Tuesday, January 20, 2026

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन

Share

नवी दिल्ली : “भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नसून तो एक संस्कार आहे. एका सामान्य कार्यकर्त्याचा राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे,” अशा शब्दांत भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले.

या नव्या जबाबदारीसाठी त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच देशभरातील विविध राज्यांतील नेते आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’ घडविण्याचा जो संकल्प मांडला आहे, तो साकार करण्यासाठी संपूर्ण पक्ष संघटितपणे, पूर्ण निष्ठा आणि समर्पणाने कार्य करीत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप संघटनेचा अभूतपूर्व विस्तार झाला असून, कार्यकर्ता-आधारित राजकारण आणि सेवेची संस्कृती अधिक बळकट झाली आहे. त्याच संघटनात्मक परंपरेला पुढे नेण्याचा आपला सामूहिक निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टी ही देशातील एकमेव अशी राजकीय संघटना आहे, जिथे मोठ्या पदांसाठी कोणत्याही विशिष्ट कुटुंबाचा वारसा आवश्यक नसतो. येथे साधा कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता आहे. याच संघटनेतून सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि साधा कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, हे भाजपचे वैशिष्ट्य आहे.

‘राष्ट्र प्रथम’ हाच आमचा संकल्प
नितीन नबीन यांनी आपल्या भाषणात भाजपच्या विचारधारेचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानापासून ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादापर्यंत आणि अटलजींच्या आदर्शांपासून ते पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वापर्यंत, भाजपचे प्रत्येक पाऊल ‘राष्ट्र प्रथम’ या एकाच संकल्पाने प्रेरित आहे.”

“भाजपने नेहमीच युवा शक्तीवर विश्वास ठेवला असून, तो केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता संघटन रचना, निर्णय प्रक्रिया आणि नेतृत्व निर्मितीतही दिसून येतो.” तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एक महत्त्वाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “राजकारण ही १०० मीटरची शर्यत नसून ती मॅरेथॉन आहे; १०० मीटरच्या शर्यतीत वेगाची (Speed) चाचणी होते, तर मॅरेथॉनमध्ये तुमच्या सहनशक्तीची (Stamina) परीक्षा असते. त्यामुळे तरुणांनी राजकारणाच्या खेळपट्टीवर धैर्याने टिकून राहणे आवश्यक आहे.”

घराणेशाहीवर प्रहार: “सामान्य कुटुंबातील व्यक्तीही पंतप्रधान होऊ शकते”
इतर राजकीय पक्षांवर निशाणा साधताना नबीन म्हणाले, “भाजप हा देशातील एकमेव असा पक्ष आहे जिथे मोठ्या जबाबदारीसाठी विशिष्ट कुटुंबात जन्माला येण्याची गरज नाही. येथे सामान्य कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी योग्यता आहे. म्हणूनच एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकते आणि एक साधा कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो.”

२०४७ चे उद्दिष्ट आणि कार्यकर्त्यांना आवाहन
“आपले ध्येय स्पष्ट आहे—२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे. भाजपचा कार्यकर्ता सत्तेसाठी नाही, तर सेवा आणि संकल्पाचे राजकारण करतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रनिर्माणाचे शिपाई म्हणून काम करण्याचे आवाहन केले.

सेवा, विस्तार आणि कार्यकर्ता सशक्तीकरणाची ही वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह, केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशभरातील कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची सामूहिक शक्ती पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

“भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा केवळ पक्षाचा नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचा शिपाई आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविणे हे आपले स्पष्ट लक्ष्य आहे,” असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले.

शेवटी, या महान संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी सर्वांच्या मार्गदर्शन, स्नेह आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

अन्य लेख

संबंधित लेख