बिहारच्या मातीतून जन्मलेला एक अलौकिक प्रतिभावंत! ज्याने आपल्या शब्दांच्या प्रखरतेनं आधुनिक भारताच्या वाङ्मयीन आणि राजकीय क्षितिजावर स्वतःच एक अढळ स्थान निर्माण केलं. हा अलौकिक शब्दप्रभू म्हणजे रामधारी सिंह ‘दिनकर’. २३ सप्टेंबर १९०८ रोजी बेगुसराय जिल्ह्यातील सिमरिया नावाच्या एका छोट्याश्या गावात दिनकरांचा जन्म झाला. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या मातीचा गुणधर्म असा की, तिथे जशी शांतता आहे, असाच खोलवर एक क्रांतिकारी प्रवाहही वाहतो. दिनकरांच्या व्यक्तित्वात हाच प्रवाह शब्दांच्या रूपाने प्रकटला. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिनकरांचं बालपण गरिबीच्या आणि संघर्षाच्या सावलीत गेलं, मात्र निसर्ग आणि इतिहासाच्या ओढीने त्यांच्या मनात सर्जनशीलता अंकुरत राहिली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झालं. त्यांच्यातली शिक्षणाची ओढ त्यांना मोकामा हायस्कूल आणि नंतर पाटणा महाविद्यालयापर्यंत घेऊन गेली. पाटणा महाविद्यालयात इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचं अध्ययन करत असतानाच दिनकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने पैलू पडले. महाविद्यालयीन काळात त्यांच्यावर इतिहासातल्या महान क्रांतींचा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा मोठा प्रभाव पडला. १९२४ मध्ये ‘छात्र सहोदर’ या नियतकालिकातून त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली, जी त्यांच्या दीर्घ वाङ्मयीन प्रवासाची नांदी ठरली.
भारतीय स्वातंत्र्याच्या रणधुमाळीत दिनकरांच्या काव्याचा उगम झाला. १९२८ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बारडोली सत्याग्रहाने त्यांच्या तरुण मनावर खोल परिणाम केला. या यशाने प्रभावित होऊन त्यांनी ‘विजय-संदेश’ नावाचा काव्यसंग्रह लिहिला. सुरुवातीच्या रचनांमध्ये त्यांनी हिमालयाला भारताच्या अस्मितेचं प्रतीक मानून जे आवाहन केलं ते वाचून आजही मनामनात वीरश्रीचा संचार होतो,
“मेरे नगपति! मेरे विशाल!
साकार दिव्य गौरव विराट, पौरुष के पुंजीभूत ज्वाल!
मेरी जननी के हिम-किरीट! मेरे भारत के दिव्य भाल!”
ब्रिटीश सरकारची करडी नजर टाळण्यासाठी ते ‘अमिताभ’ या टोपणनावाने आपल्या कविता प्रसिद्ध करत असत. जतिन दास यांच्या बलिदानावर त्यांनी लिहिलेली कविता असो वा ‘प्राण-भंग’ सारखी रचना, दिनकरांचे शब्द म्हणजे जणू अन्यायाविरुद्ध उगारलेली धारधार तलवार होती.
कवी कोमलहृदयी असतात, मनस्वी असतात. आपल्या शब्दसामर्थ्याने ते चराचरातल्या जड, चेतनाशी संवाद साधू शकतात. म्हणून महाकवी कालिदास मेघांना दूत करून संदेश पाठवतात, सावरकर ‘मला माझ्या मातृभूमीकडे घेऊन जा’ असं सांगतात. रामधारी अशाच रीतीने पाटलीपुत्र नगरीत एका घाटावर विषण्ण सायंकाळी बसलेले असताना समोरून वाहणाऱ्या गंगेशी बोलू लागतात. पाटलीपुत्र नगरीचं आणि भरतवर्षाचं गतवैभव आठवून ते गंगेला सांगतात,
“अस्तु, आज गोधूलि-लग्न में गंगे! मन्द-मन्द बहना;
गाँवों, नगरों के समीप चल कलकल स्वर से यह कहना,
“खंडहर में सोई लक्ष्मी का फिर कब रूप सजाओगे?
भग्न देव-मन्दिर में कब पूजा का शंख बजाओगे?”
१९३८ मध्ये आलेल्या ‘हुंकार’ या संग्रहाने दिनकरांना क्रांतीचा कवी म्हणून ओळख मिळवून दिली. ब्रिटीश साम्राज्याला दिलेलं हे थेट आव्हान होतं. दिनकरांनी आपल्या शब्दांतून स्वातंत्र्याचा, आत्मसन्मानाचा आणि स्वत्वाचा गौरव केला.
१९४६ मध्ये दिनकरांनी ‘कुरुक्षेत्र’ या महाकाव्याची निर्मिती केली, हे काव्य जागतिक साहित्यात एक महत्त्वाचा अध्याय ठरलं. दुसऱ्या महायुद्धाच्या विनाशकारी आठवणी आणि भारताच्या फाळणीपूर्वीचा अस्वस्थ काळ या पार्श्वभूमीवर हे काव्य लिहिलं गेलं. महाभारतातल्या भीष्म आणि युधिष्ठिर यांच्यातल्या संवादाच्या माध्यमातून दिनकरांनी युद्धाची नैतिकता आणि अपरिहार्यता यावर खोलवर विचार मांडले. युधिष्ठिराला वाटणारा युद्धाचा पश्चात्ताप आणि भीष्माने दिलेली युद्धाची तात्त्विक मांडणी हा या काव्याचा गाभा आहे.
दिनकरांच्या मते युद्ध कधीही चांगलं नसतं, परंतु जेव्हा शांतीचे सर्व मार्ग खुंटतात आणि अन्याय असह्य होतो, तेव्हा युद्धाचा मार्ग स्वीकारणे हाच खरा धर्म ठरतो. सामर्थ्यशाली शांतीची संकल्पना मांडताना ते लिहितात,
“क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो,
उसको क्या जो दंतहीन, विषरहित, विनीत, सरल हो।”
सामर्थ्याशिवाय असलेली शांती हा भ्याडपणा आहे, हा विचार त्यांनी भारतीयांच्या मनावर बिंबवला. या महाभारताच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आधुनिक काळातल्या मानवी संघर्षाचं चित्र रेखाटलं.
दिनकरांच्या प्रतिभेचं सर्वोच्च शिखर म्हणजे १९५२ साली त्यांनी रचलेलं ‘रश्मिरथी’! महाभारतातला अत्यंत गुंतागुंतीचं आणि शोकात्म आयुष्य वाट्याला आलेला कर्ण हा या काव्याचा नायक . ‘रश्मिरथी’चा अर्थ-‘सूर्यकिरणांच्या रथावर आरूढ झालेला’. कर्णाचं व्यक्तिमत्त्व दिनकरांना भावण्याचं कारण म्हणजे त्याचा संघर्ष. तो एका सूतपुत्राच्या रूपात वाढला, समाजाने त्याला हिणवलं, तरीही त्याने आपल्या पराक्रमाने स्वतःचं स्थान निर्माण केलं.
दिनकरांनी कर्णाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा प्रश्न उपस्थित केला. ज्या समाजात गुणांपेक्षा कुळाला महत्त्व दिलं जातं, त्या समाजाची त्यांनी कडक शब्दात निर्भत्सना केली. ‘रश्मिरथी’मधला ‘कृष्ण की चेतावनी’ हा भाग आजही न्यायाची गर्जना वाटतो. जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला पांडवांचा वाटा देण्यास सांगतात, तेव्हाचे शब्द म्हणजे न्यायाची मागणी आहे:
“दो न्याय अगर तो आधा दो, पर, इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पाँच ग्राम, रक्खो अपनी धरती तमाम।”
जेव्हा दुर्योधन शिष्टाई नाकारतो आणि देशाला विनाशाकडे ढकलतो, तेव्हा दिनकर लिहितात,
“जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है।”
दिनकरांचे योगदान केवळ काव्यापुरते मर्यादित नव्हतं. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या मुळांचा शोध घेण्यासाठी ‘संस्कृती के चार अध्याय’ हा महाग्रंथ लिहिला, ज्यासाठी त्यांना १९५९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा ग्रंथ म्हणजे भारतीय मनाचा आणि अस्मितेचा एक सखोल अभ्यास आहे. दिनकरांनी भारतीय संस्कृतीला एक प्रवाही आणि समन्वयवादी शक्ती मानले आहे. त्यांच्या मते भारतीय संस्कृती ही केवळ एका धर्माची किंवा पंथाची नसून ती विविध प्रवाहांच्या एकत्र येण्यातून बनलेली एक महान ‘गंगा’ आहे.
त्यांनी संस्कृती आणि सभ्यता यांमधील सूक्ष्म फरक स्पष्ट केला. सभ्यता ही भौतिक प्रगतीचं साधन आहे, तर संस्कृती ही मानवी मूल्यांची आंतरिक अभिव्यक्ती आहे. ‘स्वत्व’ या संकल्पनेची व्याख्या करताना दिनकरांनी स्पष्ट केले की भारतीयत्व हे बाह्य विचारांना झटकण्यात नाही, तर सर्वांना सामावून घेण्याच्या क्षमतेत आहे. स्वत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी कडक भूमिका घेतली,
“छीनता हो स्वत्व कोई और तू त्याग तप से काम ले,
यह पाप है।”
रामधारी सिंह दिनकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाते अत्यंत विलक्षण होते. १९५२ मध्ये नेहरूंनीच दिनकरांना राज्यसभेवर नियुक्त केलं. तरीही दिनकर हे केवळ सरकारचे स्तुतीपाठक कवी राहिले नाहीत. त्यांनी आपल्या साहित्यातून आणि भाषणांतून वेळोवेळी राजसत्तेला जाब विचारला.
या दोघांमधला एक प्रसिद्ध प्रसंग संसदेच्या पायऱ्यांवर घडला. एकदा एका संमेलनासाठी जात असताना नेहरूंचा पाय घसरला आणि दिनकरांनी त्यांना सावरलं. नेहरूंनी आभार मानले असता दिनकर उद्गारले, “नेहरूजी, जेव्हा जेव्हा राजकारण अडखळतं, तेव्हा तेव्हा साहित्य त्याला ताकद देतं आणि सावरतं”. हे वाक्य दिनकरांच्या कवी म्हणून असलेल्या स्वाभिमानी भूमिकेचं दर्शन घडवतं.
१९६२ च्या भारत-चीन युद्धाने दिनकरांच्या मनावर मोठा आघात केला. नेहरूंच्या अहिंसक धोरणांवर आणि देशाच्या कमकुवत संरक्षण नीतीवर त्यांनी ‘परशुराम की प्रतीक्षा’ या काव्यातून कडाडून प्रहार केला. त्यांनी शांततेच्या गप्पा मारणाऱ्या नेतृत्वाला अर्जुन आणि भीमासारख्या पराक्रमी वीरांची आठवण करून दिली,
“रे, रोक युधिष्ठिर को न यहाँ, जाने दे उनको स्वर्ग धीर,
पर, फिरा हमें गाण्डीव गदा, लौटा दे अर्जुन भीम वीर।”
त्यांनी निर्भयपणे सांगितलं की जेव्हा शत्रू सीमेवर असतो, तेव्हा केवळ प्रार्थना करून चालत नाही, तर शस्त्र उचलणे हाच धर्म असतो.
वीररसाचे कवी म्हणून मान्यता पावलेल्या दिनकरांनी १९६१ मध्ये ‘उर्वशी’ नावाचं काव्य-नाटक लिहून आपल्या असामान्य काव्यप्रतिभेनं सर्वांना थक्क केले. यामध्ये त्यांनी पुरुरवा आणि उर्वशी यांच्या प्राचीन कथेला एक नवीन दार्शनिक आयाम दिला. शारीरिक प्रेम किंवा ‘काम’ हा अध्यात्माचा विरोधक नसून तो त्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे; हे यातून दिनकर मांडतात. मानवी भावभावनांचं वर्णन करताना ते लिहितात,
“मर्त्य नर को देवता कहना मृषा है,
देवता शीतल, मनुज अंगार है।”
या काव्यासाठी त्यांना १९७२ मध्ये भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.
दिनकरांचं काव्य त्यांच्या निधनानंतरही भारतीय राजकारणात प्रभावी ठरलं. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानावर दिनकरांच्या सुप्रसिद्ध ओळींचा उच्चार करून इंदिरा गांधींच्या अनियंत्रित, पाशवी सत्तापिपासेला आव्हान दिलं होतं,
“दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो,
सिंहासन खाली करो कि जनता आती है।”
या ओळी लोकशाहीच्या प्राणतत्वाची अभिव्यक्ती आहे.
रामधारी सिंह दिनकर राष्ट्रकवी होते, स्वार्थाची पर्वा न करता देशाच्या सर्वोच्च नेत्याला परखडपणे सुनावणारे जाज्वल्य देशभक्त होते, देशाचा ‘स्व’ जागवणारे प्रहरी होते. त्यांच्या काव्याचा पिंड अस्सल भारतीय होता. जेव्हा साहित्यविश्वात पारतंत्र्याची काळरात्र चालू होती, त्या अंधाराचा नाश या दिनकराने केला.
त्यांच्या शब्दांनी देशाला स्वातंत्र्यासाठी लढायला शिकवलं आणि स्वातंत्र्यानंतर स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्या काव्याने देशाला आत्मबल दिलं. जोपर्यंत भारतात अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल आणि जोपर्यंत भारतीय आपल्या स्वत्वाचा शोध घेतील, तोपर्यंत राष्ट्रकवी ‘दिनकर’ त्यांच्या शब्दकिरणांनी शतकानुशतकं भारतीय साहित्य क्षितिजावर असेच तळपत राहतील.
– ऋतुराज कशेळकर