नागपूर : काही रुढीवादी लोकांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथा पाण्यात बुडविल्या, मात्र संत जगनाडे महाराज यांनीच त्या गाथा वाचवून तुकाराम महाराजांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य विकास विभागांतर्गत रामदासपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार रामदास तडस अतिथी म्हणून उपस्थित होते.
भक्ती संप्रदाय, वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारकरी संप्रदायाने उच्च-नीच भाव संपवून अवघा महाराष्ट्र एक केला. या मालिकेत संत जगनाडे महाराज यांचे कार्य अतिशय मोठे आहे. समाजातील मनुष्यता जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महापुरुषांची नावे देण्याच्या उपक्रमाचीही मुखमंत्र्यांनी प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या विद्यार्थिनींनी यावेळी लेझीम नृत्य सादर केले. संत जगनाडे महाराज यांच्या वेशभूषेत सर्वांचे सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.