Friday, September 20, 2024

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित होणार

Share

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Pune International Airport) नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी दिली.

चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हे टर्मिनल कार्यान्वित होऊन त्याचा वापर केला जाईल असे वाटत होते. मात्र, नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु होती.

याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ‘सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखल होत असून नव्या टर्मिनलमध्ये इनलॅंड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली. याची तांत्रिक ही प्रक्रिया वेगाने सुरु असून तातडीने पूर्ण केली जात आहे. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी १४ जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे’

अन्य लेख

संबंधित लेख