धर्म.. की कर्म..?
पहलगाम येथे ज्या आतंकवाद्यांनी धर्म विचारून भारतीय पर्यटकांची नृशंस हत्या केली होती, त्यांना एकएक करून वेचून यमसदनी पाठवण्यात अखेर भारतीय सेनेच्या वीर जवानांनी यश मिळवले आहे. त्या चार अतिरेक्यांपैकी शेवटचा अतिरेकी हशीम मूसा गोळीबारात मृत्यूमुखी पडला आहे. आपल्या देशबांधवांच्या मृत्यूचा सूड आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाला.
29 सप्टेंबर रोजी बडगाम भागात भारतीय सेना, CRPF आणि जम्मू-कश्मीर पोलीसदल यांच्या ऑपरेशन कोराग नावाच्या संयुक्त कारवाईमध्ये मूसा मारला गेला आहे.
- अबू तलहा
- सुलेमान शाह उर्फ फैजल जाट
- जुनैद भट
- हशीम मुसा
हे चौघेजण पहालगामवरील हल्ल्यात सहभागी असल्याची ओळख आपल्या एजन्सींनी पटवली होती. त्यानंतर कुलगामचा रहिवासी असलेला जुनैद भट हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर ३ डिसेंबर २०२४ रोजी श्रीनगरच्या दाचीगाम जंगल परिसरातील कारवाईत मारला गेला. गांदरबलमधील गगनगीर येथे बोगद्याच्या बांधकामस्थळी ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता.
२८ जुलै २०२५ रोजी ऑपरेशन महादेवमध्ये दाचीगाम परिसरात सुलेमान आणि त्याचे दोन साथीदार हबीब ताहिर आणि हमजा अफगाणी मारले गेले. त्यांच्याकडून जप्त केलेली शस्त्रे पहलगाम हल्ल्यात वापरली गेली असल्याचे निष्पन्न झाले होते तसेच २०२३ मधील पूंछ येथील लष्करी ताफ्यावरील हल्ला, मे २०२४ मधील हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्ला आणि रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवरील हल्ला यामध्ये देखील या गटाचा सहभाग असल्याचे नंतर सिद्ध झाले होते.
याच महिन्याच्या सुरुवातीला, ६ सप्टेंबरला, बडगाममधील यूसमर्गच्या उंचावरील भागात झालेल्या कारवाईत अबू तलहा मारला गेला. हा अबू गगनगीर हल्ला आणि ऑक्टोबर २०२४ मधील गुलमर्गच्या बोटा पथरी भागातील लष्करी वाहनावरील हल्ला यामध्ये सहभागी होता.

हाशिम मूसा हा या चौघांपैकी शेवटचा जिवंत सदस्य होता. तो लष्कर- ए- तोयबाचा या भागातील प्रमुख कमांडर होता. पहलगाम हल्ल्याच्या तपासात तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला होता. अबू तल्हा मारला गेल्यानंतरही मूसाचा शोध सुरू होता. बडगाम जिल्ह्यातील कोरग-यूसमर्ग पट्ट्यात त्याच्या हालचाली दिसून आल्या होत्या. भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि CRPF यांनी संयुक्त कारवाई केली. त्यानंतर झालेल्या चकमकीत मूसा मारला गेला.
बुधवारी सकाळी लवकर पालमैदान परिसरात केलेल्या शोधमोहिमेत त्या अतिरेक्याचा मृतदेह आणि युद्धसामग्री सापडली, असे चिनार कॉर्प्सने X वर सांगितले. त्याची ओळख मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा अशी पटली.
या मूसाचे खरे नाव महंमद आसिफ असल्याचे समजते. त्याने पाकिस्तानी लष्कराच्या SSG कमांडोचे प्रशिक्षण घेतले होते आणि तो माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचा रक्षक होता. तो २०२१ मध्ये भारतात घुसला आणि प्रदेशात लष्कर ए तोयबाचा मुख्य ऑपरेशन्स कमांडर म्हणून काम करत होता. पाकिस्तान या देशाच्या सेनेचा तो २०२३ पर्यन्त भाग होता.
काय संदेश जातो यातून?
या चारही जणांच्या कृत्यांकडे नजर टाकली तर काय लक्षात येते? केवळ एका विशिष्ट धर्माची दहशत पसरवण्यासाठी कित्येक निष्पाप आणि सामान्य माणसांचे रक्त सांडण्याचे घृणास्पद कृती करण्यात यांचा सहभाग होता. केवळ समोरचा आपल्या धर्माचा नाही म्हणून त्यांना अत्यंत नीचपणे ठार मारण्याचे कृत्य त्यांनी केलं. हे त्यांचं कर्म होतं. आणि त्या कर्मांचं फळ त्यांना मिळालं. या चौघांना मारताना भारतीय सेनेने धर्म विचारून मारलेलं नाही. त्यांची उपासनापद्धती किंवा त्या पद्धतीवरचा त्यांचा विश्वास हे त्यांना मारण्यामगाचं कारण कधीही नव्हतं. समोरच्याचा धर्म बघून नव्हे तर त्याचं कर्म बघूनच भारत आणि भारतीय सेनेने त्याची गती ठरवली आहे!
कर्माचे चक्र कोणाला सोडत नाही, असे आपण म्हणतो. या चौघांचा अंत त्याचेच उदाहरण आहे., जी २२ एप्रिल २०२५ रोजी सुट्टी साजरी करायला गेलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या त्या निष्पाप माणसांच्या कुटुंबांसाठी हा न्याय असेल, पण गेलेला जीव परत येत नाही. चक्र पूर्ण झाले, तरी जखमा उरतातच!
-मैत्रेयी जोशी