परंपरा जपतानाच शास्त्रीय महत्त्व समजून घेऊया
शहराच्या मध्य भागात किंवा अन्य भागातही श्रावण महिना सुरू झाला की आघाडा दुर्वा फुलेsssssss अशी आरोळी अगदी सहज ऐकू येते. श्रावण महिन्यात देवाला वाहिल्या जाणारी आघाड्याची पाने म्हणजे एकप्रकारची औषधी वनस्पती. आजही हा आवाज काही ठिकाणी कानी पडतो आणि श्रावण महिना सुरू असल्याचे आपल्याला कळते. फुलं, बेल, दुर्वा हे एरवीही बाजारात मिळते पण आघाडा याच काळात मिळतात आणि देवाला वाहिल्या जातात. यामागे विशेष कारण आहे.
श्रावणात सोमवारच्या पूजेला किंवा उपवासाला विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौर, श्रावणी शुक्रवारची जिवतीची पूजा, श्रावणी शनिवार, नागपंचमी, श्रावणातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा अशा बहुतांश दिवशी देवाला या आघाडा आणि फुले वाहण्याची पद्धत आहे. ऋषिपंचमी, हरितालिका, गणपती या दिवशीही आघाडा, दुर्वा, फुलं हे सगळं लागतं. या आघाडा आणि पत्रींना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असले तरी त्यांना आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे.
आघाड्याचे औषधी गुणधर्म
आघाड्याचे शास्त्रीय किंवा आयुर्वेदातील नाव अपामार्ग असे आहे. आघाड्याची पाने ही दिसायला एखाद्या सामान्य वनस्पतीप्रमाणेच दिसतात. या काळात त्या पांनांची उपलब्धता जास्त प्रमाणात असते.
१. सर्दी-कफावर उपयुक्त – पावसाळ्याच्या काळात साधारणपणे सर्दी, कफ, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात. या पानांचा काढा करुन प्यायल्यास सर्दी-कफ पातळ होण्यास होण्यास मदत होते.
२. सांधेदुखीमध्ये गुणकारी – पावसाळ्यात दमट हवेने सांधेदुखी डोके वर काढते. अशावेळी आघाड्याची पाने ठेचून गरम करून सांध्यावर बांधल्यास वेदना कमी होतात व आराम मिळतो.
३. पचनासाठी उपयुक्त – पावसाळ्यात अग्नी मंद झालेला असल्याने पचनाच्या समस्या उद्भवतात. मात्र आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्यास ती पाचक म्हणून काम करते आणि पोटातील विकार दूर करण्यास मदत करते.
४. दातदुखीवर आराम – आघाड्याचे मूळ चघळल्याने किंवा काड्यांचा वापर केल्याने दातदुखी व हिरड्यांच्या समस्या कमी होतात.
५. त्वचाविकारावर गुणकारी – पावसाळ्यात त्वचेशी निगडीत काही समस्या उद्भवल्या तर त्यावर आघाड्याच्या पानांचा रस लावल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते.
६. फॅटस कमी करण्यास उपयुक्त – शरीरावरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी म्हणजेच फॅट बर्न करण्यासाठी आघाडा अतिशय उपयुक्त ठरतो.
आघाड्यासोबतच दुर्वा, बेलपान याही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर वनस्पती आहेत. जुलाब, पोटाच्या समस्यांवर बेलपानाच्या सेवनाने आराम पडतो. तर पित्त, शुगर कमी करणे, कफाच्या समस्या यांसाठी आयुर्वेदात दुर्वांचे पाणी पिण्यास सांगितले जाते. त्यामुळे हिंदू सणवारांना धार्मिक महत्त्व असले तरी आरोग्याच्या दृष्टीनेही ते अतिशय महत्त्वाचे असतात. मात्र परंपरा जपत असताना ते महत्त्व आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे.