Sunday, January 11, 2026

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान!

Share

परवा शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एक बातमी आली, मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदाच दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीतील मुद्यांबाबत मार्गदर्शन केलं अशी ती बातमी होती.

अमित ठाकरे शिवसेना भवनात पहिल्यांदाच दाखल झाले याचे वर्णन नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकल्यासारखे मीडिया करत होती. गेली २० वर्ष “घराणे” एकाच पुण्याईवर आपण हाडवैरी असल्यासारखे वेगवेगळे नांदत होतो याचा लवलेशसुद्धा दोन्ही बाजूंनी कुठे दिसत नव्हता. असो, पण त्याच्यानंतरचा मार्गदर्शनाचा सोहळा मात्र रोमांचकारी होता.

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे वय साधारण ३५ शीचे आहे. दोघांचा राजकारणातील प्रवेश हा “घराणे” या एकमेव पुण्याईवर झाला आहे. ज्याला ते “ठाकरे ब्रँड” समजतात. आजोबा एकच असणे आणि भाजपची भीती हे दोघांमधील दोनच समान दुवे आहेत. दोघांचे वडील आपापल्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. निदान अमित ठाकरे यांच्या वडिलांनी स्वकर्तृत्वाने आपला पक्ष स्थापन केला व वाढवला आणि रसातळाला नेऊन बुडवला. आदित्य ठाकरे यांच्या वडिलांना एक सुप्रस्थापित राजकीय पक्ष वारसा हक्काने मिळाला आणि त्यांनी तो स्वकर्तृत्वाने रसातळाला नेऊन बुडवला. महाराष्ट्राच्या राजकारणात आदरणीय स्थान मिळवलेल्या आजोबांचे नातू आणि कर्मदरिद्री पक्षप्रमुखांचे पुत्र यापलीकडे महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची कोणती पात्रता या दोघांकडे आहे असा प्रश्न पडतो?

नाही म्हणायला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांकडेही निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. निदान आदित्य ठाकरेंकडे दोनदा निवडणूक लढवून जिंकण्याचा अनुभव तरी आहे. (त्यासाठी त्यांच्या वडिलांना आणि पक्षाला किती पापड लाटावे लागले किती नाकदुऱ्या काढाव्या लागल्या ते सोडून द्या…) आणि अमित ठाकरे यांच्याकडे निवडणूक लढवून हरण्याचा अनुभव आहे. तो सुद्धा तिसऱ्या नंबर वर राहून हरण्याचा.

३५ शी तल्या या दोघा राजकुमारांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जे उमेदवार बसलेले होते. त्यातले कित्येक जण ३५ वर्षाहून अधिक काळ राजकारणात असतील. कित्येक जणांनी चार-पाच वेळा निवडणूक लढवून स्वकर्तृत्वावर विजयही मिळवलेला असेल. कदाचित त्यात आपल्या पक्षाच्या पुण्याईपेक्षा स्वतः मतदारसंघात केलेली कामे हेच त्यांच्या विजयाचे गुपित असेल. यातील कित्येक उमेदवार कधी जिंकले असतील कधी हरले असतील. पण प्रत्येक वेळी जिद्दीने उभे राहून राजकारणात टिकून राहिले असतील. काही उमेदवारांनी तर आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या बारशाच्या घुगऱ्या देखील खाल्ल्या असतील. ज्यांचे आणि ज्यांच्या पक्षाचे विश्व दहिसर चेक नाक्यापासून बोरीबंदरच्या महापालिका कार्यालयापर्यंत असे विशाल पसरलेले आहे. ज्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या शेजारी बसलेल्या चुलत चुलत भावाच्या पक्षाला “संपलेला पक्ष” म्हटले होते. ज्या अमित ठाकरे यांच्या वडिलांनी शेजारी बसलेल्या आपल्या चुलत चुलत भावाच्या पक्षाने महापालिकेत केलेला अपरिमित भ्रष्टाचार जाहीर सभांमधून वेशीवर टांगला होता ते दोघे चुलत चुलत भाऊ. गेल्या २० वर्षांची कॅलेंडर्स फाडून टाकून मांडीला मांडी लावून बसले होते आणि मार्गदर्शन करत होते.

लाचारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मान खाली घालून ज्यांच्या पाळण्याची आपण दोरी ओढली आहे अशा राजकुमारांचे मार्गदर्शन मान खाली घालून नाईलाजास्तव ऐकले असेल त्यांची मजबुरी आपण समजून घेतली पाहिजे.

पण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मात्र या दोघा राजकुमारांना मनोमन मनसोक्त हसले असतील. सर्कशीतल्या वाघ सिंहांना जसा रिंग मास्तर आपल्या चाबकाने हवा तसा नाचवतो. तसा ज्यांच्या साहेबांनी या दोन्ही राजकुमारांच्या वडिलांना नाचवले आहे. त्या दात आणि नखे काढलेल्या वाघ सिंहाचे बछडे रिंग मास्टरच्या उमेदवारांना निवडणूक कशी लढवायची आणि जिंकायची याचे मार्गदर्शन करत होते. मार्गदर्शन सोहळा संपल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी एकमेकांना टाळी देऊन “येड्या ****”चे म्हणून यथेच्छ टिंगल केली असणार याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. “पवार ब्रँड”वाल्यांना “ठाकरे ब्रँड”चे करपट ढेकर येणे स्वाभाविक आहे.

असो… या युतीत सामील असूनही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार किंवा जयंत पाटील उपस्थित नव्हते. नाहीतर या दोन्ही राजकुमारांनी त्यांच्याही उपस्थितीत उमेदवारांना मार्गदर्शन केले असते ही संकटाची घडी टाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या उमेदवारांनी मनोमन त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभारच मानले असतील.

आपल्या देशातील राजकीय घराणेशाहीच्या उतरंडीवर आजपर्यंत किती कावळे स्वतःला राजहंस म्हणून मिरवून गेले असतील आणि किती राजहंस कावळे म्हणून हिणवले गेले असतील याची गणती नाही. अशाच दोन कावळ्यांच्या मार्गदर्शना सोहळा मुंबईने अनुभवाला.

थोडक्यात काय… मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान…

अन्य लेख

संबंधित लेख