नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढविण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भात एकमत झाले असून, मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये युतीसाठी पक्षस्तरावर समित्या तयार केल्या जाणार आहेत.
रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माझ्यामध्ये संयुक्त बैठक झाली. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापालिका निवडणुका महायुतीमध्येच लढवण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या जनहिताच्या व विकासाच्या योजना जनतेपर्यंत सकारात्मकरीत्या पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती म्हणून लढताना आगामी रणनीती आखण्यासाठी काही पद्धती विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांमध्ये युतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी पक्ष स्तरावर समित्या तयार करण्यात येतील. “महानगरपालिका निवडणूकांमधील जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येईल,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. महायुतीबाबत आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते वेळोवेळी घेतील.
महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गट), आरपीआय (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) आणि अन्य घटकपक्षांचाही समावेश आहे. जानेवारीमध्ये महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, तर जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.