प्रस्तावना
आपण रोजच्या बोलण्यात अनेकदा म्हणतो, ‘माझ्यावर अन्याय झाला’, ‘त्याने योग्य न्याय दिला’ किंवा ‘न्यायाने वागले पाहिजे.’ पण कधी विचार केला आहे का, की या ‘न्याय’ शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? न्याय म्हणजे केवळ न्यायालयात होणारा निवाडा, की योग्य-अयोग्य ठरवण्याची एखादी तार्किक पद्धत? संस्कृत भाषेत ‘न्याय’ हा शब्द केवळ न्यायव्यवस्थेपुरता मर्यादित नाही. तो नियम, प्रमाण, तर्क, औचित्य आणि जीवनातील अनुभवांमधून तयार झालेल्या दृष्टान्तांचाही परिचय करून देतो. चला तर मग, या एका शब्दाच्या माध्यमातून भारतीय ज्ञानपरंपरेतील तर्क, विचार आणि न्यायबुद्धीचा रंजक प्रवास जाणून घेऊया!
‘न्याय’ शब्दाचा अर्थ काय?
‘न्याय’ हा मूळचा संस्कृत शब्द आहे. संस्कृत व्याकरणानुसार ‘नि’ + ‘इण्’ (गतौ — जाणे) यांच्या संयोगातून ‘न्याय’ हा शब्द सिद्ध होतो. ज्या पद्धतीने आपण एखाद्या निश्चित मार्गाने पुढे जाऊन योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो, ती पद्धती म्हणजे न्याय!
पाणिनीय परंपरेत ‘न्याय’ या शब्दाचा संबंध ‘अभ्रेष’ या अर्थाशीही जोडला गेला आहे. अभ्रेष म्हणजे नियमांचे, मर्यादांचे किंवा ठरलेल्या व्यवस्थेचे उल्लंघन न करणे. वात्स्यायनांनी आपल्या ‘न्यायभाष्य’ ग्रंथात ‘प्रमाणैरर्थपरीक्षणं न्यायः’ असे म्हटले आहे. म्हणजेच प्रत्यक्ष, अनुमान आणि इतर प्रमाणांच्या आधारे एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता तपासणे म्हणजे न्याय. थोडक्यात, योग्य प्रमाण, तर्क आणि नियमांच्या आधारे सत्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे न्याय!
उपनिषदांतील ‘वाकोवाक्य’
वेदांच्या प्रारंभिक संहितांमध्ये ‘न्याय’ हे स्वतंत्र तत्त्वज्ञानशास्त्र म्हणून प्रचलित असल्याचे ठोस संदर्भ मिळत नाहीत. मात्र ब्राह्मण ग्रंथांमध्ये यज्ञविधी आणि धार्मिक कर्मकांडांचे स्पष्टीकरण देताना विविध युक्तिवाद आणि दृष्टान्तांचा वापर झालेला दिसतो.
उपनिषदांच्या काळात सत्याचा शोध घेण्यासाठी प्रश्न विचारणे, संवाद साधणे आणि तर्काच्या आधारे विचारांची चिकित्सा करणे यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात तर्कशास्त्रासाठी ‘न्याय’ या शब्दाऐवजी ‘वाकोवाक्य’ ही संज्ञा वापरली गेली. छान्दोग्य उपनिषदात नारद मुनी सनत्कुमारांकडे ज्ञानप्राप्तीसाठी जातात, तेव्हा त्यांनी शिकलेल्या विद्यांमध्ये ‘वाकोवाक्य’चाही उल्लेख केला आहे. आद्य शंकराचार्यांनी ‘वाकोवाक्यं तर्कशास्त्रम्’ असे स्पष्ट केले आहे. पुढे या विचारपरंपरेला ‘आन्वीक्षिकी’, ‘हेतुविद्या’, ‘तर्कशास्त्र’ आणि ‘न्यायशास्त्र’ अशी विविध नावे प्राप्त झाली.
रामायण आणि महाभारतातील न्याय
रामायण आणि महाभारतात ‘न्याय’ शब्दाचा वापर राजधर्म, योग्य आचरण आणि तर्कशास्त्र अशा विविध अर्थांनी झाला आहे. महाभारतातील शान्तिपर्वात राजाने चार विद्यांचे ज्ञान प्राप्त करावे, असे सांगितले आहे. त्या म्हणजे त्रयी (वेद), वार्ता (अर्थव्यवहार), दण्डनीती (राज्यकारभार) आणि आन्वीक्षिकी (तर्क व तत्त्वचिंतन). यावरून राज्यकारभारासाठी केवळ सत्ता किंवा शस्त्रबळ पुरेसे नसून तर्कशुद्ध विचार आणि योग्य निर्णयक्षमताही आवश्यक मानली गेली होती.
अक्षपाद गौतम : न्यायशास्त्राचे प्रवर्तक
भारतीय तत्त्वज्ञानातील सहा प्रमुख दर्शनांपैकी ‘न्यायदर्शन’ हे एक महत्त्वाचे दर्शन आहे. त्याचे प्रवर्तक म्हणून महर्षी अक्षपाद गौतम यांना ओळखले जाते. त्यांनी रचलेल्या ‘न्यायसूत्रां’मधून भारतीय तर्कशास्त्राला स्वतंत्र आणि शास्त्रशुद्ध स्वरूप प्राप्त झाले.
न्यायसूत्रांमध्ये ज्ञानप्राप्तीपासून ते वादविवादातील योग्य-अयोग्य युक्तिवादांपर्यंत अनेक विषयांचे विवेचन केले आहे. यामध्ये प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टान्त, सिद्धान्त, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितण्डा, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रहस्थान अशा सोळा विषयांचा समावेश आहे.
या सर्वांचा अंतिम उद्देश केवळ वाद जिंकणे नसून सत्याचे ज्ञान प्राप्त करून दुःखातून मुक्त होणे हा आहे. यालाच ‘अपवर्ग’ किंवा ‘निःश्रेयस’ असे म्हटले जाते..
‘लौकिक न्याय’
संस्कृत साहित्यात दैनंदिन जीवनातील एखाद्या प्रसंगावरून तयार झालेली छोटी उदाहरणे किंवा दृष्टान्त ‘लौकिक न्याय’ म्हणून प्रसिद्ध आहेत. गुंतागुंतीचा विचार सहज समजावून सांगण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो.
- काकदन्तपरीक्षा न्याय : कावळ्याला दात नसतानाही ते शोधण्यात वेळ दवडणे—अर्थात निरर्थक श्रमाचे प्रतीक!
- घुणाक्षर न्याय : लाकूड पोखरणारा कीटक (घुण) योगायोगाने लाकडावर अक्षरासारखी आकृती तयार करतो. निव्वळ योगायोगाने घडणाऱ्या परिणामासाठी हा न्याय वापरला जातो.
- शृङ्गग्राहिका न्याय : कळपातील अनेक गायींमधून एका नेमक्या गायीची ओळख तिच्या शिंगावरून पटवून देणे.
अशा लौकिक न्यायांमधून अवघड तात्त्विक विचार सांगण्यासाठी दैनंदिन जीवनातील साध्या उदाहरणांचा आधार घेण्याची संस्कृत भाषेची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा दिसून येते.
समाजाला न्यायाची गरज का पडली?
भारतीय नीतिचिंतनात न्यायाचा संबंध केवळ व्यक्तीच्या योग्य-अयोग्य वर्तनाशी नसून संपूर्ण समाजव्यवस्थेशी जोडलेला आहे. जेव्हा समाजात स्वार्थ, लोभ आणि अन्यायकारी प्रवृत्ती वाढू लागल्या, तेव्हा योग्य-अयोग्य ठरवणारी व्यवस्था आवश्यक झाली. त्यातून राजा, दण्डनीती आणि न्यायव्यवस्थेची संकल्पना पुढे आली, असे या नीतिचिंतनातून सांगितले जाते. न्याय म्हणजे केवळ अपराध्याला शिक्षा देणे नव्हे, तर निरपराध व्यक्तीचे रक्षण करणे आणि समाजातील सुव्यवस्था टिकवणे होय.
शेवटी…
‘न्याय’ हा शब्द एका अर्थापुरता मर्यादित नाही. व्याकरणातील नियम आणि औचित्यापासून उपनिषदांतील प्रश्नोत्तरे, महाकाव्यांतील राजधर्म, अक्षपाद गौतमांचे तर्कशास्त्र आणि दैनंदिन जीवनातील लौकिक दृष्टान्त अशा अनेक टप्प्यांतून त्याचा प्रवास झाला आहे.
आज आपण न्यायाला प्रामुख्याने कायदा आणि न्यायालयांच्या चौकटीत पाहतो. मात्र भारतीय ज्ञानपरंपरेने न्यायाला व्यापक अर्थ दिला आहे. योग्य विचार करणे, प्रमाण तपासणे, तर्काच्या आधारे निष्कर्ष काढणे, नियमांचे पालन करणे आणि दुसऱ्याशी उचित वर्तन करणे या सर्वांचा समावेश न्यायाच्या संकल्पनेत होतो. म्हणूनच न्याय हा केवळ न्यायाधीशांकडून दिला जाणारा निवाडा नाही, तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारांत, निर्णयांत आणि आचरणात जपायचे एक मूल्य आहे. म्हणूनच संविधानाचा आदर हा देखील न्याय्य आहे!