Friday, January 16, 2026

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

Share

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात ‘कमळ’ वेगाने फुलताना दिसत असून, अजित पवारांच्या अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे निकालाच्या प्राथमिक कलांवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत भाजप ४७ जागांवर आघाडीवर असून, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागत आहे. पुण्यात काका-पुतण्याने (अजित पवार आणि शरद पवार गट) एकत्र येऊनही मतदारांनी भाजपच्या ‘विकासकामांना’ पसंती दिल्याचे चित्र आहे.

अजित पवारांचे ‘फ्री मेट्रो-बस’ कार्ड फेल?
निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवासाचे मोठे आश्वासन दिले होते.

पुण्याचा वाहतूक कोंडीत जगात चौथा क्रमांक लागत असून, वार्षिक १०,८०० कोटींचे नुकसान होते, असा दावा त्यांनी केला होता. मेट्रो आणि बस मोफत केल्यास खासगी वाहने कमी होतील आणि प्रदूषण घटेल, असे त्यांचे नियोजन होते. मात्र, मतदारांनी या मोफत योजनांच्या आश्वासनापेक्षा भाजपच्या ‘शाश्वत विकास’ आणि ‘डबल इंजिन सरकार’च्या धोरणावर विश्वास दर्शवल्याचे निकालांवरून दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १२८ जागांपैकी २ जागा भाजपने आधीच बिनविरोध जिंकल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार:

भाजप: ५० जागांवर आघाडीवर (बहुमताच्या दिशेने वाटचाल).

राष्ट्रवादी (अजित पवार गट): २६ जागांवर आघाडी.

शिवसेना (शिंदे गट): ७ जागांवर आघाडी.

इतर (काँग्रेस, ठाकरे गट, मनसे): या पक्षांना मोठा फटका बसला असून त्यांचा प्रभाव नगण्य ठरला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे दोन्ही शहरं अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, येथील निकालांमुळे भाजपचे शहरावरील वर्चस्व अधिक घट्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे, तर पुण्यातही त्यांनी आपला गड राखला आहे. या निकालांमुळे महायुतीमधील भाजपचे वजन वाढणार असून, अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

अन्य लेख

संबंधित लेख