Wednesday, January 15, 2025

कबड्डी: अस्सल खेळ मराठी मातीचा !

Share

आज (२४ मार्च) जागतिक कबड्डी दिन आहे. कबड्डी हा भारतात घराघरात परिचित असलेला खेळ आहे. अनेकांनी आपल्या लहानपणी कधी ना कधी हा खेळ खेळलेला आहे किंवा हा खेळ कसा खेळायचा हे माहित आहे. असे म्हटले जाते की, जसे बदकाचे पिलू अगदी सहजपणे पाण्यात शिरल्यानंतर तरंगते, त्या प्रमाणे महाराष्ट्रातील मुले कबड्डी हा खेळ खेळतात, कारण खेळायला कुठलीच साधने, साहित्य किंवा सामग्री लागत नाही. एका छोट्याश्या क्रीडांगणात कबड्डी हा खेळ खेळला जाऊ शकतो.

कबड्डीचा उगम पूर्व-ऐतिहासिक काळापासूनचा आहे. हा खेळ वेगवेगळ्या स्वरूपात खेळला जातो. मूलतः ह्या खेळाचे अस्तित्व महाभारतात आणि हिंदू पौराणिक कथांमध्ये आढळून येते. पूर्वीच्या काळात हा खेळ मनोरंजनासाठी वापरला जात नसे तर शारीरिक शक्ती व स्वतःचे सामर्थ्य वाढवण्यासाठी तसेच आत्मरक्षणाची वृत्ती वाढवण्यासाठी खेळला जात असे.

कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवून देण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा होता. कबड्डी हा भारतातील स्वदेशी खेळ म्हणून प्रथम ज्ञात माहितीनुसार महाराष्ट्रात १९२१ मध्ये ‘संजीवनी’ आणि ‘जैमिनी’ ह्या दोन प्रकारांचा एकत्रित स्वरूपात आराखडा तयार करण्यात आला आणि स्पर्धांसाठी त्याचा उपयोग करण्यात आला. त्यानंतर १९२३ मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली, त्यातून १९२१ मध्ये तयार केलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. सुधारित नियम १९२३ मध्ये आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेदरम्यान लागू करण्यात आले.

इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती, यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

महाराष्ट्रातील आधुनिक कबड्डीचा इतिहास ८० वर्षांहून अधिक जुना आहे. शंकरराव उर्फ ‘बुवा’ साळवी, ज्यांना “कबड्डी महर्षी” म्हणून ओळखले जाते, हे कबड्डीच्या अग्रगणींपैकी एक आहेत की ज्यांनी देशभरातील खेळाला एकरूप केले. १९७० च्या दशकात खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी जपान आणि नेपाळला गेलेल्या महाराष्ट्र संघासह जागतिक स्तरावर या खेळाच्या विस्तारासाठी त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे होते. अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी महाराष्ट्राचे नाव गौरवांकित केले आहे. शकुंतला खटावकर, अभिलाषा म्हात्रे, माया काशिनाथ, शांताराम जाधव, राजू भावसार यासारख्या महिला आणि पुरुष या दोन्ही प्रकारातील दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्राने दिले आहेत. त्यांचा शिव छत्रपती आणि अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले आहे.

बुवा साळवी यांनी काही दशकांपूर्वी केलेले प्रयत्नामुळे या खेळाला लाभलेले ‘नववैभव’ आणि परिणाम आता दिसत आहेत, कारण एकट्या मुंबई शहरात आता ३०० पेक्षा अधिक कबड्डी संघ (क्लब) आहेत. मुंबईच्या उपनगरात ३०० कबड्डी संघ आहेत, तर ठाण्याच्या शेजारील जिल्ह्यात २०० हून अधिक संघ आहेत आणि पुणे जिल्ह्यात जवळ-जवळ तेवढेच संघ कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कबड्डी संघ आहेत. या जिल्ह्यांमध्ये संख्येने अधिक संघ नसले तरी त्या त्या जिल्ह्यात किमान संघ असतील. प्रत्येक शाळेत कबड्डी संघ असतो. मुले नियमितपणे खेळत असतात. खेळ वाढण्यासाठी महाविद्यालये प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करतात.

कबड्डी हा केवळ महाराष्ट्रातील एक खेळ नसून त्याला मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा राज्यात वेग-वेगळे उत्सव किव्हा गावाच्या जत्रा असतात तेव्हा स्थानिक प्रदर्शन म्हणून कबड्डी स्पर्धा होतात. या स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडू स्थानिक ‘हिरो’ असतात. व्यवसायातील लोक उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षीस देतात – कारपासून घरापर्यंत – आणि ही परंपरा कित्येक वर्षे सुरू आहे.

याचेच एक मुख्य फलित म्हणजे “प्रो कबड्डी लीग”चा प्रभाव. जेव्हा २०१४ मध्ये प्रो कबड्डी लीगच्या रूपाने देशी खेळांचे ‘ग्लॅमरीकरण’ आले, तेव्हा अनेक तरुण ह्या खेळाकडे अधिक आकर्षित झाले. गेल्या दशकात प्रो कबड्डी लीग ज्या उंचीवर पोहोचली आहे त्याबद्दल अनेक ज्येष्ठ खेळाडू खूप आनंदित आहे. कारण त्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना सर्वोच्च स्थान गाठता आले आहे. रिशांक देवडिगा, पंकज मोहिते (पुणेरी पलटणचा क्रायसिस मॅन), संकेत सावंत, नीलेश शिंदे, विशाल माने, आकाश शिंदे, बाजीराव हेगडे, काशिलिंग आडके, नितीन मदने, गिरीश मारुती एर्नाक आणि इतर यांसारख्या अनेक पीकेएल स्टार्सचे माहेर महाराष्ट्रात आहे.

“महाराष्ट्रात कबड्डीची व्याप्ती इतकी मोठी आहे की भारतात सर्वात जास्त व्यावसायिक क्लब या खेळाचे आहेत. कबड्डी हा एक स्वस्त खेळ आहे आणि कोणीही खेळू शकतो. जेव्हा आम्ही घराबाहेर पडायचो तेव्हा सगळीकडे कबड्डी सुरू होता. आमच्यासाठी हे स्वाभाविक होते. प्रो कबड्डी लीगमुळे महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण अशा सर्वच क्षेत्रातील अनेक तरुण मुलं-मुली या खेळाला खूप गांभीर्याने घेतात,” असे ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक राजेश पाडावे सांगतात.

राजेश कोरडे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख