Thursday, August 20, 2026

आमची माती आमची माणसं – कोंकणा समाज

Share

ओळख :

कोंकणा ही महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेली व दमण-दीव या तीनही राज्यांच्या सीमावर्ती भागात, प्रामुख्याने सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेली एक प्राचीन अनुसूचित जमात आहे. मानववंशशास्त्रज्ञ डॉ. गोविंद गारे (१९८२) आणि ब्रिटिश अधिकारी एन्थोव्हेन (१९२२) यांच्या मते या जमातीचे मूळ नाव कोकणपट्टीवरून पडले असून स्थलांतरामुळे ते घाटमाथ्यावर स्थिरावले आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या ६,८७,४३१ असून नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, डांग, वलसाड हे त्यांचे मुख्य वास्तव्य जिल्हे आहेत.

 भारतीय संविधानाने त्यांना अनुसूचित जमातीचा दर्जा दिला असून त्यांची स्वतःची वेगळी कोकणा भाषा आणि कुळ व्यवस्था ही त्यांची मूळभूत ओळख आहे.

जाती / जनजातीचे नाव :

मूळ वसतीस्थान कोकणपट्टी मानले जात असल्याने त्यांना कोकणा, कुकणा, कुंकणा, कोकणी, कुंकना असेही म्हटले जाते. ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आर. ई. एन्थोव्हेन यांनी १९२२ मध्ये लिहिलेल्या The Tribes and Castes of Bombay या ग्रंथात त्यांचा उल्लेख कोकणी असा केला आहे. गुजरातमध्ये त्यांना कुकना म्हणतात. Census of India १९७१ च्या मोनोग्राफमध्ये स्पष्ट केले आहे की ही सर्व नावे एकाच जमातीची असून प्रादेशिक उच्चारभेदामुळे फरक पडला आहे.

संविधानिक दर्जा :

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४२ अंतर्गत कोंकणा जमातीला अनुसूचित जमाती (ST) चा दर्जा प्राप्त आहे. हा दर्जा त्यांना महाराष्ट्र, गुजरात, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या सर्वच राज्यांमध्ये लागू आहे.

भाषा आणि बोली :

मातृभाषा : मातृभाषा ‘कोकणा’ असून ती इंडो-आर्यन कुटुंबातील भीली समूहाच्या Dhodia-Kukna शाखेतील भाषा आहे. प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ जॉर्ज ग्रिअर्सन यांनी Linguistic Survey of India मध्ये या भाषेची नोंद केली आहे. या भाषेला स्वतःची लिपी नाही, ती देवनागरी लिपीत लिहिली जाते.

बोलीभाषा :

भौगोलिक विस्तारामुळे बोलीत फरक दिसतो. डांग आणि वलसाड भागात कोकणा बोलीवर गुजरातीचा प्रभाव जास्त आहे तर नाशिक-धुळे भागात मराठीचा प्रभाव दिसतो. डॉ. गोविंद गारे (१९८२) यांनी नोंदवले आहे की ८०% पेक्षा जास्त लोक आजही घरी कोकणा भाषा बोलतात, तर बाजारात आणि शाळेत मराठी/गुजराती वापरतात.

 कुळ व्यवस्था :

समाज पितृसत्ताक, पितृवंशीय आणि पितृनिवासी आहे. संपूर्ण समाज अनेक बहिर्विवाही कुळांमध्ये विभागलेला आहे, याला स्थानिक भाषेत कूड असे म्हणतात. Census Monograph १९७१ नुसार गावित, भोये, पवार, चौधरी, वळवी, राऊत, गायकवाड, बोरसे, भुसारे ही प्रमुख कुळे आहेत. एकाच कुळात विवाह करण्यास सक्त मनाई आहे.

गोत्र :

प्रत्येक कुळाचे स्वतःचे टोटेम असते. वाघ, मोर, नाग, कासव किंवा पिंपळ, आंबा, वड, साग या झाडांना टोटेम मानले जाते आणि त्यांना इजा केली जात नाही. वाघ कुळाचे लोक वाघाची शिकार करत नाहीत, हा निसर्ग संवर्धनाचा आदिम प्रकार आहे.

उपगट :

भौगोलिक आधारावर दोन उपगट पडतात – डोंगरी कोकणा (सुरगाणा, पेठ, डांगच्या डोंगराळ भागातील, अधिक पारंपारिक) आणि मैदानी कोकणा (नवापूर, साक्रीच्या मैदानी भागातील, अधिक शेतीप्रधान). TRTI, Pune च्या अहवालानुसार यात फरक आहे.

शेती पद्धती :

पूर्वी फिरती (झूम) शेती करणारा हा समाज आता पूर्णपणे स्थायिक शेतीकडे वळला आहे. नागली, वरी, भात, ज्वारी, उडीद ही प्रमुख पिके. Deshmukh (२०११) यांच्या सर्वेनुसार ८५% कुटुंबांचे मुख्य उत्पन्न शेती आहे.

जंगलावर अवलंबित्व :

जंगलातून मोहाची फुले, चारोळी, डिंक, मध, आवळा गोळा करणे हा हंगामी पण महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. एल्विन यांनी याला Forest Economy म्हटले आहे.

 हस्तकला :

बांबूपासून टोपल्या, सुपे बनवणे आणि बोहाडा साठी लाकडी मुखवटे बनवणे ही वैशिष्ट्यपूर्ण कला आहे. TRTI च्या अहवालानुसार हे मुखवटे सागवान लाकडापासून बनवले जातात आणि नैसर्गिक रंग वापरले जातात.

आधुनिक रोजगार :

पारंपारिक शेती केवळ उदरनिर्वाहापुरतीच असल्याने आणि शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने कोंकणा समाजातील तरुण वर्ग आता आधुनिक रोजगाराकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. डॉ. बी.ए. देशमुख (२०११) यांनी ३६० कुटुंबांच्या सर्वेक्षणात नोंदवले आहे की आता केवळ ३०% कुटुंबेच पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत, तर ७०% कुटुंबांना जोडधंदा म्हणून दुसऱ्या रोजगाराची गरज भासते.

या आधुनिक रोजगाराचे तीन प्रमुख प्रकार दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे हंगामी मजुरी. शेतीत काम नसलेल्या डिसेंबर ते मे या काळात अनेक पुरुष आणि महिला रोजगार हमी योजनेत (MGNREGA), बांधकाम मजूर म्हणून आणि वीट भट्टीवर कामाला जातात.

दुसरा प्रकार म्हणजे औद्योगिक मजूर. नवापूर, सुरगाणा आणि डांग भागातील अनेक तरुण दररोज वापी, सिल्वासा, उमरगाव येथील MIDC मध्ये कंपनी कामगार म्हणून जातात. यामुळे त्यांना दरमहा निश्चित रोख उत्पन्न मिळू लागले आहे.

तिसरा आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे नोकरी आणि स्वयंरोजगार. शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे आता कोंकणा समाजातील तरुण-तरुणी आश्रमशाळेत शिक्षक, पोलीस शिपाई, वनरक्षक आणि तलाठी म्हणून नोकरी मिळवू लागले आहेत. याशिवाय सुरगाणा, पेठ, कळवण या बाजाराच्या ठिकाणी काही कुटुंबांनी किराणा दुकान, ऑटो रिक्षा, मोबाईल रिपेअरिंग आणि बांबू हस्तकलेचे दुकान असा छोटा व्यवसाय देखील सुरू केला आहे. या आधुनिक रोजगारामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेत विविधता आली असून केवळ शेतीवर असलेली अवलंबित्वाची पातळी कमी झाली आहे.

 धर्म आणि देवदेवता :

कोंकणा समाजाची धर्मव्यवस्था ही निसर्गपूजा आणि हिंदू परंपरा यांचा सुंदर संगम आहे. त्यांच्या धर्मात मूर्तिपूजा नसून प्रतीक पूजा आणि निसर्गातील शक्तींची उपासना केली जाते. त्यांच्या प्रमुख देवता या त्यांच्या अर्थव्यवस्थेशी म्हणजेच शेतीशी थेट जोडलेल्या आहेत.

यात धानतारी ही सर्वात महत्त्वाची देवता आहे. ती धान्याची आणि समृद्धीची देवता मानली जाते. शेतात पेरणी करण्यापूर्वी आणि कापणी झाल्यानंतर तिची पूजा केल्याशिवाय शेतात हात लावला जात नाही. नवीन धान्य घरात आणल्यावर प्रथम तिच्या नावाने नैवेद्य दाखवला जातो.

 दुसरी देवता म्हणजे कानसरी, जी अन्नाची देवता आहे. घरातील धान्याची कोठी म्हणजेच कानसरीचे स्थान मानले जाते. स्त्रिया दररोज स्वयंपाक करण्यापूर्वी तिला हळद-कुंकू वाहतात. अन्न वाया घालवणे म्हणजे कानसरीचा अपमान मानला जातो.

तिसरी देवता म्हणजे गवकारी, जी गुरांची आणि पशुधनाची देवता आहे. कोंकणा समाजात गुरे हे केवळ प्राणी नसून ते कुटुंबातील सदस्य आणि शेतीचे मुख्य भांडवल मानले जातात, म्हणून दिवाळीच्या वेळी गवकारीची विशेष पूजा करून गुरांना सजवले जाते. या तीनही देवता शेती, अन्न आणि पशुधन या त्यांच्या जीवनाच्या तीन आधारस्तंभांचे प्रतीक आहेत.

गावपातळीवर रक्षण करणाऱ्या आणि गावाचे संकटातून निवारण करणाऱ्या शक्तींना लोकदेवता म्हटले जाते. कोंकणा समाजात गावदेवी, डोंगरीदेव, वाघदेव आणि हिरवा देव या प्रमुख लोकदेवता आहेत.

गावदेवी ही संपूर्ण गावाची आई मानली जाते. प्रत्येक गावाच्या वेशीवर तिचे अनगड दगडाच्या स्वरूपात स्थान असते. गावात साथीचा रोग, दुष्काळ किंवा कोणतेही संकट आले तर प्रथम गावदेवीला कोंबड्याचा बळी देऊन गाऱ्हाणे घातले जाते. डोंगरीदेव हा डोंगराचा राजा मानला जातो. उंच डोंगरावर त्याचे स्थान असते आणि तो पाऊस पाडणारा आणि पिकांचे रक्षण करणारा मानला जातो. त्याच्या नावानेच डोंगरीदेव जत्रा भरते.

वाघदेव ही त्यांची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लोकदेवता आहे. वाघ हा जंगलाचा राजा असल्याने तोच जंगलाचा आणि पिकांचा रक्षक आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रत्येक शेताच्या चारही बांधावर वाघदेवाचा दगड ठेवला जातो आणि त्याला शेंदूर आणि तेल वाहिले जाते. वाघापासून पिकांचे आणि गुरांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली जाते. हिरवा देव हा जंगल आणि झाडांचा देव आहे. झाड तोडण्यापूर्वी त्याची परवानगी घेतली जाते.

या सर्व देव-देवतांचे आणि माणसाचे नाते जोडणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे भगत. भगत हा केवळ पुजारी नसून तो गावाचा पारंपारिक वैदू, ज्योतिषी आणि न्यायाधीश देखील असतो. झाडपाल्याचे औषध देणे, भविष्य सांगणे, लग्नाच्या तारखा ठरवणे आणि भूत-खेत काढणे ही सर्व कामे भगतच करतो. गावातील कोणताही महत्त्वाचा निर्णय भगताच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नाही.

Joshua Project नुसार धार्मिक स्थिती :

Joshua Project या ख्रिस्ती धर्माच्या missionary संस्था आंतरराष्ट्रीय डेटाबेसने नोंद केली आहे की, “Kokna people celebrate Hindu festivals and their own rituals. They are Hindus who worship tribal gods, goddesses and the tiger.” Primary Religion Hinduism, Christian Adherents १.१०%.

विवाह व्यवस्था

बी.ए. देशमुख यांनी मांडलेले लग्नाआधीचे विधी :

कोंकणा समाजात विवाहाला वारड म्हणतात. हा प्रौढ विवाह आहे. Census १९७१ नुसार विवाहाचे अंतर ३० किलोमीटरच्या आत असते.

साखरपुडा : Gare (१९८२) नुसार गूळ-खोबरं देऊन बोलणी पक्की होतात, हा सामाजिक करार आहे.

देवक बसवणे : सर्वात पवित्र विधी. Census आणि Deshmukh (२००४) दोघांनीही याला सर्वात पवित्र म्हटले आहे. ४-५ दिवस आधी टोपलीत कुलदेवतेचे प्रतीक ठेवून अखंड दिवा लावला जातो. वधू प्रथम कुलदेवतेची पूजा करते, म्हणजे तिचे लग्न आधी देवाशी होते.

 तेलावण : ३-४ दिवस वधू-वराला हळद-तेल लावून एकांतात ठेवले जाते, हा शुद्धीचा विधी आहे.

 मेंदी आणि ऐवती : सुवासिनींकडून हळद-कुंकू लावून आशीर्वाद.

धन देज : वधूमूल्य. वराकडून वधूपक्षाला रक्कम दिली जाते. Elwin यांनी याला Bride Price म्हटले आहे.

फ) प्रत्यक्ष वारड : वधूच्या घरी रांथी बांधणे. नातरा आणि खांडाडिया प्रथा.

 सण आणि उत्सव :

कोंकणा समाजाचे सण आणि उत्सव हे त्यांच्या कृषी जीवनचक्र, निसर्गपूजा आणि हिंदू परंपरा यांच्या एकत्रीकरणातून तयार झाले आहेत. त्यांचे सर्व सण हे पिकांच्या पेरणी आणि कापणीशी थेट जोडलेले असतात, म्हणून प्रत्येक सणाला आर्थिक आणि धार्मिक असे दोन्ही महत्त्व आहे.

दिवाळी : हा त्यांचा सर्वात मोठा सण आहे. कोंकणा समाजात दिवाळीला ‘दिवाळी / दिवारी’ असे म्हटले जाते आणि ती खरीप हंगामाची कापणी झाल्यानंतर साजरी केली जाते. Census १९७१ च्या मोनोग्राफमध्ये नोंद आहे की दिवाळीच्या वेळीच ते धनतारी, गवकारी या देवतांची पूजा करतात. या दिवशी गुरांना सजवले जाते, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि गुरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवीन धान्याची पूजा या दिवशीच होते.

होळी : होळी हा त्यांचा दुसरा मोठा सण आहे. हा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला साजरा होतो. या सणाच्या वेळी संपूर्ण गाव मिळून होळी पेटवते आणि होळीभोवती तारपा नृत्य केले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांचा प्रसिद्ध बोहाडा उत्सव सुरू होतो, म्हणून होळीला त्यांच्यात विशेष महत्त्व आहे.

दसरा : दसऱ्याला ते ‘दसरा / दशेरा’ म्हणतात. हा सण रब्बी पेरणीच्या सुरुवातीचा सण मानला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या शेतीच्या औजारांची पूजा करतो आणि चांगल्या पिकासाठी डोंगरीदेवाकडे प्रार्थना करतो. या दिवशी गावातील भगत पुढील हंगामाचे भविष्य सांगतो.

डोंगरीदेव उत्सव : हा केवळ सण नसून एक मोठा धार्मिक सोहळा आहे जो ८ ते १० दिवस सतत चालतो. हा उत्सव मार्च-एप्रिल महिन्यात डोंगरावर साजरा केला जातो. डॉ. बी.ए. देशमुख (२०११) यांच्या मते या उत्सवासाठी २०,००० ते २५,००० लोक एका डोंगरावर एकत्र येतात. या काळात गावात कोणीही शेतीचे काम करत नाही. रोज रात्री भगताच्या नेतृत्वाखाली पारंपारिक गाणी, नृत्य आणि देवाची कहाणी सांगितली जाते.

बोहाडा : हा कोंकणा जमातीचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला उत्सव आहे जो होळीनंतर ३ दिवस साजरा केला जातो. डॉ. गोविंद गारे (२०००) यांनी पान क्रमांक ११५ वर नोंदवले आहे की या उत्सवात ३५ ते ५२ प्रकारचे लाकडी मुखवटे वापरले जातात. हे मुखवटे गणपती, मारुती, राम, रावण, वाघ, भूत या पात्रांचे असतात. तरुण मुलं हे मुखवटे घालून ३ दिवस आणि ३ रात्र अखंड नृत्य-नाट्य करतात. यामागील श्रद्धा अशी आहे की या नृत्याने गावातील दुष्ट शक्ती, रोगराई निघून जाते आणि गाव पवित्र होते. TRTI, Pune ने या सणाला आदिवासी संस्कृतीचा जिवंत वारसा म्हटले आहे.

जत्रा

कोंकणा समाजात जत्रेला हाट असेही म्हणतात. मानववंशशास्त्रज्ञ व्हेरिअर एल्विन आणि गोविंद गारे यांच्या मते जत्रा ही एक संस्था आहे. Census of India १९७१ Monograph (पान ४२-४८) मध्ये जत्रेचे वर्णन “आदिवासी समाजाचे विद्यापीठ” असे केले आहे, कारण येथे आर्थिक व्यवहाराबरोबरच न्याय, विवाह आणि औषध या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी घडतात.

 गावदेवी आणि वाघदेव जत्रा : ही जत्रा डिसेंबर-जानेवारी महिन्यात रब्बी हंगामाची कापणी झाल्यानंतर भरते. TRTI, Pune च्या १९८२ च्या अहवालानुसार या जत्रेत नवीन धान्याचा नैवेद्य प्रथम गावदेवीला दाखवला जातो. वाघदेव हा जंगलाचा रक्षक मानला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या चारही बांधावर असलेल्या अनगड दगडाला शेंदूर, तेल आणि कोंबड्याचा नैवेद्य अर्पण करतो. यामागे वाघापासून पिकांचे आणि गुरांचे रक्षण व्हावे ही भावना आहे. या जत्रेतच पुढील वर्षी कोणत्या शेतात कोणते पीक घ्यायचे याचे नियोजन आणि जमिनीच्या वादांचे निवाडे पटेल आणि पंच यांच्याकडून केले जातात.

 डोंगरीदेव जत्रा : ही कोंकणा समाजाची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची जत्रा आहे. डॉ. बी.ए. देशमुख यांनी २०११ मध्ये सटाणा, कळवण आणि साक्री या भागात केलेल्या ३६० कुटुंबांच्या सर्वेनुसार ही जत्रा दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात उंच डोंगरावर ८ ते १० दिवस सतत चालते आणि या जत्रेला महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली मधून २०,००० ते २५,००० लोक एकत्र येतात. या जत्रेची तीन प्रमुख कार्ये आहेत. पहिले कार्य म्हणजे न्यायदान, गावप्रमुख आणि पंच या जत्रेतच जमिनीचे वाद, मारामारी आणि घटस्फोट यांचे निवाडे करतात, म्हणून डॉ. गोविंद गारे (२०००) यांनी या जत्रेला “फिरते न्यायालय” म्हटले आहे. दुसरे कार्य म्हणजे भगताची भूमिका, भगत या जत्रेत भविष्य सांगतो आणि आजारांवर मुळी-पाल्याचे औषध देतो. तिसरे कार्य म्हणजे विवाह बाजार, Census १९७१ नुसार कोंकणा समाजात ४५% विवाह त्याच गावात होतात आणि त्यातील ८०% जोड्या याच जत्रेत ठरतात, कारण ३० किलोमीटरच्या आतच विवाह करण्याचा अलिखित नियम आहे.

 बोहाडा जत्रा : हा जत्रा प्रकार केवळ कोंकणा-कुकणा जमातीतच आढळतो. डॉ. गोविंद गारे यांच्या Badalachya Umbarathyavar Kokana Adivasi (२०००) या ग्रंथात पान क्रमांक ११५ वर नोंद आहे की बोहाडामध्ये ३५ ते ५२ प्रकारचे मुखवटे असतात. हे मुखवटे सागवान लाकडापासून बनवले जातात आणि त्यावर शेंदूर, काजळ, खडू, हळद, गेरू असे नैसर्गिक रंग वापरले जातात. प्रत्येक मुखवटा हे रामायण, महाभारत आणि स्थानिक दंतकथांवर आधारित एक पात्र असते. हे मुखवटे घालून ३ दिवस अखंड नृत्य-नाट्य चालते. यामागे दुष्ट शक्तींना गावातून पळवून लावणे हा उद्देश असतो. आता या मुखवट्यांना GI Tag मिळावे यासाठी TRTI ने प्रस्ताव पाठवला आहे.

आठवडे बाजार जत्रा : ही आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाची जत्रा आहे. Gare (१९८२) यांनी Tribes of Maharashtra मध्ये नोंदवले आहे की सुरगाणा, पेठ, नवापूर, साक्री येथे प्रत्येक आठवड्याला विशिष्ट वारी बाजार भरतो. Deshmukh (२०११) यांनी केलेल्या २२५ कुटुंबांच्या सर्वेनुसार ६०% कुटुंबे वर्षातील ४०% उत्पन्न केवळ या आठवडे बाजारातून मिळवतात. मोहाची फुले, चारोळी, डिंक, मध, बांबूच्या टोपल्या या वस्तू येथे विकल्या जातात. हा बाजार सरकारी योजना आणि नोकरीची माहिती मिळण्याचे केंद्र आहे.

आधुनिक स्थिती

आधुनिकतेमुळे कोंकणा समाजात मोठे बदल घडत आहेत, जे संक्रमण अवस्था दर्शवतात.

सामाजिक बदल : पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंबाकडे कल वाढला आहे. Gare (२०००) यांनी नोंदवले आहे की आता आंतरजिल्हा विवाहांचे प्रमाण वाढले आहे, जे पूर्वी निषिद्ध मानले जात होते.

शहरीकरण : शिक्षण आणि नोकरीमुळे नाशिक, वापी, सिल्वासा, नंदुरबार या शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. पाड्यांमध्ये आता कौलारू घरांच्या जागी PM आवास योजनेतील पक्की घरे, मोबाईल आणि टीव्ही दिसू लागले आहेत.

शिक्षणातील वाढ : Deshmukh (२०११) यांच्या अभ्यासानुसार प्राथमिक शाळेतील प्रवेशाचे प्रमाण ९०% पर्यंत वाढले आहे, मात्र ८वी नंतर गळतीचे प्रमाण ६८% इतके जास्त आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि आश्रमशाळांच्या आधुनिकीकरणामुळे आता परिस्थिती सुधारत आहे.

ड) आर्थिक प्रगती : पूर्वी केवळ उदरनिर्वाह शेती होती, आता जनधन खात्यांमुळे बँकिंग सवय लागली आहे. PM किसान सन्मान निधीमुळे शेतीसाठी भांडवल मिळते. वनधन केंद्रामुळे वन उपजाला हमीभाव मिळू लागला आहे.

इ) प्रमुख आव्हाने : आजही हंगामी बेरोजगारी, पावसावर अवलंबून असलेली शेती, पाण्याची टंचाई, सिकलसेल ॲनिमिया सारखे आनुवंशिक आजार आणि हस्तकलेला बाजारपेठेचा अभाव ही प्रमुख आव्हाने आहेत.

भाजप सरकारमुळे झालेले सकारात्मक बदल

२०१४ नंतर केंद्र आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर राबवलेल्या योजनांचा कोंकणा समाजाला थेट लाभ झाला आहे.

पहिला बदल म्हणजे वनहक्क आणि आर्थिक स्थैर्य : प्रलंबित असलेले वनहक्क पट्ट्यांचे वाटप वेगाने झाले आणि वनधन विकास केंद्र (VDVK) स्थापन झाल्यामुळे आता जत्रेतच वन उपजाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळू लागली आहे. यामुळे सावकाराकडून होणारी लूट थांबली आहे.

शिक्षण क्रांती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) आणि आश्रमशाळांचे आधुनिकीकरण झाले आहे. डिजिटल क्लासरूम, सौर ऊर्जा, क्रीडा संकुल यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांसारख्या सुविधा मिळू लागल्या आहेत.

पायाभूत सुविधा : PM आवास योजनेतून पक्की घरे, जल जीवन मिशनमधून नळाने पाणी, PM ग्राम सडक योजनेतून बारमाही रस्ते आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातून पाड्यांचा विकास झाला आहे.

आरोग्य आणि आर्थिक सुरक्षा : PM किसान सन्मान निधीमुळे दरवर्षी ६,००० रुपये थेट खात्यात येतात, आयुष्मान भारत योजनेतून ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात आणि विशेष सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानामुळे आरोग्य तपासणी वाढली आहे.

सांस्कृतिक सन्मान : तारपा नृत्य आणि बोहाडा मुखवट्यांना दिल्लीतील राष्ट्रीय आदिवासी महोत्सवात स्थान मिळाल्यामुळे कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर ओळख आणि बाजारपेठ मिळाली आहे.

संदर्भ :

१. Census of India १९७१ – Kokna Monograph.
२. Deshmukh B.A. – Tribal Education २००४ व ISRJ २०११.
३. Gare G.M. – Tribes of Maharashtra १९८२.
४. Gare Govinda – Badalachya umbarathyavar २०००.
५. Elwin Verrier – The Tribal World १९५५.
६. Joshua Project – Kokna Profile.
७. TRTI, Pune – BoHada Report.

– राज भाटिया

अन्य लेख

संबंधित लेख