Monday, January 19, 2026

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला घातली आहेत. २२७ सदस्यांच्या सभागृहात महायुतीने ११८ जागांनिशी काठावरचं बहुमत (मॅजिक फिगर ११४) गाठलं खरं, पण सत्तास्थापनेचा मार्ग वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य आहे. यामुळेच आता शिंदे गट ‘किंगमेकर’ ठरला असून त्यांनी महापौरपदासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाचा अडीच वर्षांच्या महापौरपदावर दावा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालानंतर भाजप आणि शिंदे सेनेत अंतर्गत वाटाघाटींना वेग आला आहे. “मुंबईवर शिवसेनेचाच महापौर बसवण्याची परंपरा आहे,” असा तर्क मांडत शिंदे गटाने अडीच वर्षांसाठी महापौरपद मागितल्याचे समजते. भाजपने सुरुवातीपासूनच “मुंबईत भाजपचाच महापौर बसवू” असा दावा केला होता, मात्र बहुमतासाठी आवश्यक ११४ चा आकडा गाठण्यात भाजपला (८९ जागा) अपयश आल्याने आता त्यांना मित्रपक्षाच्या अटी मान्य कराव्या लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच
केवळ महापौरपदच नव्हे, तर स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदावरूनही दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. सन्मानपूर्वक सत्तावाटप झाले नाही, तर शिंदे गट आपला पाठिंबा लांबणीवर टाकू शकतो, असे संकेत मिळत आहेत. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने आणि मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे सेनेची मदत नितांत गरजेची असल्याने, भाजप बॅकफूटवर येणार का? हा मोठा प्रश्न आहे.

सत्तेचं गणित एका नजरेत:
बहुमताचा आकडा:
११४

भाजप: ८९ जागा

शिंदे सेना: २९ जागा

एकूण (महायुती): ११८ जागा

अन्य लेख

संबंधित लेख