महाराष्ट्रातील राजकीय धुरंदर, चाणक्य , वगैरे …अशा मीडियाने पुरस्कृत केलेल्या अनेक उपमा आणि बिरुदे मिरवणाऱ्या महान व्यक्तिमत्वाने एक भविष्यवाणी उच्चारली आहे. ती म्हणजे भविष्यात महाराष्ट्राचा मणिपूर होवू घातला आहे.
या भविष्यवेधी नेत्याला भूतकाळाचे वावडे आहे त्यामुळे भूतकाळातील आपली , आपल्या पूर्वजांची , आपल्या राजकीय विचाराची आणि संस्कृतीची पापे लीलया ते विसरतात आणि जनतेला गृहीत धरून विसरण्यासाठी बाध्य करतात. यासाठी त्यांनी एक छान ecosystem पे रोल वर ठेवली आहे. पारितंत्र विकसित केले आहे. पण त्यांना भूतकाळाची आठवण करून देणे आवश्यक आहे.
१९४८ साली ३० जानेवारीला एक दुर्दैवी क्रूर घटना घडली . महात्मा गांधी यांचा खून झाला. तो करणारा महाराष्ट्रातील होता. तो एका विशिष्ट जातीतील होता. त्या जातीचे असंख्य लोक गांधीजी यांचे अनुयायी होते. गांधीजी यांचा विचार प्रसारित करणारे , त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सत्याग्रह करणारे होते. दुसरीकडे फाळणीच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदू समाज विशेषतः बहुजन समाज हा हिंदुत्वाच्या विचाराने भारलेला होता.
त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाला हिंदुत्ववादी बहुजन समाज काँग्रेसकडे वळवण्याची एक चांगली संधी साधून आली. महाराष्ट्राने मग एक जातीय ध्रुवीकरण पाहिले . दंगली घडवून आणल्या गेल्या. एका विशिष्ट जातीला लक्ष केले गेले. गावोगावी जाळपोळ लुटालूट करून संपन्न कुटुंबे देशोधडीला लावली गेली . काय गुन्हा होता त्यांचा? कोण पेटवत होते ह्या दंगली ? भालजी पेंढारकर यांचा स्टुडिओ यात वाचला नाही. त्यावेळी महाराष्ट्र मणिपूर झाला होता ना ? आज हे आमचे जाणते नेते ज्या विचाराचा वारसा सांगतात त्याच विचाराने महाराष्ट्र जाळण्याचे आणि जातीय विद्वेष आणि ध्रुवीकरण निर्माण केल्याचे पाप केले ते स्वीकारणार आहेत का ?
ज्या माणसाने आयुष्यभर हिंसात्मक कृत्याला विरोध केला , ज्यांच्या अनुयायांनी अहिंसेची जपमाळ हिंदू पाकिस्तानातून विस्थापित होत असताना ओढली त्या महापुरुषाला अशी हिंसायुक्त श्रद्धांजली वाहणारे कोणते राजकीय विचार घेवून पुढे सामाजिक जीवनात वावरत होते हे सांगण्याची आवश्यकता नाही. एका विशिष्ट जातीला राजकीय , आर्थिक , सामाजिक पटलावरून बाजूला टाकत दुसऱ्या बाजूने हिंदू विचार घेवून काम करणाऱ्या बहुजन समाजातील पुढील पिढ्या मूठभर पुढाऱ्यांच्या चाकरी करतील आणि हिंदू विचारापासून दूर जातील ही व्यवस्था करणारे नेते कोण ? याचे उत्तर महाराष्ट्राला देण्याची हिंमत असेल तर महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची भाषा या महाभागांनी करावी. दुर्दैवाने असे प्रश्न विचारण्याची हिंमत चाय, बिस्कीट वाल्यांची नाही.
त्यावेळी मानसिक आघात झालेला हिंदू समाज जोडण्यात ५० वर्षे गेली. पण तुम्ही हे घडणे राजकीय दृष्ट्या सोयीचे नसल्याने जेम्स लेन प्रकरण उकरले . स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांना आणि अन्य इतिहास कार बदनाम करून कोकाटे , इंद्रजित सावंत गँग उभी केली . हे पाप करून पुन्हा तुम्ही मणिपूर होण्याची धमकी देत आहात !
१९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेंव्हा पण दंगलीचे जे राजकारण झाले त्याला जबाबदार कोण ? मणिपूर बद्दल मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या मंडळींचे राजकीय पूर्वज तेंव्हा मोठ्या वृक्षाच्या कोसळल्याने होणारे धरणीकंपाचे तत्त्वज्ञान पाजळत होते. आपल्या मेहनतीने महाराष्ट्रात भरभराटीला आलेला आमचे शीख बंधू याची जाळपोळ करून , लूट करून त्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल ही भाषा न बोललेली बरी.
१९९३ चा बॉम्ब स्फोट झाला . तो ज्यांनी घडवला त्या देशद्रोही माणसाबरोबर कुणाचे संबंध होते हे आम्ही सांगायची गरज नाही. ते तत्कालीन काँग्रेस नेते , माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेवून सांगितले होते. त्यावर पुढे प्रचंड वादळ उठले आणि नेहमीप्रमाणे यांच्या इकोसिस्टीम ने नाईकांना राजकीय दृष्ट्या संपवले. महाराष्ट्राचा मणिपूर त्यावेळीं झाला होता आणि बॉम्ब स्फोट घडवून आणणाऱ्या बरोबर आर्थिक भागीदारी करणारे जे कोणी होते त्यांचे , तुमचे संबंध काय होते ? ह्या प्रश्नांची उत्तरे विचारण्याची हिम्मत चाय, बिस्कीट वाल्यांची नाही ! त्यावेळी आणखी एक स्फोट झाल्याची लोणकढी थाप मारून नंतर त्याची निर्लज्ज कबुली देणारी माणसे महाराष्ट्र मणिपूर होईल असे म्हणतात तेंव्हा यांची कातडी कुठल्या प्रकारची आहेत असा प्रश्न पडतो .
२६/११ प्रकरण घडले . क्रूरपणे मुंबईत लोक मारले गेले. कसाबसा कसाब पकडला. पण हिंदू दहशतवाद हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी साध्वी प्रज्ञा , कर्नल पुरोहित यांना एटीएस यंत्रणेचा गैरवापर करून ज्यांनी स्वतःचे राजकारण साधण्याचा प्रयत्न केला त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे म्हणण्याचा कुठलाही अधिकार नाही.
मणिपूरचा प्रश्न सर्वस्वी वेगळा आहे. त्यासाठी पूर्ण पूर्वांचल समस्या समजून घ्यावी लागेल. विघटन वादी शक्तींना तेथे स्वातंत्र्यानंतर कुणी पोसले ? कुणी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोकळे रान दिले ? आसामच्या , नागालँड, अरुणाचल प्रदेशातील भारतीयांना दैवाच्या हवाली सोडणारे पंतप्रधान कोण ? याची उत्तरे आधी द्या आणि मग महाराष्ट्राचा मणिपूर होतो का याची काळजी करा.
ज्या संघ विचाराला तुम्ही कायम पाण्यात पाहिले त्यांनी संपूर्ण पूर्वांचल अनेक तपस्वी कार्यकर्त्यांच्या बळावर टिकवून ठेवला आहे. आग लावण्यासाठी काही लागत नाही ती विझवण्यासाठी कित्येक पिढ्यांना झिजावे लागते. वेळोवेळी महाराष्ट्रात आगी तुम्ही लावल्या आणि आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही धमक्या देत हिंडत आहात.
ज्या महाराष्ट्रातील दोन गटा बद्दल तुम्ही हे बोलत आहात हे दोन्ही गट नाचवण्याचे काम तुमचे. हिंदूंचे मताचे विघटन आणि मुस्लिमांचे मतांचे एकत्रीकरण हाच तुमच्या राजकरणाचा पाया आहे. बारामतीचे मतदान होई पर्यंत मराठा आरक्षण विषयावर गप्प बसायचे आणि मग बीडला जावून मराठा आरक्षणावर प्रवचन झोडायचे ! सारे काही मतांसाठी !
नाशिक मध्ये जावून शेतकऱ्यांचे कैवारी बनायचे , प्रवचने झोडायचे आणि बारामतीत अडाणीला घेवून फिरायचे. अंबानींच्या लग्नात हजर व्हायचे. अरे देश सर्वांनी मिळून उभा करायचा आहे . शेतकरी आणि कारखानदार मिळून हा देश उभा राहणार आहे . पण याना असल्या सम्यक विचाराचे वावडे आहे. सोयीस्कर विचार मांडायचे , मतांची बेगमी करत पुढील कित्येक पिढ्यांना पोसायचे मग महाराष्ट्र मणिपूर झाला काय किंवा जम्मू काश्मीर याना काही घेणे नाही.
मराठा समाज अस्वस्थ आहे , उध्वस्त आहे तो तुमच्यासारख्या सत्ताभोगी लोकांच्या काही घराण्यात सत्ता एकवटण्याच्या वृत्तीने. पैशाने गब्बर झालेल्या तुमच्या पिढ्यामागुन पिढ्या सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचे शोषण करत आल्या आहेत आणि जेंव्हा ,जेंव्हा ही जनता आपसातील भेद विसरून तुमच्या विरुद्ध उभी राहिली तेंव्हा, तेंव्हा तुम्ही त्याला जातीय वणव्यात फेकून देण्याचे पाप केले आहे.
अठरा पगड आणि बारा बलुतेदार याना घेवून स्वराज्य स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांचे विचार आणि कार्य विकृत धर्मनिरपेक्षतेच्या दावणीला बांधण्याचे काम ज्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात झाले ते आज मणिपूर होण्याची धमकी किंवा सूचना देत आहेत हा मोठा दैव दुर्विलास म्हणावा लागेल.
निवडणुका येतील . जय पराजय होतील . सत्ता इकडे तिकडे होईल पण इतिहासाने आम्हाला काय म्हणून ओळखावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण इतिहास हा वर्तमानातील समाज घडवत असतो आणि त्यातूनच भविष्य आकार घेतं असते. आजच्या वर्तमानातील महाराष्ट्रीय जनतेला कळकळीचे आवाहन आहे आगलाव्या पुढाऱ्यांच्या पासून सावध व्हा! छत्रपतींचा इतिहास आठवा. महाराष्ट्राचा मंगल कलश आणला म्हणणारे आणि त्यांचे वारसदार अमंगल विचाराची पेरणी करून मतांची पोळी भाजत आहे. आम्हला शेती , उद्योग , ज्ञान , शिक्षण याने बहरलेला महाराष्ट्र उभा करायचा आहे आणि त्यात अडसर निर्माण होणाऱ्या गल्लोगल्ली पासून मुंबई , दिल्ली पुढाऱ्यांना बाजूला ठेवण्याची गरज आहे.
सुज्ञ जनता योग्य विचार करेल अशी आशा आहे.
रवींद्र मुळे.
अहिल्यानगर.