मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची या निवडणुकीत मोठी पीछेहाट झाली असून, त्यांचे अनेक बालेकिल्ले ढासळले आहेत.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना भगदाड
एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, या दोन्ही गटांना त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्येही भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने रोखले आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली आहे.
फुटीचा फटका की नेतृत्वाचा अभाव?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या उभ्या फुटीचा फायदा महायुतीला आणि विशेषतः भाजपला झाला असल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे. मतदारांमध्ये असलेल्या संभ्रमाचा फटका दोन्ही पवारांना बसला आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून, पक्षाची व्होट बँक भाजप आणि शिंदे गटाकडे वळल्याचे चित्र आहे.
भाजप ठरला ‘नंबर वन’ पक्ष
मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने यावेळी अधिक आक्रमक कामगिरी केली आहे. २६ महापालिकांमध्ये स्वबळावर किंवा महायुतीच्या जोरावर भाजप सत्ता स्थापन करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या यशाने भाजपने राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान अधिक घट्ट केले आहे.
शिंदे गटाची कामगिरी सुधारली, काँग्रेसची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड
भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे गटाने ठाकरे गटाला मागे टाकत आपली ताकद सिद्ध केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसने काही मोजक्या ठिकाणी समाधानकारक कामगिरी केली असली, तरी सत्तेच्या समीकरणापासून ते दूरच असल्याचे दिसत आहे.