पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी “हिंदू हा धर्म नाही” असे खळबळजनक विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिग्विजय सिंग आणि काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
काय आहे दिग्विजय सिंग यांचे विधान?
पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंग म्हणाले की, “हिंदू हा कोणताही धर्म नाही. भारतीय संविधानात ‘वी द पीपल ऑफ इंडिया दॅट इज भारत’ असे स्पष्ट नमूद आहे. मग देशाला ‘हिंदू राष्ट्र’ का म्हटले जाते? त्याला ‘भारतवर्ष’ का म्हटले जात नाही?” यासोबतच त्यांनी टी-२० विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याबद्दलही टीका केली असून, खेळात राजकारण आणू नये, असे मत व्यक्त केले.
भाजपची जळजळीत प्रतिक्रिया
दिग्विजय सिंग यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आचार्य तुषार भोसले यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “हिंदू हा धर्म नाही? काँग्रेसच्या हिंदूविरोधी मानसिकतेचा बुरखा पुन्हा एकदा फाटला! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी “हिंदू हा धर्म नाही” असे अत्यंत संतापजनक आणि निंदनीय विधान करून पुन्हा एकदा संपूर्ण हिंदू समाजाचा आणि सनातन धर्माचा घोर अपमान केला आहे.
सनातन धर्माला नावे ठेवणे, हिंदूंच्या भावना दुखावणे आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू धर्माची बदनामी करणे, हे काँग्रेसच्या DNA मध्येच भिनले आहे. प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापासून ते हिंदुत्वाला दहशतवादाशी जोडण्यापर्यंत काँग्रेसचा इतिहास कायमच हिंदूविरोधी राहिला आहे.”
भोसले यांनी पुढे आव्हान दिले की, “काँग्रेस नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माबाबत ‘हा धर्मच नाही’ असे म्हणून दाखवावे. केवळ हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्याचा ठेका काँग्रेसने घेतला आहे का?”
भोसले यांनी पुढे आव्हान दिले की, काँग्रेस नेत्यांमध्ये हिंमत असेल, तर इस्लाम किंवा ख्रिश्चन यांबद्दल ‘हा धर्मच नाही’ असे बोलून दाखवा! तेव्हा तुमची दातखिळी का बसते? केवळ हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्याचा ठेका काँग्रेसने घेतला आहे का?
संपूर्ण देशातील हिंदू समाज काँग्रेसचा हा दुटप्पीपणा आणि हिंदूद्वेष उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. सनातनचा अपमान करणाऱ्या या प्रवृत्तीला जनताच आता त्यांची जागा दाखवून देईल! जय श्रीराम!