शिरूर लोकसभा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. “लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारार्थ सभेत फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, “जे आमच्यावर टीका करत असतील तर जरा त्यांनी समोरच्या उमेदवाराला (अमोल कोल्हे) विचारा की त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या. गेल्या पाच वर्षांत किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि कुठे जाणार होते आणि कसे थांबले ते सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा उघड होईल. मात्र एक गोष्ट आहे आढळरावांपेक्षा एक गोष्टीत ते (अमोल कोल्हे) सरस आहेत. आढळराव नाटक करत नाहीत. तुम्हाला नाटक जमत नाही. ते एवढं नाटकी आहेत की त्यांना रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर परत कुणीही नाटक पाहायला जात नाही”, असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेवर निशाणा साधला.