Tuesday, July 15, 2025

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Share

नागपूर : विदर्भातील नागपूर वन विभाग (Nagpur Forest Department), पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी ‘मार्वल’मार्फत एका विशेष सामंजस्य करारावर आज नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या उपस्थितीत ‘मार्वल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार व व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कराराचे आदानप्रदान केले. कृत्रीम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर (Effective use of AI करुन अपघात, गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दूरदृष्टीतून ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी

या करारांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या भोवताली असलेल्या गावाच्या सीमेवर एकूण 3 हजार 150 कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित हे कॅमेरे लावण्यात येतील. गावाच्या दाट वस्तीच्या ठिकाणी सायरन उभारुन ते वायरलेसद्वारे या कॅमेऱ्यांशी जोडले जातील. कॅमेरे वाघ, बिबट्यांना स्वतंत्र ओळखतील असे तंत्रज्ञान या कॅमेऱ्यात असणार आहे. वाघ अथवा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाल्याबरोबर गावामध्ये या कॅमेऱ्याशी जोडलेले सायरन गावकऱ्यांना सावध करतील. करारानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पात 875, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 525, नवेगाव व्याघ्र प्रकल्पात 600 तर नागपूर वनक्षेत्रात 1 हजार 145 हे कॅमेरे व सायरन जोडले जातील.

नागपूर विभागात वरचेवर वाढणारे वाघांचे हल्ले लक्षात घेऊन पालकमंत्री बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यापूर्वी विविध आढावा बैठकीमध्ये या बाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. वाघांचे हल्ले शाश्वतरित्या थांबवता यावेत व यात होणारी मनुष्यहानी टाळता यावी, यादृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रभावी वापर करु असे त्यांनी सांगितले होते. याबाबत राज्याचे वन मंत्री यांच्या समवेत एक व्यापक बैठक घेऊन या कराराबाबत निर्णय घेण्यात आला होता. संपूर्ण नियोजनानंतर आज या करारावर स्वाक्षऱ्या करुन लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी वन विभाग व मार्वल कंपनीला दिले.

अन्य लेख

संबंधित लेख