Wednesday, December 3, 2025

गुन्हेगारी आणि मुले- धर्म आणि समाज जीवन

Share

विशेषतः समाजातील गुन्हेगारीवर आपण जेव्हा बोलतो, तेव्हा त्याबाबतचे प्रश्न आणि स्वरूप वेगळ्या दृष्टीकोनातून समजावून घ्यावे लागेल. अन्यथा त्याचे विश्लेषण अपूरे ठरेल.

समाज ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था आहे. कोणत्याही सामाजिक समस्या सोडविणे हे सहज सोपे नसते. अनेक घटक त्यात भूमिका बजावीत असतात. शिवाय आपल्या देशात अनेक शतके परकीय राजवट होती, आपला सामाजिक ताणा-बाणा ओळखू न येण्याइतका बदलून गेला. आपल्या मुळातील श्रद्धा, भाषा, संस्कृती, अगदी जीवन व्यवहार बदलण्याचा मोठा रेटा होता. प्रत्येक स्थानिक गोष्ट ही कमी प्रतीची आहे असे ठसवले गेले, त्यामुळे एक आंतर द्वंद्व किंवा अस्तित्वाची लढाई जन्माला आली.

धर्म म्हणजे एक समाजाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. आपले अस्तित्व धारण करणार्‍या या तत्त्वांबद्दल जागृती निर्माण करणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे धर्माची संकल्पना फार काळजीपूर्वक हाताळली पाहिजे.

दोन वेगळ्या वेळी व भिन्न ठिकाणी घडलेल्या घटना कदाचित या संकल्पनेच्या स्वरूपावर प्रकाश टाकून त्या समजायला मदत होईल असे वाटते.

२०१० साली जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात एका राष्ट्रीय पातळीवरील संमेलनासाठी कोलकात्याला गेलो होतो. जादवपुर विश्वविद्यालयात राहण्याची व्यवस्था होती. रोज आम्ही सकाळी लवकर उठून चालायला बाहेर पडायचो, शिवाय रात्रीही पाय मोकळे करायला जात असू.  सर्व दिशांना चालत जात सगळा परिसर पहिला. आवारात ३ ठिकाणी देवी सरस्वती बसवलेली पाहिली. दोन दिवसांपूर्वी कार्यक्रम संपला होता, मोठे आश्चर्य वाटले. तेव्हा बंगालमध्ये डावी राजवट होती, धर्म म्हणजे अफूची गोळी असे वर्णन केले जात असे. तरीही सरस्वती पूजेला विरोध नव्हता. खरे म्हणजे अशा श्रद्धेला किंवा पूजेच्या संकल्पनेला जागाच नसलेल्या सिद्धांताचे या पूजेच्या कल्पनेशी कसे जुळले असावे हा प्रश्न होता. पण हे असे अजब मिश्रण अस्तित्वात आहे. दुर्गा पूजेलाही विरोध नाही. आम्हाला या सार्‍याचे कमालीचे नवल वाटले. मार्क्सवाद आणि धर्म यांचे सहअस्तित्व होते. बाकी कुठे ना कुठेतरी चालणारे संप होते जे त्या विचारधारेशी व व्यवहाराशी सुसंगतच होते. एकदा तर कॅन्टीनपुढे निदर्शने चालू होती, आत जायलाच मज्जाव होता. मात्र पूजा मांडल्याबद्दल कुणाचाच विरोध दिसला नाही.

 दुसर्‍या बाजूला लोकमान्य टिळकांनी जिथे गणेशोत्सव चालू केला त्या पुणे शहरात काही शाळांमध्ये गणेशोत्सव साजरा होत नाही. एका पूर्व प्राथमिक शाळेत जाणारे मूल नवरात्रीत भेटले, नवरात्र महोत्सव शाळेत साजरा होत नसल्याचे लक्षात आले. अर्थात गणेशोत्सवाची शक्यता नव्हतीच. “मुलांना आरती किंवा काही स्तोत्रे शिकवली जातात का?” उत्तर काय येणार हे माहीत असूनही मी नकळत विचारले. उत्तर आले, ” पण मोठ्या कवींच्या अर्थपुर्ण कविता पाठ करून घेतात शाळेत”. मी मनोमन आश्चर्य करीत होते की, आरती व स्तोत्रे पाठ करण्याइतकीही अर्थपूर्ण नसतात का?  मग लक्षात आले की, शाळेचे व्यवस्थापन अगदी घटनेचे तंतोतंत पालन करते आहे, धर्मनिरपेक्ष पण आहे.

आपण आपल्या मुलांना आपण आपल्या वारसा आणि सनातन ठेवा यापासून वंचित करतो आहोत का? हा प्रश्न माझ्या मानत रेंगाळतच राहिला. जर मार्क्सवादात दुर्गा आणि सरस्वती पूजेला जागा असू शकते तर गणेश उत्सव का अडचणीचा वाटावा? महाराष्ट्रात गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि असे अनेक उत्सव उत्साहाने साजरे केले जातात, मग शाळेत त्याला अवकाश न देता मुलांच्या मनात गोंधळ का निर्माण करतोय आपण?

महाविद्यालयात तर या सोहळ्यांना जागा नसतेच. दीप प्रज्वलन करायला विरोध करणारे प्राचार्य पाहिलेले मला आठवतात, सुदैवाने त्यांना यश मिळाले नाही.

असे उत्तर ज्याने सर्वांना विचलित केले व चिंतन करायला भाग पाडले

व्यवसाय मार्गदर्शन करणार्‍या एका शिक्षकाच्या वर्गात त्याने एकदा विलक्षण अस्वस्थ शांतता अनुभवली. कधी कधी वर्गातील चर्चा एकदम अनोळखी वळण घेते. शिक्षकाने बोलण्याच्या ओघात वर्गात प्रश्न विचारला, किती जणांनी गीता वाचली आहे आणि त्यातील दोन श्लोक पाठ आहेत? यावर कोणीच प्रतिसाद देऊ शकले नाही. वर्गातल्या मुस्लिम विद्यार्थिनीला हाच प्रश्न विचारला तर ती म्हणाली, मी नक्कीच कुराणातील आयत (श्लोक) म्हणून दाखवू शकते, कारण मी रोज कुराण वाचतेच.

या उत्तरावर शांतता अधिक गहिरी झाली, या वस्तुस्थितीला कसे सामोरे जावे कोणाला कळेना. आता त्या शांततेने मने बधिर झाली. असा बराच वेळ गेला, शिक्षकाने देखिल सर्वांना त्या धक्क्यातून सावरायला वेळ दिला.

थोडे संतुलन प्रस्थापित झाले, मग पुन्हा संवाद सुरू झाला. गीतेसारखी पुस्तके तरुण वयातच का वाचली पाहिजेत व त्यामुळे आपला दृष्टीकोन कसा बदलतो यावर शिक्षकाने चर्चा केली.

आपल्याला भारतीय तत्त्वज्ञान वारसा हक्काने मिळाले आहे, पण शास्त्र किंवा तंत्रज्ञान आपण शिकलो नाही तरी त्याचा प्रभाव आपल्यावर पडतोच. तत्त्वज्ञानाचे तसे नाही, ते समजून घेऊन व्यवहारात आणले तर त्याचा उपयोग होतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

आपण भारतीय असे म्हणू शकत नाही की, या संपत्तीची आपल्याला जाणीव नव्हती. त्याचे अस्तित्व नाकारल्याने किंवा अवमानना केल्याने आपलाच तोटा आहे. ब्रिटिशांच्या राजवटीच्या प्रभावाखाली आधीच आपण जे जे म्हणून हिंदू किंवा सनातन आहे त्या प्रत्येक गोष्टीचा अव्हेर केला आहे. परिणाम स्वरूप आपण आपली ओळख विसरलो आहोत.

चर्चा पुन्हा मोकळेपणाने सुरू झाल्यावर, सगळ्यांनी मान्य केले की, घरातील किंवा आजुबाजुला असलेल्या व्यक्तींशी तत्त्वज्ञान किंवा संस्कृती यावर बोलणे होत नाही. अर्थातच त्यांचे मोठेपण थोडक्यात सांगणे सोपे नाही. काही मुले जरी एकत्र कुटुंबात राहत असली तरी कधी हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी नसतो असा मुलांचे म्हणणे होते.

आपली शिक्षणपद्धत देखील यावर मौन असते. बर्‍याचदा अशा मुद्द्यांवर बोलणे हे अर्थहीन व मागासपणाचे लक्षण मानले जाते, त्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. आपल्या धर्मनिरपेक्षता देखील याने धोक्यात येते. जे जे म्हणून हिंदुत्वाशी निगडित आहे त्याचा अस्वीकार हीच आधुनिकता असे मानले गेले.

आता ही आपली जबाबदारी आहे की, आपण पुढच्या पिढीला आपली संस्कृती व तत्त्वज्ञान याची ओळख करून दिली पाहिजे. या गोष्टी आपल्या जीवनाला पायाभूत आहेत.

 भौतिक यश मिळते पण त्याने मानसिक शांती लाभते असे अनेकदा घडत नाही. अशा कोंडीमध्ये सनातन तत्त्वे दिशा दाखवतात, तोल सावरायला मदत होते. आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदतीचा हात देऊ शकलो तर मनःशांती मिळू शकते याची जाणीव होते. ‘मी नाही, आम्ही’ हा मंत्र भारतीय तत्त्वज्ञानाचे सार आहे. हे सारे शिक्षण प्रणालीत समाविष्ट करायला हवे. उच्च शिक्षणात देखील या सर्वांची चर्चा होऊ शकेल असे व्यासपीठ हवे. फार उशिर होण्यापूर्वीच हे आपण व्यवहारात आणणे गरजेचे आहे.

सनातन जीवन पद्धत कोणत्याही शाश्वत अशा प्रथा, परंपरा किंवा आदेश देत नाही, समाजाचे धारण करणारी तत्त्व हीच फक्त शाश्वत मानली जातात. अन्य सर्व गोष्टी कालानुरूप बदलतात हे गृहित धरले आहे. त्यामुळे सनातन किंवा धर्म संकल्पना ही इंग्रजी RELIGION या शब्दाचे भाषांतर नव्हे. सनातन तत्त्वे आपल्याला प्रत्येक पायरीवर मार्ग दाखवितात.

ब्रिटिशांचा प्रभाव असल्याने आपले हे संचित पूर्ण निरुपयोगी आहे असे आपण मानू लागलो. भारताकडे शास्त्र, सामाजिक संस्था, शिक्षण पद्धत असे काही नव्हते असेही आपल्या मनावर बिंबवले गेले. ही सगळी ब्रिटिशांची देणगी आहे असेच सांगितले गेले व आपण त्याला बळी पडलो.

मुघल राजवटीत आपल्या सामाजिक अवकाशाचा अतिशय संकोच झाला. त्यांचा धर्म, संस्कृती, भाषा व अन्य प्रणाली आपल्यावर थोपल्या गेल्या. यातूनही ‘स्व’ चा विसर पडला.

सह अस्तित्व ही भारतीय जीवन पद्धती होती, नदी, वृक्ष तसेच भूमी या सार्‍यांची पूजा होई. हा कुचेष्टेचा विषय नसून याने समतोल साधला जातो. केवळ भौतिक साध्य केंद्र स्थानी मानलेले नाही.

प्रत्येकाला विकासासाठी पुरेशी जागा मिळणे महत्त्वाचे आहे. अर्थात आपण ते समजून घेऊन आचरणात आणणे गरजेचे आहे. हा विचार पुस्तकात बंदिस्त राहून उपयोगी ठरत नाही.

आपण जागृत होणे आवश्यक आहे, आपल्या भावी पिढ्यांसाठी हे करायलाच हवे.

-विद्या माधव देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख