पौराणिक कथांनुसार, संत गोरखनाथ यांनी एकदा आपला एक शिष्य कानिफनाथ यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी कानिफनाथांच्या हातात विषाने भरलेली एक वाटी दिली, जी त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता प्राशन केली.असे मानले जाते की हा समाज १२ व्या शतकात राजस्थानच्या थर वाळवंटात राहणाऱ्या नवनाथ किंवा संत कानिफनाथ यांच्या अनुयायांपैकी एकापासून निर्माण झाला. आपल्या शिष्याच्या आज्ञाधारकपणावर प्रसन्न होऊन, संत गोरखनाथांनी कानिफनाथांना सापांसह सर्व विषारी प्राण्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचे वरदान दिले. म्हणूनच, विषाची वाटी पिणाऱ्या संत कानिफनाथांच्या अनुयायांना कालबेलिया म्हटले जाते. त्यांच्या अनुयायांना उपजीविकेसाठी भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. भिक्षा मागणे आणि दान देणे ही भारतातील एक अतिशय जुनी परंपरा आहे. कालबेलिया समुदायाने ही प्रथा दीर्घकाळ पाळली.
साप पकडणे, विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून लोकांचे रक्षण करणे, सर्पदंशावर उपचार करणे आणि सापाच्या विषाचा व्यापार करणे हा कालबेलिया समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा भाग आहे.धालीवाल आणि मेवारा या कालबेलिया समुदायाच्या दोन पोटजाती आहेत. त्यांना सपेरा, सपेला जोगी, गतीवाला, पुंगीवाला आणि बंजारा या नावांनीही ओळखले जाते. त्यांच्या बोलल्या जाणाऱ्या भाषेला ‘सपेरा’ भाषा म्हणतात.
पौराणिक, सांस्कृतिक उगम
१६ व्या ते १८ व्या शतकात राजस्थान, माळवा आणि महाराष्ट्रात हे भटके समुदाय शहरांच्या किंवा किल्ल्यांच्या वेशीवर आपले ‘डेरे’ (तंबू) ठोकून राहत असत. सापांचा उपद्रव रोखणे, सर्पदंशावर तातडीचे उपचार करणे आणि राजदरबारात पुंगी वादन व सापांचे खेळ दाखवून मनोरंजन करणे यासाठी राजे-महाराजे त्यांना आश्रय देत असत.
‘काल’ (मृत्यू/विष) आणि ‘बेलिया’ (वाटी) म्हणजेच विषाची वाटी धारण करणारा समुदाय. हिंदू असूनही या समाजात मृतदेहांना दफन करून थडग्यावर नंदीची मूर्ती स्थापन करण्याची अनोखी प्रथा आहे.
गारुडी आणि सापवाळे समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरेनुसार त्यांच्या उत्पत्तीची आणखी एक पौराणिक कथा महर्षी कश्यपांशी जोडलेली आहे. पौराणिक संदर्भानुसार, महर्षी कश्यप यांना कद्रू आणि विनता या दोन पत्नी होत्या. विनतेपासून गरुडाची तर कद्रूपासून नागांची (नागकुळ) उत्पत्ती झाली.
कद्रूच्या पुत्रांना (नागांना) मिळालेल्या शापापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका विशिष्ट मानवी समूहाची निर्मिती झाली. भगवान शिवाच्या आशीर्वादाने एका ऋषिमाराने (ज्याला पुढे ‘गारुडी’ म्हटले गेले) नागांना वश करण्याचे आणि पुंगीच्या नादाने शांत करण्याचे कौशल्य प्राप्त केले.
गारुडी समाजाच्या श्रद्धेनुसार त्यांच्या पूर्वजांनी नागांशी एक पवित्र करार केला होता — “आम्ही तुम्हाला मारणार नाही किंवा इजा पोहोचवणार नाही; तुम्ही आम्हाला उपजीविकेचा मार्ग द्याल आणि आम्ही तुमचे रक्षण करू.” यामुळेच हा समाज सापाला ‘नागदेवता’ मानून त्याची पूजा करतो.
पारंपरिक वैद्यकीय ज्ञान आणि राजकीय उलथापालथ
मॉडर्न एंटी-वेनम लस येण्यापूर्वी हा समाज सर्पदंशाच्या उपचारांचा मुख्य आधार होता. सापाच्या दंशाच्या खुणांवरून सापाची जात ओळखणे आणि जंगलातील दुर्मिळ वनस्पतींचे अर्क वापरून विष उतरवणे यात ते निष्णात होते.
