Thursday, August 14, 2025

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

Share

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम या महोत्सवांमुळे होत आहे.


प्रत्यक्ष शेती न करता किंवा कोणतीही निगा वगैरे न राखता ज्या भाज्या उगवतात, त्यांना रानभाज्या किंवा वनभाज्या म्हटले जाते. निसर्गात त्या उगवतात आणि त्यांची मुद्दामहून लागवड न करताही पावसाळ्याच्या दरम्यान या भाज्या येतात. या रानभाज्या मुख्यतः शेतांच्या बांधांवर आणि रानात किंवा जंगलात उगवतात. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे वर्षातून एकदा म्हणजे पावसाळ्यात त्या आवर्जून खाल्ल्या जातात. या भाज्यांचे महत्त्व ओळखून कृषी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या रानभाज्यांची ओळख मुख्यतः शहरी नागरिकांना व्हावी, तसेच शहरांबरोबरच जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील आताच्या पिढीलाही या भाज्याची ओळख नाही, त्यांनाही ही ओळख व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांपासून राज्यात चांगले प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘रानभाज्या महोत्सव’ हे याच प्रयत्नांचे एक ठळक उदाहरण.


बारीपाड्याची ‘वन भाजी स्पर्धा’रानभाज्या महोत्सव ही संकल्पना राज्यात चांगली रुजत आहे. या भाज्यांचे महत्त्व ओळखून त्यांची माहिती लोकांसमोर आणण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाडा येथे गेल्या तब्बल वीस वर्षांपासून सुरू आहे. बारीपाड्याचे ज्यांनी शब्दशः नंदनवन बनवले त्या चैत्राम पवार यांनी सन २००३ मध्ये बारीपाड्यात ‘वन भाजी स्पर्धा’ सुरू केली. चैत्राम पवार यांनी १९९२ पासून बारीपाड्यासाठी जे अथक कष्ट घेतले आणि जे परिवर्तन त्यांनी तेथे करून दाखवले त्यासाठी त्यांना यंदा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बारीपाड्यात त्यांनी सुरू केलेल्या ‘वन भाजी स्पर्धे’ला आता खूप मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. 


बारीपाड्यात जनजाती बांधवांच्या सर्वांगीण परिवर्तनाचे जे काम सुरू झाले होते ते पाहण्यासाठी डॉ. शैलेश शुक्ल कॅनडातून सन २००३ मध्ये बारीपाड्यात आले होते. ते पीएच. डी. करण्यासाठी आले होते. संशोधन करताना त्यांच्या लक्षात आले की इथल्या आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, पण ते लिखित स्वरूपात नसल्याने ते हळूहळू नष्ट होत चालले आहे. हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जाऊ शकते का, ही सर्व माहिती आपण लिखित स्वरूपात कशी आणू शकू, असा विचार चैत्राम पवार यांनी केला आणि त्यातून २००३ मध्ये ‘वन भाजी स्पर्धा’ या उपक्रमाची सुरुवात झाली. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महोत्सवात महिलांचा सहभाग १०० टक्के असतो. महोत्सवासाठी जंगलात जाऊन महिला भाज्या शोधतात. त्या घरी आणून शिजवून चांगल्या पद्धतीने भाज्या तयार करतात. कार्यक्रमात आणून त्या भाज्या त्या स्वतः दाखवतात. त्यांची माहिती जमलेल्या लोकांना सांगतात. अगदी व्यासपीठावर जाऊन सुद्धा त्या धीटपणाने या भाज्यांबाबत सगळी माहिती देतात. हा महोत्सव पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी खूप मोठ्या संख्येने शहरांमधील नागरिक बारीपाड्याला भेट देतात. हे महिला सक्षमीकरणाचे एक चांगले उदाहरण आहे, असे चैत्राम पवार आवर्जून सांगतात.

पहिल्या वर्षी जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा सहभागी महिलांची संख्या अगदी कमी होती. त्यांनी करून आणलेल्या भाज्यांची ताटे त्यांनी दाखवली, कोणीतरी परीक्षण केले आणि कार्यक्रम संपला. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला आणि आता परिसरातील तीस ते पसतीस गावांमधून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या तीनशे पर्यंत असते. स्पर्धक महिलांना प्रत्येक भाजीबद्दल वेगवेगळे प्रश्न परीक्षक विचारतात. त्यातून गुण देऊन नंतर विजेत्यांची निवड केली जाते. लोकसहभागामुळेच हा उपक्रम यशस्वी होत आहे, असेही चैत्राम पवार सांगतात.


राज्य शासनाच्या ‘आत्मा’ या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या आणि कृषी विभागाच्या वतीने या महिन्यात बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्येही रानभाज्या महोत्सव आयोजित केला जात आहे. हा महोत्सव म्हणजे शेतकरी, वनवासी आणि महिला बचत गटांना त्यांच्याकडील रानभाज्या थेट शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. या महोत्सवाला शहरी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या भाज्यांची माहिती घेण्यासाठी तसेच त्या खरेदी करण्यासाठी देखील लोक उत्साहाने येतात आणि त्यातून उत्पन्नाचे एक साधनही विकसित होते, असा अनुभव आहे.

हा सांस्कृतिक वारसानिसर्गाच्या कुशीत आपोआप उगवणाऱ्या रानभाज्या या आपल्या पारंपरिक आहारशैलीचा, आरोग्यविषयक स्थानिक ज्ञानाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. या वनस्पतींबाबतचे ज्ञान, त्याचा वापर आणि औषधी गुणधर्म स्थानिक लोकांनी पिढ्यानपिढ्या जपले आहेत. आता ते नव्या पिढीपर्यंत पोचवणे ही काळाची गरज आहे. शहरीकरणाच्या लाटेत विस्मरणात चाललेल्या या हरित वारशाच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र जनुकीय पेढी’ यांनीही ‘रानभाजी संवर्धन प्रकल्प’ हाती घेतला आहे.


पारंपरिक ज्ञान
महाराष्ट्रातील कोरकू, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली यांसारख्या वनवासी जमातींसाठी या वनस्पती केवळ अन्न नसून, त्यांचे पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा एक अमूल्य ठेवा आहेत. हे ज्ञान पिढ्यानपिढ्या, कोणत्याही लिखित स्वरूपाशिवाय, केवळ मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाले आहे. ऋतुमानानुसार कोणत्या भाज्या उपलब्ध होतात, त्या कशा ओळखाव्यात, त्यांचे औषधी उपयोग काय आहेत आणि त्या कशा शिजवाव्यात, याचे सखोल ज्ञान या जनजाती बांधवांकडे आहे. हे पारंपरिक ज्ञान केवळ रानभाज्यांची ओळख करून देणारे नाही, तर त्यामध्ये निसर्गाचा शाश्वत उपयोग कसा करावा याची सखोल समज दडलेली आहे. उदाहरणार्थ, अनेक रानभाज्या फुलण्यापूर्वीच तोडल्या जातात, कारण फुले आल्यावर त्यात कडवटपणा वाढवणारी नैसर्गिक रसायने निर्माण होतात. भाजीसाठी कोवळी, टोकाची पानेच निवडली जातात, जेणेकरून वनस्पतीची वाढही चालू राहते आणि चवही टिकते. ही पद्धत म्हणजे एक अनौपचारिक संवर्धन तंत्र आहे, जे अनेक पिढ्यांनी अनुभवातून विकसित केले आहे. काही भाज्या विशिष्ट सणांना, धार्मिक कार्यांमध्ये वापरल्या जातात. त्यामागे केवळ आहार नव्हे, तर निसर्गाविषयी असलेला आदर आणि श्रद्धाभाव आहे.  

राज्यात सर्व ठिकाणी होत असलेल्या या उपक्रमातून वनवासी बांधवांचा केवळ आर्थिक फायदाच होतो असे नाही, तर या भाज्यांचे महत्त्व, त्यांच्या पाककृती आणि औषधी उपयोग याबद्दलची माहिती लोकांपर्य़ंत पोहोचते. लोकांशी थेट संवाद साधता येतो. त्यातून शेतीला एक पूरक आणि शाश्वत रोजगाराचा पर्याय उपलब्ध होत आहे, जो विशेषतः अल्पभूधारक आणि भूमिहीन कुटुंबांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो. अशाप्रकारे, शेताच्या बांधावर दुर्लक्षित राहिलेला हा बहुमूल्य ठेवा आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक ठरत आहे.

बारीपाड्यातील वन भाजी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या तीनशेच्या पुढे गेली आहे.बारीपाड्यातील स्पर्धेत गेल्या वर्षी ज्या भगिनीने प्रथम क्रमांक मिळवला तिने दीडशेहून अधिक वनभाज्या आणल्या होत्या.परिसरातील तीस ते पस्तीस गावांमधील महिलांचा स्पर्धेत सहभाग.

अन्य लेख

संबंधित लेख