प्रस्तावना
जगात अनेक धर्म, विविध पंथ, हजारो भाषा, अगणित बोली आणि विविध प्रकारच्या जीवनशैली आहेत. आपण जर मानवी इतिहासाकडे वळून पाहिले, तर सिंधू संस्कृती, इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन, ग्रीस आणि रोम यांसारख्या प्राचीन संस्कृतींनी मानवी प्रगतीचा भक्कम पाया रचलेला दिसतो. पण ‘संस्कृती’ हा शब्द आपण जेव्हा जेव्हा वापरतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो? आपण दररोज म्हणतो – “ही आपली संस्कृती आहे”. म्हणजे हा केवळ रूढी, परंपरा किंवा सणांचा समूह आहे का? मुळीच नाही! ‘संस्कृती’ ही मानवी अंतर्मनाची, विचारांची आणि वागणुकीची एक अत्यंत प्रगत आणि परिष्कृत अवस्था आहे. आज ‘शब्दांच्या दुनियेत’ या लेखमालेत या शब्दाविषयी जाणून घेऊया.
व्याख्या
संस्कृतीची सुटसुटीत व्याख्या करायची असेल तर शब्दाच्या जोडीने प्रकृति व विकृती हे दोन शब्द ठेवल्यास संस्कृतीचा नेमका अर्थ मनात ठसू शकतो. प्रकृति म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा बिघाड आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार किंवा बिघाड होऊ नये, या उद्देशाने प्रकृतीवर करण्याचा संस्कार.
उदाहरणार्थ, नद्यांना ‘लोकमाता’ मानले गेले. आपल्या संस्कृतीत असा नियम आहे की, वाहत्या पवित्र पाण्यात कचरा टाकणे, थुंकणे किंवा कपडे धुणे हे पाप आहे. प्रकृतीतील पाण्याचे स्रोत दूषित (विकृत) होऊ नयेत, हाच यामागील उद्देश होता. मानवाच्या उपभोगवादी वृत्तीमुळे प्रकृतीची विकृती होऊ नये, म्हणून धर्माने निसर्गसंरक्षणाला कर्तव्याचे आणि पूजेचे रूप दिले- हाच प्रकृतीवर केलेला ‘संस्कृती’ नावाचा संस्कार आहे.
‘संस्कृती’ या शब्दाचा अर्थ त्याच्या व्युत्पत्तीतच दडलेला आहे. संस्कृत भाषेत ‘सम्’ या उपसर्गाचा अर्थ- ‘पूर्णपणे, उत्तम प्रकारे किंवा एकत्रितपणे’असा होतो, तर ‘कृ’ या धातूचा अर्थ ‘करणे, घडवणे किंवा निर्माण करणे’ असा आहे. या दोन्हींच्या संयोगातून निर्माण झालेल्या ‘संस्कृ’ या शब्दाचा मूलभूत अर्थ ‘परिष्कृत करणे, सुधारणा करणे, शुद्ध करणे किंवा अधिक योग्य बनवणे’ असा होतो. त्यापासून तयार झालेला ‘संस्कृति’ हा शब्द म्हणजे ‘परिष्काराची अवस्था किंवा संस्कारांनी घडलेली जीवनपद्धती’ असा अर्थ व्यक्त करतो.
म्हणूनच भारतीय परंपरेत संस्कृती म्हणजे केवळ परंपरा, सण किंवा रूढी यांचा संग्रह नसून, व्यक्ती आणि समाज या दोघांच्याही विचार, आचार आणि मूल्यांचा सातत्याने होत राहणारा परिष्कार होय. ज्या प्रक्रियेमुळे मनुष्य अधिक सज्जन, संवेदनशील, विवेकी आणि उत्तरदायी बनतो, त्या प्रक्रियेचे सामूहिक रूप म्हणजे संस्कृती, असे म्हणता येईल.