पोलिश कवी जॅन कोचानोव्स्की यांच्या मते, १२ वे आणि १३ वे शतक हा कालबेलिया समुदायासाठी सुवर्णकाळ होता. पण मोहम्मद घोरीकडून पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाल्यानंतर या समुदायाचा ऱ्हास होऊ लागला. १४ व्या शतकात, धर्मांतराच्या आणि सक्तीच्या गुलामगिरीच्या भीतीने कालबेलिया समुदायाने राजस्थानमधून मध्य प्रदेशातील माळवा, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या देशाच्या इतर भागांत स्थलांतर केले. असे असले तरी, सर्व संकटांना तोंड देत या समुदायाने आपला पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षे सुरूच ठेवला.
१६ व्या ते १८ व्या शतकादरम्यान, सापांचे खेळ आणि पारंपरिक कालबेलिया नृत्याद्वारे राजांचे मनोरंजन करण्यासाठी कालबेलियांना मुघल दरबारात बोलावले जात असे. या समुदायातील लोक भटके आहेत आणि त्यामुळे ते एका गावातून दुसऱ्या गावात फिरत असतात. ते सहसा गावाबाहेर ‘डेरा’ नावाच्या त्यांच्या तात्पुरत्या घरांमध्ये (तंबूत) राहतात.
वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२) आणि लोककलेकडे संक्रमण
काँग्रेस धाजिर्ण्य सरकारने १९७२ मध्ये ‘वन्यजीव संरक्षण कायदा’ लागू करून सापांना पकडणे, पाळणे आणि त्यांचे खेळ दाखवण्यावर पूर्णपणे बंदी घातली.शतकानुशतके चालणारा पारंपरिक व्यवसाय बेकायदेशीर ठरल्याने हा समाज एका रात्रीत बेरोजगार झाला.
या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या कलेचे रूपांतर लोकसंगीतात आणि नृत्यात केले. कालबेलिया महिलांनी सापांच्या लवचिक हालचालींवर आधारित ‘कालबेलिया नृत्य’ विकसित केले.
युनेस्कोने (UNESCO) या नृत्याला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून मान्यता दिली. या नृत्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या गुलाबो सपेरा यांना २०१६ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.
ब्रिटिशांनी या भटक्या समुदायांना जन्मजात गुन्हेगार ठरवल, त्यामुळे त्यांच्यावर बाकीच्या समाजांकडून बंधन आली आणि सामाजिक प्रतिष्ठा घसरली. स्वातंत्र्यानंतर अंत्रोळीकर समिती (१९४९) आणि थाडे समितीने या समाजातील स्थिर निवासाचा अभाव, शैक्षणिक मागासलेपण आणि अनिश्चित उपजीविका लक्षात घेऊन त्यांना भटक्या जमाती (NT) मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. महाराष्ट्र शासनाने गारुडी/सापवाळे समाजाचा समावेश भटक्या जमाती – ब (NT-B) या प्रवर्गात केला आहे, तर केंद्र सरकारच्या यादीत ते इतर मागासवर्ग (OBC) म्हणून नोंदवले गेले आहेत.
आरक्षणाचे कायदेशीर संरक्षण मिळूनही या समाजासमोरील अडचणी संपलेल्या नाहीत. जातीचे दाखले मिळण्यातील अडचणी: भटकंतीच्या (घुमंतू) पूर्वे इतिहासामुळे १९६१ पूर्वीच्या वास्तव्याचे पुरावे देणे या समाजाला कठीण जात. जातीचे दाखले मिळत नाहीत. आजही या समाजातील ९० टक्के कुटुंबांकडे स्वतःच्या जागा नाहीत. त्यामुळे अनधिकृत जागांवर झोपड्या बांधून राहतात. सापांविषयीचे त्यांचे अगाध ज्ञानाचा उपायोग होत नाही. शबरी किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत. वन विभागाने या समाजातील तरुणांना अधिकृत सर्पमित्र किंवा वन्यजीव रक्षक म्हणून रोजगार द्यावा.
गारुडी आणि कालबेलिया समाजाचा इतिहास हा संकटांशी सामना करत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा संघर्षमय प्रवास आहे. निसर्गाशी सहजीवन जगणाऱ्या या समुदायाला आधुनिक समाजात सन्मानाचे, रोजगाराचे आणि निवासाचे स्थान मिळवून देणे ही काळाची गरज आहे.