Wednesday, December 31, 2025

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

Share

९ ऑगस्ट १९६८ रोजी नरेपार्क मैदानावरील सभेत बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उपस्थित कामगार विश्‍वातील एका वेगळ्या तत्वन्यानाच्या श्‍वासाने भरलेली पहिली मराठमोळी तुतारी फुंकली गेली आणि… मुंबईच्या हिंदुस्थानाच्या कामगार चळवळीत भारतीय कामगार सेना नामक एक बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला… शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेना प्रमुखांची मुख्य शिकवण या विचारावर आधारित मराठी माणसाची आपली हक्काची ही कामगार सेना होती… भारतीय कामगार सेनेचा विषय निघाला की प्रत्येक वेळी… हे बिनडोक भाजपवाले भारतीय मजदूर संघ नावाच्या कोणत्यातरी कधीच न ऐकलेल्या कामगार संघटनेच्या लाखातल्या सदस्य संख्येची टीमकी वाजवतात… (भारतीय कामगार सेना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतात साजरा केल्या जाणाऱ्या १ मे या दिवशी कामगार दिन पाळते… पण हा तर कम्युनिस्टांचा आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे म्हणून आमची टर उडवणाऱ्या फडतूस भाजपवाल्यांना… तो महाराष्ट्र दिन आहे तो तुम्हाला दिसत नाही का?… असा रोखठोक सवाल विचारून मी त्यांची थोबाडे बंद करतो)…

साल होतं १९६९… कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून आंदोलन पेटलं होतं… तेव्हाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार होते… माहिमच्या नाक्यावर त्यांची गाडी थांबवली जाण्याची शक्यता होती… सीमावासीयांकडून त्यांना एक निवेदन दिले जाणार होते… त्यानंतर ते तिथून निघून जाणार होते… पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं… मोरारजी देसाई आले आणि बेगुमानपणाने त्यांची गाडी निघून गेली… त्यांच्या ताफ्यातील पायलट कारने तेथे उपस्थित असलेल्या लोकांना उडवलं आणि त्या निघून गेल्या… त्यामध्ये अनेकजण जखमी झाले… काहीजणांच्या अंगावर गाडीची चाकं गेली आणि अचानक दगडफेक सुरू झाली… अश्रुधुराचा मारा सुरू झाला आणि त्याच रात्री शिवसेनाप्रमुखांना अटक झाली…

पुढचे सलग ३ महिने साहेब आणि शिवसेनेचे आणखी नेते पुण्यातील येरवडा तुरुंगात होते… अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली… अनेक महिने मुंबई जळत होती… अनेक प्रयत्न केले गेले… मुंबईत आर्मी आणण्याचे प्रयत्न केले पण “तुरुंगातून शिवसेनाप्रमुखांनी आवाहन केल्यानंतर एका क्षणात मुंबई शांत झाली”…

महाराष्ट्रावर इतके निःस्सीम प्रेम करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी शिवसैनिक असल्याच्या भावनेने माझी छाती अभिमानाने फुलून गेली…

पण अजून महाराष्ट्राची विधानसभा शिवसेनेसाठी दूरच होती… मात्र आई भवानीच्या कृपेने तीही संधी चालून आली…

५ जून १९७० च्या मध्यरात्री… लालबाग परळचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला… या हल्ल्यात कॉम्रेड कृष्णा देसाई यांचे निधन झाले… पोटनिवडणूक जाहीर झाली…

कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या विधवा पत्नी श्रीमती सरोजिनी देसाई यांना उमेदवारी देण्यात आली… त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस सह १३ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला…

शिवसेनेने वामनराव महाडिक या आपल्या बिनीच्या शिवसैनिकाला पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले… साहेबांनी संपूर्ण मुंबईतील शिवसैनिकांना प्रचारासाठी परळ लालबाग मतदार संघात उतरवले होते… संपूर्ण परळ लालबाग अक्षरशः भगव्या रंगाने न्हाऊन निघाले होते…

भारतीय जनसंघ नावाच्या एकमेव राजकीय पक्षाने शिवसेनेच्या वामनराव महाडिक यांना पाठिंबा दिला… आणि हो… अगदी नगण्य असलेल्या हिंदू महासभेने सुद्धा… यात त्यांच्या शिवसेनेविषयी असलेल्या प्रेमापेक्षा देशद्रोही कम्युनिस्टांच्या द्वेषाचा भाग जास्त असावा…

या पोटनिवडणुकीत “उगवता सूर्य” ही निशाणी घेऊन वामनराव महाडिक यांना निसटता विजय मिळाला पण त्याचबरोबर शिवसेनेला आपला पहिला आमदार मिळाला हे ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले… (आज मागे वळून पाहिले असता… त्याच “पणती” निशाणी असलेल्या भारतीय जनसंघाचे भारतीय जनता पक्षात रूपांतर झाले… म्हणजे ही कमळाबाईची गोचीड आम्हाला ७० सालीच येऊन चिकटली होती तर…)

(याच भारतीय जनसंघाचे मुकुंद आगास्कर नावाचे उमेदवार कल्याणहून तीन चार वेळा पडले होते… आणि परत निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा शेवटी शिवसैनिकांनी भिंतीवर…

मुकुंदा मुकुंदा पडणार तरी कितींदा
एकदा,दोनदा,तीनदा,पडणं हाच तुझा धंदा…

अशी चारोळी रंगवली होती… असा किस्सा मला एका जुन्या शिवसैनिकाने सांगितला तेव्हा काही केल्या मला हसू आवरेना…)…

माझ्या एकंदर माहितीप्रमाणे कम्युनिस्ट पक्ष हा एक नंबरचा देशद्रोही पक्ष… मुंबईच्या गिरण गावात या पक्षाने चांगली पकड बसवली होती… त्यामुळे कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचे मला फारसे वाईट वाटले नाही… कारण कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर मुंबईतील कम्युनिस्ट पक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला…

पण कॉम्रेड कृष्णा देसाई खून खटल्यात… १४ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झालेले… विश्वनाथ (बाळा) खटाटे, भाई हाटे आणि अशोक कुलकर्णी हे तीनही आरोपी शिवसैनिक होते हे ऐकून माझी छाती अभिमानाने फुलून आली… केरळमध्ये जिंकल्यानंतर हुरळून गेलेले कम्युनिस्ट “परळचा केरळ” करायला निघाले होते… पण आमच्या साहेबांनी त्यांना आव्हान दिलं… “परळ भगवा करून दाखवतो” म्हणून… आणि शेवटी साहेबांनी परत भगवा करून दाखवलाच… याचा मला आजही अभिमान आहे…

कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खुनात आमच्या साहेबांचे पण नाव आले होते पण त्यांच्या केसालादेखील धक्का लागला नाही… कारण त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा वरदहस्त साहेबांच्या डोक्यावर होता म्हणे… (हा इतिहास कळला तेव्हा मला शिवसेनेला “वसंत सेना” म्हणून विरोधक का हिणवतात याचे गुपीत उलगडले…)

साहेबांनी कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खुनात आपला आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता असे बऱ्याच वेळा जाहीरपणे सांगितले… तरीच चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षा कमी होऊन लवकर सुटलेल्या या तीनही आरोपींनी तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर शिवसेना सोडली… शिवसेना सोडली तरी मला त्यांचा राग आला नाही… कारण ते शिवसैनिक नव्हतेच… साहेबांचा खरा शिवसैनिक जीव गेला तरी शिवसेना सोडणारा नव्हता… हे कसले शिवसैनिक?… असेच माझ्या मनाने घेतले…

आणि मग १९७१ साली मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक झाली… दादरहून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले बाळासाहेबांचे फॅमिली डॉक्टर… डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांना साहेबांनी मुंबईचे महापौर म्हणून निवडून आणले… शिवसेनेला आपला पहिला पुरस्कृत महापौर मिळाला होता…

मात्र पुढे १९७७ मध्ये महापौरपदासाठीच सोहनसिंग कोहली या समाजवादी कार्यकर्त्यास पाठिंबा देण्याचा शब्द बाळासाहेबांनी अचानक फिरवला असा दावा डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी केला… त्यावेळी काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्या पाठीशी शिवसेना उभी करण्याचा निर्णय साहेबांनी घेतला होता… त्याच क्षणी डॉ. गुप्ते यांनी शिवसेनेला रामराम ठोकला… पुढे याच डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर विधानसभेला मनोहर जोशी यांचा पराभव केला होता…

ज्या डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांना साहेबांनी अर्थात शिवसेनेने… मुंबईसारख्या महानगरीचे महापौर केले त्यांनी साहेबांची साथ सोडावी… हे मला खूप खटकले… पण हा माणूस अपक्ष म्हणून निवडून आला होता… तो शिवसैनिक नव्हताच… मग जाईनात का… अशीच माझी धारणा झाली…

शिवसेनेत साहेबांनी जात पात कधीच मानली नाही… साहेबांना प्राणप्रिय होता तो मराठी माणूस… आणि त्यांचा शिवसैनिक… त्यामुळे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते हे साहेबांच्याच जातीचे… चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) असल्यामुळे साहेबांनी त्यांना महापौर केले असल्या वाह्यात आरोपांकडे मी ढुंकुनही पाहिले नाही… डॉक्टर हेमचंद्र गुप्ते मराठी होते… बस्स… त्यांना महापौर करण्यासाठी हा एकच धागा पुरेसा होता… पण साहेबांची निवड थोडीशी चुकली असे मला राहून राहून वाटू लागले… पण बाहेरून चांगला दिसणारा नारळ पोटातून कुचका निघणारच नाही याची खात्री कोण देऊ शकेल?…

१० ऑगस्ट १९७१ रोजी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थी सेनेचे उद्घाटन पार पडले… यावेळी साहेबांनी विद्यार्थांनी राजकारणापासून दूर राहावे, असे म्हणणाऱ्यांचा खूप समाचार घेतला… विद्यार्थांनी राजकारणात फार तर प्रत्यक्ष भाग घेऊ नये, पण त्याचं निरीक्षण आणि अभ्यास जरूर केला पाहिजे… ज्यांना उद्या या राष्ट्राची धुरा सांभाळायची आहे, त्यांनी राजकारणाबद्दल अज्ञानी राहून चालणार नाही, असे सडेतोड विचार साहेबांनी मांडले…

१९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमोद नवलकर गिरगाव मतदार संघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले… हा इतिहास समजल्यावर पांढरपेशा समाजात शिवसेनेला मिळालेली मान्यता मला सुखावून गेली… पुढे याच प्रमोद नवलकरांनी १९८६ ते २००६ अशी तब्बल २० वर्षे मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जाऊन शिवसेना हा सुशिक्षित तसेच विद्याविभूषित जनमानसाचा देखील पक्ष असल्याचे सबंध महाराष्ट्राला दाखवून दिले… कारण तोपर्यंत शिवसेना म्हणजे गुडघ्यात मेंदू असलेल्या आक्रमक तरुणांचा पक्ष (मुंबईच्या भाषेत मवाल्यांचा) असा बऱ्याच जणांचा (गैर)समज झाला होता…

१९७३ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत… रिपब्लिकन (गवई गट) पक्षाशी युती करून शिवसेनेने बाजी मारली होती… यावेळी शिवसेनेला आपला स्वतःचा महापौर मिळाला… सुधीरभाऊ जोशी… मात्र सुधीरभाऊ निवडून येण्यासाठी जी काही थोडी मते कमी पडत होती की साहेबांनी “मुस्लिम लीग”च्या नगरसेवकांची मिळवली हे ऐकून माझे मन थोडे खट्टू झाले होते… पण प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं… साहेबांवर माझं नितांत प्रेम होतं आणि महापौर पदाची निवडणूक हे युद्धच होतं त्यामुळे… अर्थात साहेबांना माफ करणारा मी कोण?… अशाप्रकारे मी आपल्या मनाला समजावले…

मात्र परमेश्वरी कृपेने आमच्या भगव्याची मुस्लिम लीगशी झालेली युती इथेच संपली…

आणि मग १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला साहेबांनी समर्थन दिलं होतं… साहेब इंदिराबाईला घाबरले असे विरोधक आम्हाला चिडवायचे… पण त्यात काहीही अर्थ नव्हता… आणीबाणी हे खरोखर “अनुशासन पर्व” होते… तो काळच असा होता की देशाला आणीबाणीची आवश्यकता होती… म्हणून आपण आणीबाणीला पाठिंबा दिला होता… इंदिरा गांधींचे “दमदार नेता” म्हणून साहेबांनी कौतुकही केले होते… साहेबांची कालानुरूप घेतलेली ही भूमिका योग्यच होती…

कारण त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची लाट आली… त्यांची सत्ता आली तरी… साहेबांनी काँग्रेसला असलेला आपला पाठिंबा कायम ठेवला होता…

अगदी १९७७ साली शिवसेनेनं काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबईमहापालिकेच्या महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता…

या काळात बॅरिस्टर रजनी पटेल हे काँग्रेसचे नेते होते… आणि समाजवाद्यांचे नेते होते शांती पटेल… शिवसैनिकांनी भिंतीवर घोषणा रंगवल्या होत्या… काँग्रेसचा रजनी पटेल समाजवाद्यांचा शांती पटेल मराठी माणसाला कसं बरं पटेल?…

ही घोषणा वाचून मुंबईचा मराठी माणूस मनातल्या मनात खूप आनंदी होत असे… शिवसैनिकांच्या कल्पकतेला तोड नव्हती…

अगदी याच काळात… १९ जून १९७७ रोजी शिवाजी पार्कला शिवसैनिकांच्या हक्काचे “शिवसेना भवन” बांधून पूर्ण झाले… पक्षाच्या स्थापनेनंतर अकरा वर्षांनी पै पै गोळा करून हे टोलेजंग सेनाभवन बांधण्यात आले…

आणि मग आलेल्या १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाला निवडणूक आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलं होतं… साहेबांच्या कल्पकतेप्रमाणे प्रचाराची सुरुवात रेल्वे इंजिनची पूजा करत करण्यात आली… मुंबईतील कोकणी माणसाचं वर्चस्व पाहता प्रचारात कोकण रेल्वेला शिवसेनेचं इंजिन अशी साद घालण्यात आली होती… पण तेव्हा जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेचं रेल्वे इंजिन धावू शकलं नाही…

मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ करण्याची मागणी दलित संघटनांकडून सुरू झाली होती… हे आंदोलन १६ वर्षे चालले आणि या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार आणि दंगली झाल्या… त्यात अनेक दलितांचे बळी गेले…

१९७८ च्या सुमारास शिवसेना प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित होती आणि तिचे मराठवाड्यात संघटन नव्हते… त्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नामांतराला उघडपणे विरोध केला होता… काही अहवालानुसार, दलित वस्त्या जाळण्यात आल्या आणि दलितांवर हल्ले करण्यात आले होते त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील कथितरित्या सामील होते… हा इतिहास कळल्यावर मी मनातल्या मनात थोडा खट्टू झालो होतो… मराठवाडा ही आपला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आपलेच आहेत… अशी भूमिका साहेबांनी घ्यायला हवी होती असे माझ्या मनाला चाटून गेले… पुढे २०११ मध्ये साहेबांनी आपण नामांतराला कधीच विरोध केला नसल्याचा दावा केला… केवळ ‘मराठवाडा’ हे नाव कायम राहावे अशी आपली इच्छा होती असे म्हटले… तेव्हा मी समाधानाचा खूप मोठा सुस्कारा सोडला होता…

… आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून इथला पुढचा सारा इतिहास मला आजही लख्ख आठवतो आहे…

पुढे १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आल्या आणि पंतप्रधान झाल्या… तेव्हा साहेबांचा निर्णय किती अचूक होता याची साक्ष जगाला पटली…

(क्रमश:)

-तुमचाच
बाळसाहेबांचा शिवसैनिक

अन्य लेख

संबंधित लेख