संस्कृतीचे नित्य परिवर्तन
प्रत्येक संस्कृती ही वाहत्या नदीसारखी असते. प्रदेशानुसार आणि काळानुसार तिच्यात नित्य बदल होत असतो. क्रांतीकालात तर हा बदल फार मोठा असतो आणि हा बदल माणूसच घडवून आणतो. यातच भारतवर्ष गेली कित्येक सहस्रके अनेक मानववंशांच्या संस्कृतींची प्रयोगशाळा बनले आहे.ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्राप्रमाणे – “आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः” (सर्व दिशांकडून येणाऱ्या श्रेष्ठ आणि कल्याणकारी विचारांचे स्वागत असो!) भारतीय संस्कृती कधीही संकुचित किंवा बंदिस्त राहिली नाही. तिने विश्वातील सर्व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय संस्कृतीमधील संस्कृतीची कल्पना
भारतीय तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्रामध्ये ‘संस्कृती’ ही संकल्पना मानवी अंतर्बाह्य जीवनाच्या निरंतर परिष्काराशी आणि नैतिक उन्नतीशी जोडलेली एक व्यापक जीवनप्रणाली मानली जाते. पाश्चात्त्य समाजशास्त्रात Culture ही संकल्पना एखाद्या समाजाच्या ज्ञान, श्रद्धा, मूल्यव्यवस्था, कला, कायदे, रूढी आणि सामाजिक वर्तन यांच्या एकत्रित जीवनपद्धतीचे वर्णन करते. भारतीय विचारपरंपरेतील ‘संस्कृती’ ही संकल्पना या सर्व घटकांना स्वीकारत असली, तरी तिचा केंद्रबिंदू मानवी अंतःकरणाचा परिष्कार, आत्मिक उन्नती आणि नैतिक जीवनमूल्यांचा विकास हा आहे. त्यामुळे भारतीय ‘संस्कृती’ ही केवळ सामाजिक जीवनाचे वर्णन न करता, जीवनाला दिशा देणारी मूल्याधिष्ठित संकल्पना आहे.
तसेच, हे सर्व विचार आणि परंपरागत ज्ञान आपल्याला संस्कृत भाषेत सहज उपलब्ध आहे. म्हणूनच प्रसिद्ध सुभाषितात म्हणले आहे- भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा। (भारताची प्रतिष्ठा आणि ओळख ही प्रामुख्याने ‘संस्कृत भाषा’ आणि ‘भारतीय संस्कृती’ या दोन स्तंभांवरच टिकून आहे.)
‘संस्कार’ आणि ‘संस्कृती’ यांतील दार्शनिक व मीमांसात्मक संबंध
संस्कृती या संकल्पनेचा पाया संस्कार आहे, असे मानले जाते. मग संस्कार म्हणजे काय? तर, दर्शनशास्त्रात शबरभाष्य या ग्रंथात महर्षी शबरस्वामी यांनी संस्काराची व्याख्या करताना स्पष्ट केले आहे की, संस्कार ही अशी क्रिया आहे जी असण्याने एखादा पदार्थ किंवा व्यक्ती विशिष्ट कार्यासाठी योग्य अथवा पात्र बनते.
श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या मते, संस्कार दोन प्रकारे काम करते- एक म्हणजे ‘गुणाधान’. ज्यात मानवी मन व चेतनेमध्ये नवीन उत्तम गुण आणि मूल्य शिकली जातात, आणि दुसरे म्हणजे ‘दोषापनयन’. ज्यात आत्म्याला व मनाला कलुषित करणाऱ्या पूर्वसंचित दोषांचे व अज्ञानाचे निवारण केले जाते.
थोडक्यात, व्यक्तीच्या अंतःकरणातील वाईट गुणांचे उच्चाटन करून त्याच्यात निरंतर सद्गुणांचा विकास करणारी सामूहिक व कौटुंबिक प्रक्रिया म्हणजेच संस्कृती, असे म्हणता येते.
निष्कर्ष
‘संस्कृती’ ही संकल्पना केवळ बाह्य आचरण किंवा सामाजिक प्रथांपुरती मर्यादित नसून, ती मानवी मनाचा व चेतनेचा निरंतर परिष्कार करणारी आध्यात्मिक व नैतिक चौकट आहे. ‘संस्कृती’ हा शब्द मानवाला गुणांनी सुशोभित आणि शुद्ध करण्याची प्रक्रिया दर्शवतो. त्यामुळे, संस्कृती ही भूतकाळाच्या पोतडीत जतन करून ठेवायची वस्तू नाही; ती वर्तमानात जगण्याची आणि भविष्याला दिशा देणारी एक अखंड चेतना आहे. प्रकृतीला विकृतीकडे जाऊ न देता, तिच्यावर विचारांचे संस्कार करून मानवी जीवनाला मूल्यांची जोड देणे- हाच भारतीय संस्कृतीचा खरा गाभा आहे.
भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात असलेली विचारांची मोकळीक आणि सत्याचा सर्वसमावेशक स्वीकार. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही जगाला एक कुटुंब मानणारी व्यापक दृष्टी, स्त्री-पुरुषांमधील केवळ समानता नव्हे तर एकमेकांना सांभाळून घेण्याची परस्परपूरक भावना, आणि मातृभूमीविषयीची कृतज्ञता ही आपली प्रमुख जीवनमूल्ये आहेत. याच उदात्त आणि लवचिक विचारांमुळे भारतीय संस्कृती जगभरात सार्वकालिक आणि आदरणीय ठरली आहे.