशी ठरत आहेत, हे दाखवून देऊन त्यांचा राजकीय प्रभाव आणि प्रतिष्ठा पूर्णपणे नष्ट करणे हा या हल्ल्याचा एक मोठा उद्देश होता…

कर्माती लोक अनेकदा हज यात्रेकरूंच्या ताफ्यांवर दरोडे टाकत असत…

इ.स. १०६७ ते १०७७ च्या सुमारास अंतर्गत कलह, लष्करी पराभव आणि इतर मुस्लिम राजवटींच्या दबावामुळे कर्मातींचे राज्य आणि त्यांची धार्मिक विचारधारा पूर्णपणे नष्ट झाली…

कर्माती जमात आज नामशेष झालेली असली तरीही आपल्याकडचा “करामती” हा शब्द बहुधा याच कर्माती मंडळी वरून आला असावा… त्यामुळे शब्दरूपाने आजही ते आपल्याकडे जिवंत आहेत असे म्हणता येईल…

मात्र या क्रूर घटनेमुळे संपूर्ण मुस्लिम जगतात तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले गेले होते आणि यामुळे अनेक वर्षे हज यात्रेवर देखील विपरीत परिणाम झाला होता…

त्यामुळे मक्केवरील हुतींनी केलेला कथित हल्ला हा मक्केवरचा पहिलाच हल्ला नाही… आणि विशेष म्हणजे आजपर्यंतइस्लाम जगतासाठी पवित्र असलेल्या मक्केमदीनेवर झालेले सगळे हल्ले हे कोणत्याहीकाफीराने अर्थात गैरव मुस्लिमांनी केलेले नसून… सगळे हल्ले हे इस्लाम पंथीयांनीच केलेले आहेत…

अन्य लेख

संबंधित लेख