कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या सार्धशताब्दीनिमित्त या गीताचे सामूहिक गायन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ हा एक मंत्र असून देशवासियांसाठी ती ऊर्जा, स्वप्न आणि संकल्प असल्याचे सांगितले. या गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’मधील ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरक स्थान आहे. ब्रिटीशविरोधी क्रांतीची लाट या गीताने देशात निर्माण केली. चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून उमटलेला हा राष्ट्रभक्तीचा नाद आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो.”
पंतप्रधानांच्या संबोधनानंतर सभागृहात संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींच्या साथीने ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी सभागृह ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.