नागपूर : “भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाची परिस्थिती पाहिली तर भारतात सांस्कृतिक ऐक्य होते, पण राजकीय ऐक्य नव्हते, त्यामुळे सर्व लोकांना एका माळेमध्ये गुंफण्यांचे काम आपल्या संविधानाने केले. संविधान सभेत प्रत्येक अधिनियमावर उहापोह झाला, एक एक मुद्दयावर चर्चा झाली आणि त्यातून हे संविधान तयार करण्यात आले. त्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आपले संविधानाचे महत्त्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, देशाच्या संसदेत संविधानाच्या गौरवाची चर्चा झाली आणि तशीच चर्चा महाराष्ट्राच्या विधान मंडळात देखील झाली. त्यातूनच संविधानाचे विविध पैलू जनतेसमोर मांडण्याचे प्रयत्न करण्यात आले,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केलेल्या विधानसभेतील भाषणावर आधारित ‘भारतीय संविधान – गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन येथे प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करत असताना सर्वाधिक प्राधान्य भारतीय मुल्यांना दिले. ज्यात श्रीमद् भगवद् गीता, रामायण, महाभारत, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्या सर्व विचार मुल्यांना संविधानामध्ये आणण्याचे काम केले. या मुल्यांमुळेच लोकशाही प्रगल्भ झाली मात्र शेजारील देशांमध्ये लोकशाही खंडित झाली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारताच्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समानतेची संधी दिली. समतेच्या राज्याची संकल्पना मांडली. जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग या सगळ्या भेदांना फक्त एक दस्तऐवज संपवू शकते हे आपल्या संविधानाने दाखवून दिले. तसेच संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेमुळे कोणीही उन्मत्त होऊ शकत नाही, कोणीही सत्ता स्वतःकडे केंद्रित करू शकत नाही. आपल्या देशाचे संविधान हे साधे आणि सोपे आहे, हेच समजवण्याचा प्रयत्न भाषणात झाला आणि आता पुस्तकाच्या माध्यमातून ही होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या पुस्तक प्रकाशनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळ व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.