Wednesday, July 9, 2025

मराठी अस्मितेचा सन्मान! मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर; केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Share

नवी दिल्ली : मराठी (Marathi) भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे! केंद्रीय गृहमंत्रालयाने मराठी भाषेतून प्राप्त होणाऱ्या पत्रांना यापुढे मराठी भाषेतूनच उत्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली, ज्यामुळे मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, मराठीसह तामिळ भाषेतील पत्रांनाही त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, केंद्र सरकारने प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे मराठी भाषेचा सन्मान आणि वापर वाढण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा निर्णय मराठी माणसाच्या सांस्कृतिक आणि भाषिक अभिमानाला बळ देणारा असून, केंद्र सरकारच्या भाषिक समावेशकतेच्या धोरणाचे ते प्रतिबिंब आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी भाषा वाद वरून राजकीय वातावरण तापलेले आहे. ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा वाद अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत असताना, केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेला हा निर्णय महायुती सरकारला मोठा दिलासा देणारा मानला जात आहे.

डॉ. दिनेश शर्मा म्हणाले की, राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे, हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणे यासाठी काम करत आहे. सध्या गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होत आहे, मात्र यापुढे मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल. तसेच तामिळ भाषेतील पत्रांना तामिळमधूनच उत्तर दिले जाईल.’

केंद्रातील भाजप सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो. मराठी भाषिक मतदारांमध्ये, विशेषतः मुंबई आणि पुणे सारख्या शहरी भागांमध्ये, या निर्णयामुळे सकारात्मक संदेश जाईल. सरकार ‘मराठी माणसाच्या’ भावनांचा आदर करते, असा प्रचार करण्यास त्यांना मदत मिळेल.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले आभार

समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की, मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदाने स्वागत करतो आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.

अन्य लेख

संबंधित लेख