Monday, November 24, 2025

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; “मोहब्बत की दुकान”चा खरा चेहरा उघड!

Share

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द वापरले.

या टीकेमुळे भाजप (BJP) नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, राज्याच्या राजकारणातील भाषेचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोनिया ते सपकाळ व्हाया राहुल, आणि नरेंद्र ते देवेंद्र

‘मोहब्बत की दुकान’ या नावाने द्वेषाची गरळ ओकत प्रत्यक्षात विरोधकांबद्दल अत्यंत हीन पातळींवर अपप्रचार करायचा, हे काँग्रेसचे वैशिष्ट्य असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत काँग्रेस नेत्यांच्या अपमानजनक वक्तव्याचा समाचार घेतला.

उपाध्ये म्हणाले, सोनिया गांधींनी १ डिसेंबर २००७ रोजी नरेंद्र मोदीचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ असा केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी नरेंद्र मोदीचा उल्लेख ‘चौकीदार’ असा केला. सहिष्णुता हीच ओळख असणाऱ्या हिंदू समाजाने काँग्रेसला जागा दाखवत सर्व स्तरावर पराभूत केले, अशी आठवणही त्यांनी येवेळी करून दिली.

आता उरली सुरली काँग्रेस संपविण्याचा निर्धार सोनिया व राहुल गांधींची परंपरा चालवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला असावा. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘दरिंदा’ असा केला आहे.

“भाजपा गावपातळीवरील छोट्या कार्यकर्त्यांकडून एखादा चुकीचा शब्द गेला तर आकांडतांडव करणारे विचारवंत, पत्रकार यावर मात्र निवांत आहेत,” असे म्हणत त्यांनी माध्यम आणि विचारवंतांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले.

सपकाळ यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसवर जोरदार पलटवार होण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख