Saturday, March 7, 2026

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Share

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचे ‘सीमोल्लंघन’
उन्मेश पाटील यांच्यासोबत केवळ उबाठा गटाचेच नव्हे, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यामध्ये, पंचायत समितीचे माजी सभापती, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, भाजपचे माजी सभापती लीलाभाई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चौधरी, भाजपचे माजी नगरसेवक चंदू तायडे, माजी नगरसेवक चिरागउद्दीन शेख, माजी नगरसेवक गणेश महाले, दिपक देशमुख, सुबोध वाघमारे, गवळी समाजाचे प्रमुख विजू गवळी, ओबीसी समाजाचे संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, अनिल चव्हाण, रोहीत खैरनार, मंगेश साबळे, सोमनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, योगेश मोरे, राजेंद्र सोनावणे, महादेव गायकवाड, विलास गवळी, सुनिता पवार, रत्ना पाटील यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

‘जे बोलतो, ते करून दाखवतो’ – एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीचे औचित्य साधत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “अर्थसंकल्पात आम्ही शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करून निवडणुकीवेळी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने पूर्ण केले. जे बोलतो ते करुन दाखवणारी शिवसेना आहे. शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, त्यामुळेच दररोज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होत आहेत. प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली, आणि माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे असल्याचे याप्रसंगी आवर्जून नमूद केले.”

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या पक्षप्रवेशाचे फोटो शेअर करत उन्मेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशाच्या वेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील आणि सुनील चौधरी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख