Friday, December 19, 2025

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

Share

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे.

संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी शेलारांना “आशिष कुरेशी” आणि “मुंबईला लागलेली बुरशी” असे संबोधले. इतकेच नव्हे तर, शेलार हे बोगस मतदानातून निवडून आलेले “झोलार” आहेत, अशी जहरी टीका देशपांडे यांनी केली होती. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती.

भाजपचे नवनाथ बन यांचे ‘सडेतोड’ उत्तर

संदीप देशपांडे यांच्या या टीकेला भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी कवितेच्याच माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी देशपांडे यांच्या नावातील ‘संदीप’ (अर्थ: दिवा/प्रकाश) शब्दाचा वापर करून त्यांच्यावर निशाणा साधला.

नवनाथ बन यांची कविता

स्वतःला नेते म्हणवता, शब्दांमध्ये फक्त विखार,
भूमिका नाही, विचार नाही नाव ‘संदीप’, पण अंधार फार!

जनतेतून निवडून आलेल्या नेतृत्वाला झोलार म्हणणं सोपं असतं,
पण निवडणूक जिंकण्याइतकी पात्रता मिळवणं तितकंच कठीण असतं.

मुंबई शब्दांवर नाही, कामावर आपला विश्वास ठेवते,
म्हणूनच ‘सुपारी’ नव्हे, कर्तृत्वालाच जनता निवडून देते.

मुंबई कुणाची? मायबाप जनता ठरवते,
फक्त ‘बडबडी’नं नाही तर मतांनीच सरकार बनते!

‘सुपारी’ विरुद्ध ‘कर्तृत्व’

नवनाथ बन यांनी देशपांडे यांच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवताना म्हटले की, मुंबईची जनता ही ‘सुपारी’ घेऊन काम करणाऱ्यांना ओळखते. “मुंबई शब्दांवर नाही तर कामावर विश्वास ठेवते, म्हणूनच कर्तृत्वाला जनता निवडून देते,” असे म्हणत त्यांनी संदीप देशपांडे यांना त्यांची निवडणूक जिंकण्याची पात्रता किती, असा अप्रत्यक्ष सवालही विचारला आहे. “मुंबई कुणाची? हे जनताच ठरवेल, केवळ बडबडीने सरकार बनत नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख