Sunday, December 14, 2025

‘सामना’चा अग्रलेख द्वेष, भ्रम आणि राजकीय अपयश झाकणारा! भाजपचा थेट हल्ला; “देवाभाऊ मुंबईला ‘गती’ देतात, उद्धवजी फक्त ‘रडगाणं’ गातात!”

Share

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘सामना’ वृत्तपत्रातून महायुती आणि भाजपवर मराठी माणसाच्या प्रश्नावरून करण्यात आलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ‘सामना’चा अग्रलेख तथ्यांवर आधारित नसून, केवळ ‘द्वेष, भ्रम आणि राजकीय अपप्रचारावर’ आधारित असल्याचा आरोप केला आहे.

‘तुम्हीच केले मराठी माणसाला बेघर’

नवनाथ बन यांनी ठाकरे गटावर टीका करताना त्यांच्या महापालिकेतील सत्तेच्या काळात मराठी माणसाला सर्वाधिक त्रास झाल्याचा दावा केला.

“आजवर मराठी माणसाला घर, रोजगार, प्रतिष्ठा नाकारण्याचं काम कोणी केलं असेल, तर महापालिकेत तुमची सत्ता असताना झालं. भाजप-महायुती सरकारच्या काळात नाही. बीएमसीचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला, पण कारवाई नाही… मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप तुम्ही केलं.”

महायुतीच्या कामांमुळे मुंबईला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठी माणसाला न्याय देणारी ठोस कामे केली, असे बन यांनी स्पष्ट केले.

“मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीने बीडीडी चाळीत मराठी माणसाला परवडणाऱ्या दरात हक्काची घरं मिळाली. पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावले. मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू झाले.”

‘सामना’तून रडगाणं आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न

‘मराठी अभिमानावर’ काय केले? “मराठी अभिमानावर अग्रलेख लिहणाऱ्यांनी काय केलं? एकही मोठा गृहनिर्माण सुधारणा कायदा नाही. एकही रखडलेला प्रकल्प मार्गी लागला नाही,” अश्या तीव्र शब्दांत नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका केली आहे.

‘मराठी माणूस विरुद्ध अमराठी’ अशी कृत्रिम फूट पाडून स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईतील गृहनिर्माण धोरणं, पुनर्विकास योजना, पागडी प्रणालीतील सुधारणा या सगळ्या निर्णयांचा उद्देश सामान्य मुंबईकर आणि मराठी माणूसाला न्याय देण्याचाच आहे. मराठी माणसाच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या काळात मराठी तरुणांसाठी काय केलं, याचा हिशेब द्यावा.

बन यांनी शेवटी उपरोधिकपणे म्हटले की, आज मुंबईच्या विकासाला गती मिळतेय, मराठी तरुणांना संधी मिळतेय, हक्काचं घर मिळतंय आणि म्हणूनच काहींना ते असह्य झालं आहे. “मुंबईला गती देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) देतात, आणि उद्धवजी फक्त ‘सामना’तून रडगाणं गातात! हे मुंबईकरांनी ओळखलं आहे. मराठी माणसाच्या हिताची खरी लढाई शब्दांच्या आड लपून नाही, तर ठोस कामातून लढली जाते, असा स्पष्ट संदेश भाजपने या माध्यमातून ठाकरे गटाला दिला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख