
महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे आम्हाला राज्यसभेत खासदार निवडून देण्याची सुसंधी लाभली होती… जुलै १९९८ मध्ये शिवसेनेकडून प्रीतीश नंदी राज्यसभेवर निवडून गेले… प्रीतीश नंदी यांचा टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड विकली या इंग्रजी वृत्तपत्र समूहांशी असलेल्या संबंधांमुळे आणि त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे… रेम्या डोक्याचे भाजपवाले त्यांना “ब्रिटिश नंदी” म्हणून “ते मराठी बोलतात का?” असे खवचटपणे मला विचारायचे?… त्यावर हे तुमच्या बुद्धी बाहेरचे आहे असे सांगून मी त्यांना उडवून लावायचो…
पण पुढे ऑटो रायडर्सचे मुकेश पटेल, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील राम जेठमलानी, व्हिडिओकॉनचे राजकुमार धूत शिवसेनेकडून राज्यसभेवर निवडून जाऊ लागले आणि भक्तगणांच्या टोमण्यांना ऊत आला… राम जेठमलानी यांनी कृष्णा देसाई खून खटल्यात शिवसैनिकांची बाजू मांडली होती आणि त्यांना फाशी होऊ दिली नव्हती… त्या उपकाराचे हे एका अर्थी ऋणमोचन होते…
बाकीची नावे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी आयुष्यभर नररत्ने गोळा केली… तसेच आमचे साहेब करताहेत असे मार्मिक आणि खोचदार उत्तर मी देत असे… (तरीपण भक्तांचे कायम एकच तुणतुणे चालू असायचे… मातोश्रीवर पेट्या पोचल्या असणार… अरे बिनडोकांनो… काहीतरी नवीन आरोप करा…)

पण १९९९ च्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत आमचे १५ वाघ तर आमच्यामुळे भाजपचे १३ खासदार निवडून आले.
केंद्रात शिवसेनेचे कॅबिनेट आणि राज्यमंत्री रुबाबात खाती आपापली सांभाळू लागले… केंद्रातील मंत्रिपदामुळे शिवसेनेचा बोलबाला सबंध देशात होऊ लागला… सुरेश प्रभू अनंत गीतेंपासून आनंदराव अडसुळांपर्यंत सगळे मंत्री शिवसेनेचा डंका चौफेर वाजवू लागले… आमच्या साहेबांच्या शब्दावर वाजपेयी सरकार डोलत होते…

मात्र त्यानंतर १९९९ सालीच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुर्दैवाने युतीची सत्ता गेली… १६१ जागा लढवून आमच्या ६९ वाघांनी डरकाळी फोडली तर कमळाबाईच्या ११७ पैकी ५६ उमेदवारांना आम्ही विजय मिळवून दिला… मोठ्या भावाचे कर्तव्य आम्ही चोखपणे बजावले… पण धाकट्या भावाने कधी त्याची कदर केली नाही ही आमची कायमची सल आहे…
काहीही असो… पण युतीची सत्ता गेली एव्हढं खरं… काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले…
या निवडणुकीत साहेबांचा करिष्मा कमी पडला की मराठी माणसाने आमच्याशी गद्दारी केली हेच मला कळेना… साहेबांचा करिष्मा कमी होणे शक्यच नव्हते त्यामुळे मराठी मतदारच नमकहराम निघाला अशी माझी खात्री पटली…

पण याच दरम्यान शिवसेनेला एक सर्वोच्च सन्मान आणि ओळख मिळाली… लोकसभेचे सभापती बालयोगी यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात दुदैवी निधन झाले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी सर लोकसभेचे सभापती झाले… शिवसेनेचा डंका त्रिखंडात वाजू लागला…

याच काळात शिवसेनेमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली… साहेबांचे थोरले सुपुत्र उद्धवजी ठाकरे यांनी आपली राजकीय कारकीर्द २००२ मध्ये बृहन मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे प्रचार प्रभारी म्हणून सुरू केली… या निवडणुकीत शिवसेनेचे ९७ नगरसेवक त्यांनी निवडून आणले… (आधीच्या सभागृहात तुमचे १०३ नगरसेवक होते… उद्धव ठाकरेंनी प्रचार केला आणि त्यातले ६ कमी झाले या अधूमेंदूच्या भक्ताडांच्या तर्काला… उद्धव साहेबांचा हा पहिलाच प्रयत्न असूनही त्यांनी दैदीप्यमान यश मिळवले हे बिनतोड उत्तर मी देत असे…)

२००२ च्या गोधरा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर… भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याचा निर्णय जवळपास घेतला होता पण आमच्या साहेबांनी वाजपेयी अडवाणींना… “मोदी गया तो समझो गुजरात गया” म्हणून सज्जड दम भरला आणि मोदीजींची खुर्ची वाचली… पण आज मोदीजी बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे हे उपकार विसरले आहेत… इतिहास त्यांना माफ करणार नाही…

जानेवारी २००३ मध्ये उद्धव साहेबांची… शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात बाळासाहेबांच्या अनुमतीने आणि राजसाहेब ठाकरे यांच्या अनुमोदनाने शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. वाघाच्या पोटी वाघच जन्माला येणार या न्यायाने उद्धव साहेब ठाकरे ही ठाकरे घराण्याची पुढची पिढी आता आमचे नेतृत्व करायला सज्ज होत होती… शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे नवे वारे वाहत होते…

पण २००४ सालापासून शिवसेनेच्या चढत्या यशाला कोणाची तरी दृष्ट लागली…
सत्ता म्हणून आणि पक्ष म्हणून आमची साडेसाती सुरू झाली… तो कोण अपशकुनी होतात तेच आम्हाला कळेना…
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अल्पमतात आली… अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार गेले आणि सत्ताही गेली… काँग्रेसचे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले… मात्र जन्माने विदेशी महिला असलेल्या सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी साहेबांनी केलेला कडाडून विरोध आम्हा शिवसैनिकांना आणि देशातील जनतेला सुद्धा चांगलाच भावला होता…
या निवडणुकीत आम्ही भाजपचे १३ खासदार निवडून आणले पण आमचे मात्र १२ च वाघ जिंकले… पण मोठा भाऊ म्हणून आमचा रुबाब कायम होता… आमचा एक खासदार कमी निवडून आला म्हणून काय झाले…? आम्ही त्यांचे १३ खासदार निवडून आणले होते… राज्यात मोठा भाऊ आम्हीच होतो…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आमची युती काकणभर सरसच ठरली होती त्यामुळे… दिल्लीतली सत्ता गेली तरी महाराष्ट्रातील सत्ता आम्ही खेचून आणू असा आम्हाला विश्वास होता… पण दैवाचे फासे उलट पडले…
त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत… १६३ जागा लढवून आमचे ६२ आमदार तर १११ जागा लढवून भाजपचे ५४ आमदारांनी निवडून आणले… मात्र बहुमत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला मिळाले आणि आमची घोर निराशा झाली… आमच्यासाठी दळभद्री कमळाबाई असून नसल्यासारखी होती…
या निराशेतून शिवसैनिक बाहेर यायच्या आत एकापाठोपाठ एक बसलेल्या धक्क्यांमुळे आम्ही अजूनच निराशेच्या गर्तेत जाऊ लागलो…
याच काळात एका मुलाखतीत बाळासाहेबांनी… “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही… होते आहे असे लक्षात आले तर मी माझी शिवसेना बंद करीन… आज जो तुम्हाला मान सन्मान मिळतो आहे तो… हिंदुत्वामुळे, भगव्या झेंड्यामुळे एवढे लक्षात ठेवा… शिवसेनेत कोणतीही लोकशाही नाही… ऑर्डर इज ऑर्डर…” म्हणून ठणकावून सांगितले होते…

आमचे कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे उजवे हात आणि त्यांना साहेबांनी मुख्यमंत्री बनवले ते… नारायण राणे उर्फ दादा यांनी जुलै २००५ मध्ये साहेबांच्या डोळ्यादेखत आमच्या १० आमदारांना सोबत घेऊन शिवसेना सोडली… त्यांनी ४ जुलै २००५ रोजी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला… नंतर लगेचच ऑगस्ट २००५ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला…
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तरीही त्यांनी साहेबांबद्दल कधीही एक वावगा शब्द उच्चारला नाही… शिवसैनिक कसा असावा याबाबतीत ते आदर्श होते… त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी पटेनासे झाले होते असे ते सांगायचे… साहेबांनी जर उद्धवजींची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली असेल तर त्यांच्याशी पटवून घ्यावेच लागेल… ही आम्हा शिवसैनिकांची ठाम धारणा होती… वाघाशी पटतं पण वाघाच्या बछड्याशी पटत नाही… ऐसा कैसा चलेगा नारायणराव?… “पटत नाही” या सबबीखाली तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसच्या वळचणीला गेलात की नाही? खरं सांगा नारायणराव… असाच सवाल प्रत्येक शिवसैनिक त्यांना विचारत होता… पुढच्या काळात त्यांची कोंबडी चोर, दीड फुट्या म्हणून शिवसैनिकांनी उडवलेली टर ही… आम्ही आमच्या परीने आत्मसात केलेली साहेबांची “ठाकरी शैली” होती…
पण कोंबडी चोराचे पक्षातून बाहेर पडणे… शिवसेनेला जबर दणका होता एवढे खरे… आम्ही शिवसैनिक आतून हादरलो होतो… महाराष्ट्रात युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री जोशी सरांची १ वर्ष आधीच गच्छंती करून बाळासाहेबांनी या कोंबडी चोराला मुख्यमंत्री केला होता… त्याचे पांग याने असे फेडले होते…

कोंबडी चोराच्या धक्क्यातून आम्ही सावरतो न सावरतो तोच… मार्च २००६ मध्ये…
ज्याला साहेबांनी अंगाखांद्यावर खेळवला होता… जो पक्षात साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता… ज्याने स्वतः उद्धव साहेबांचे कार्याध्यक्ष म्हणून नाव सुचवले होते… ते राजसाहेब शिवसेना सोडून बाहेर पडले…
सोबत बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार, राम कदम, प्रवीण दरेकर यांच्यासारखे एकापेक्षा एक बिनीचे शिवसैनिक घेऊन बाहेर पडले… पण ही केवळ पक्षातील फूट नव्हती तर ठाकरे कुटुंबातील फाटाफूट होती आणि ती आम्हां शिवसैनिकांच्या भयंकर जिव्हारी लागली…
राजसाहेबांनी ” महाराष्ट्र नवनिर्माण सेना” नावाचा नवा पक्ष काढला… नव्या पक्षाच्या नावात “सेना” होतीच… निशाणी घेतली होती रेल्वेचे इंजिन… म्हणजे एकेकाळी शिवसेना ज्या निवडणूक चिन्हावर आपले उमेदवार अपक्ष म्हणून लढवत असे तेच रेल्वे इंजिन… प्रत्येक ठिकाणी त्यांना आमच्या सेनेची पुण्याई हवी होती… हा होता आमच्या साहेबांचा आणि सेनेचा करिष्मा… भगवा सोडून त्यांनी एक नवा चट्टेरीपट्टेरी रंगीबेरंगी झेंडा घेतला… आम्ही तो झेंडा बघून जाम हसलो होतो… “जय मनसे दे दोनशे” ही त्यांच्या खंडणीखोर मनसे सैनिकांची ओळख आणि औकात सांगताना आमची हसून हसून मुरकुंडी वळायची… आम्ही एकमेकांना टाळ्या द्यायचो…
पण उद्धव साहेबांशी न जमल्यामुळे मी पक्ष सोडत आहे या राजसाहेबांच्या आरोपाने आम्ही भयंकर व्यथित झालो होतो… विठ्ठल काय बडवे काय… अरे दळभद्र्यांनो, जमत नाही म्हणजे काय?… शिवसेनेत राहायचं आहे तर उद्धव साहेबांची जमून घ्यावंच लागेल… बाळासाहेबांची निवड आहे ती… शिवसेनेत तुमची आवड निवड चालणार नाही… असा आमचा स्पष्ट पवित्र होता… राहिले ते मावळे गेले ते कावळे… गेले उडत…
मात्र कालपर्यंत जे आमच्या मांडीला मांडी लावून बसत होते ते मनसे सैनिक आज शत्रूसारखे वागू लागले… त्यांच्या मनात वैराची भावना होती… प्रत्येक ठिकाणी आपण शिवसेनेपेक्षा वरचढ आहोत हे दाखवण्याची ईर्षा होती… पण ते कसं शक्य होतं?… शेवटी आमचे साहेब ते साहेब आणि शिवसेना ती शिवसेना…
दुपारी १२ वाजता उठणारे पक्षप्रमुख आम्हाला कशी टक्कर देऊ शकणार होते?… असा आमचा साधा सोपा सरळ हिशोब होता…

पण पुढच्याच वर्षी २००७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा एकदा “महापौर आमचाच” झाला… आम्हाला ८३ जागा मिळाल्या… (गेल्या वेळेपेक्षा १३ कमी असे म्हणणारे अडाणी भाजपवाले… आपल्या ७ जागा कमी झाल्या आहे कधीच सांगत नाहीत…) मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले… पण आमचे १७ नगरसेवक पाडण्याचे काम मात्र त्यांनी चोखपणे बजावले… महापौरपदी शिवसैनिक बसवण्यासाठी आम्हाला कमळाबाईचा पदर धरावा लागला याचे अतोनात दुःख झाले… पण युती असल्यामुळे कमळाबाईला आमच्या मागोमाग फरफटत यावे लागले… शेवटी “मुंबई आमचीच” याच्यावर मात्र शिक्कामोर्तब झाले…

त्यातच २००७ सालीच… राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली… भाजपप्रणित आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून भैरोसिंह शेखावत हे उमेदवार असताना देखील… केवळ मराठीच्या मुद्द्यावर साहेबांनी काँग्रेस प्रणित यूपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना मतदान करण्याचे आदेश शिवसेनेच्या खासदारांना आणि आमदारांना दिले… साहेबांच्या मराठी माणसावरच्या खऱ्याखुऱ्या आत्मियतेमुळे आम्ही भारावून गेलो होतो ….
त्यावेळी शिवसेनेने भैरोसिंह शेखावत यांना मते न दिल्याचा राग अजूनही भक्ताडांच्या मनात आहे… काहीच नाही तर म्हणे… मातोश्रीवर पेट्या पोचल्या असणार… असले थर्ड क्लास शेरे मारतात… अरे कोण कुठला राजस्थानचा भैरोसिंह शेखावत… प्रतिभाताई पाटलां सारखा शत-प्रतिशत मराठी उमेदवार असताना शिवसेनेने मराठी बाणा बाळगायचा की युतीधर्म…? आमच्यासाठी मराठी बाणा सर्वोपरी होता.
आता २००९ची लोकसभा आणि विधानसभा यांची वाट बघण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता…
(क्रमश:)
– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक
या आधीचे भाग वाचा –
१) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १
२) शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २