Tuesday, September 17, 2024

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

Share

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड, यामुळे यंदा १२ हजार ८०० गटांना ३२० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. वार्षिक १२ टक्के व्याजदराने महिला बचतगटांना कर्ज दिले जाणार असून आतापर्यंत बचतगटांकडे एक रुपयांचीही थकबाकी नाही.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचतगटांची चळवळ जिल्हाभर पसरविली आहे. किमान दहा गरजू महिला एकत्रित येऊन बचतगट स्थापन करू शकतात. सध्या बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अडीच लाख महिला दरमहा अंदाजे पाच कोटी रुपयांची बचत करतात. खास बाब म्हणजे आतापर्यंत महिला बचतगटांनी घेतलेले कोणत्याही बॅंकेचे कर्ज थकलेले नाही. त्यामुळे बॅंकांकडून पहिल्या कर्जाची परतफेड झाल्यानंतर लगेचच दुसरे कर्ज दिले जात आहे.

पहिल्या, दुसऱ्यावेळी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड झाल्यानंतर लगेचच बॅंकांकडून जादा कर्ज दिले जाते. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत हे बचतगट चालविले जातात. गरजू महिलांच्या बचतगटांना वेळेत बॅंकांकडून कर्ज मिळावे म्हणून दोन्ही कार्यालयांकडून विशेष प्रयत्न केले जातात. कमी व्याजदराने मिळालेल्या या कर्जामुळे अनेक महिलांच्या मुलींचा विवाह, मुला-मुलींचे शिक्षण यासह कौटुंबिक अडचणींवर मात करता आल्याचीही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात बचतगट असल्याने शासनाकडून यंदा जिल्ह्यात केवळ ५० नवीन गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख