पुणे : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीची (Wadgaon Sheri Assembly Constituency) जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्याने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे भाजप पक्ष सोडत असल्याची चर्चा होती. मात्र, मुळीक यांनी रविवारी उशिरा या अफवा फेटाळून लावल्या, त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
जगदीश मुळीक यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत लिहिले कि, ‘मी भारतीय जनता पार्टी सोडणार’ आणि इतर पक्षात जाणार असे कपोलकल्पित वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले असून या बातमीत सुईच्या टोकाइतकेही तथ्य नाही. आमची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘राष्ट्र प्रथम’चा विचार आमच्या नसानसांत भिनलेला आहे, त्यामुळे पार्टीच्या मूळ विचारापासून आम्ही एक पाऊलही मागे हटणारे नाही, शिवाय पार्टीच्या पलिकडे राजकीय विचार करु, हा विचार मनालाही शिवत नाही, शिवणारही नाही,” असं त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या मुळीक यांनी मतदारांना पत्र लिहून आगामी निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वडगाव शेरीतील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा प्रचार करणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.