Tuesday, May 12, 2026

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी

Share

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या पूर्व अनुभवानुसार अनुनयाचा भाव स्वीकारून, स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. आपण त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असे काही विशेष नाही. मात्र त्यांनी ‘वारकरी संप्रदायातील घुसखोर’ असे म्हणून ज्यांच्यावर टीका केली गेली त्यांच्याबद्दल बोलतांना आपली पात्रता – लायकी तपासली पाहिजे असे ही यांना वाटले नाही.

वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक आहे. वेद‌प्रामाण्य मानीत त्यानंतर आलेल्या कुप्रथांवर आक्षेप घेणारा, सर्वांना भक्ति-ज्ञान उपासनेचा अधिकार देणारा, सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणारा, नामनिष्ठ, ईश्वरनिष्ठांचा संप्रदाय. त्याच्या पाईकांवर निधर्मी, ईश्वराच्या आस्तित्वावर शंका घेणारे अश्रद्ध-नास्तिकांना कोणताही नैतिक वा व्यावहारिक अधिकार नाही.

या वक्तव्यात, ज्यांच्याबद्दल बोलले गेले त्यांची सांप्रदायातील समृद्ध पूर्वपरंपरा व समाजातील त्यांची समरसता, गौसेवा, व्यसनमुक्ती, संतवाङ्मयाच्या प्रसार व प्रचारातील सेवामग्नता, निरपेक्षता, समाजातील त्यांच्याविषयीची आस्था याचा कोणताही अभ्यास न करता हे महाशय आपल्या पाठीराख्यांच्या विचारानुसार तथ्यहीन बोलले. यातल्या कोणाला पैसे देऊन हिंदुत्वावर अगर कोणा राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी प्रवृत्त केले गेले हे त्यांनी पुराव्यानिशी सिध्द करावे. आमच्या श्रद्धास्थानांविषयी अश्लाघ्य बोलणाऱ्या या नतद्रष्टांवर अब्रूनुकसानीचे खटले का भरू नयेत?

मुळातच, सध्याच्या वातावरणात खरातांसारखी प्रकरण बाहेर निघाली असतांना, दुसरीकडे बाहेर आलेली नाशिक, परतवाडा, अमरावती याठिकाणी मुस्लीम जिहादींव्दारा झालेली लैंगिक शोषणांची प्रकरणे ही समोर येत आहेत. पण, या विषयांवरचे समाजभान दूर करणे, त्यांचे पक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. मुळात सध्या चाललेली हिंदू संमेलने सकल हिंदू समाजाच्या माध्यमातुन येणाऱ्या विविध विषयांवरील संघटित प्रतिक्रिया, बजरंगदल, गौसेवकांच्याद्वारा गाईंना वाचवच्यासाठी होणारे प्रयत्न व त्यातुन बंद पडणारे कत्तलखाने, धर्माभिमानी लोकांचा त्यात असणारा प्रत्यक्ष सह‌भाग व कार्यवाही, अनेक मठ मंदिरातुन, गावागावातुन चाललेल्या नित्य आरती उपक्रम, संस्कार व उपासनांचा उपक्रम, हनुमान चालीसा पठण व त्यानिमित्याने वाढणारा धर्मनिष्ठांचा सहभाग यासर्वांमुळे यांनी अनेक प्रयत्न करूनही जातीयवादी – धर्मांधशक्तींचा बिमोड होत नाही आहे. वारकरी संप्रदायिकांसह सर्वच हिंदू सांप्रदायाचे संत जसे रामदासी, महानुभाव, शिख, लिंगायत, जैन, शैव, शाक्त, वैष्णव, बैरागी, साधुसंत, कबीरपंथी, नवसंप्रदाय परंपरा, इस्कॉन, स्वामीनारायण, बैठक परिवार, स्वाध्यायी, श्री. श्री. रविशंकर परिवार, स्वामी समर्थ भक्त परिवार, जनार्दनस्वामी भक्त परिवार, प्रजापिता ब्रह्माकुमारी इ. अनेक एकत्र येऊन समरसतेच्या – बंधुत्वाच्या कार्यात अग्रेसर होऊन पर्यायाने संत विचारांचे खरे ध्रुवीकरण करत आहेत, त्यामुळे यांची फोडा-झोडाची राजनिती यशस्वी होत नाही.

खरा इतिहास पुराव्यांसह समोर यायला लागला आहे. लाखोंच्या संख्येने बहुजन समाजातील युवक गड-किल्ले-इतिहास याविषयी जागरूक झालेत. हे सर्व या तथाकथित पुरोगामी मंडळीच्या विघातक प्रवृत्तीला आपले अपयश आहे. “घर घर भगवा” दिसतोय! तो यांच्या नजरेत खुपतो. यांनी विद्वेश न करता केलेले चांगले कार्य समाज समोर आणावे असे आव्हान आहे.

खरे तर जेष्ठ असणारे पवारसाहेब यांनी टक्केवारी लक्षात आणून देत आम्हा संतविचार निष्ठांना, हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या, वंदे मातरम! भारतमाता की जय! म्हणणाऱ्यांना ही सूचना केली आहे की, बाबांनो तुम्ही ४०% च काम केले अजुन ६०% काम प्रसार-प्रचाराच्या माध्यमातून वाढवणे व १००% रामराज्य निर्मितीकडे जाणे आवश्यक आहे.

माननीय साहेबांचे बोलणे हे केवळ वाक्यार्थांने न घेता लक्षार्थाने घ्यावे. आज आम्हा सर्वांच्या एकत्र येण्याचे, व्यक्त होण्याचे कारण तेच आहेत. अन्यथा आम्ही एकत्र लवकर आलो नसतो. त्यांचे आमच्यावर थोर उपकार आहेत. कदाचित ऋषी बाबाजी सारखी वरून नास्तिकता व आतुन सद्गुण निष्ठा त्यांची असावी. त्यामुळे त्यांची सुचना लक्षात घ्यावी.

विकास लवांडे जे बोलले त्याचा निषेध? तो नक्कीच आहे! मात्र अशा प्रवृत्ती स्वतःच कोणाच्या तरी आर्थिक बळावर बोलत असतात. त्यांना होणारी ही रसद कुठून, कशी होते याचा शोध प्रशासनाने लाऊन त्वरीत कारवाई केली पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या स्थिर व विकसनशील होण्याच्या वातावरणात बिघाड करण्याचा प्रयत्न करणारी ही प्रवृत्ती शमवता येईल.

वारकरी मंडळींनी देव-देश-धर्म यांच्या प्रती आपली निष्ठा कायम राखीत या दुष्प्रवृत्तीला आपल्या सत्कार्याने, संस्कारांनी, व सुसंघटित राहुन कोणताही मतभेद-मनभेद-जातिभेद न येऊ देता दृढपणे विरोध केला पाहिजे. आपल्या प्रभाव क्षेत्रातील काम अजुन ६०% वाढवले पाहिजे. शेवटी श्रीतुकोबाराय सांगतात ते करावे –

भुंकोत ती द्यावी भुंको। आपण न येत्यांचे शिको।
भाविकांनी दुर्जनाचे। काही मानो नये साचे॥”

– माधवदास महाराज राठी, नाशिक

अन्य लेख

संबंधित लेख