Monday, March 2, 2026

हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ

Share

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात सत्तेचा अहंकार बाजूला ठेवून सेवेचा आदर्श पाहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये संत-महंतांना आणि भाविकांना भोजन वाढून सेवा दिली. शीख परंपरेतील ‘सेवा आणि समता’ या मूल्यांचा सन्मान करत दोन्ही नेत्यांनी सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे या उपक्रमात सहभाग नोंदवला.

खारघरमधील ओवे मैदानावर आयोजित या सोहळ्यात सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून, याठिकाणी जात-पात आणि धर्माच्या भिंती ओलांडून लाखो भाविक एकाच पंक्तीत बसून महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

आठ भव्य लंगर आणि हजारो स्वयंसेवक
आयोजकांनी भाविकांच्या सुविधेसाठी आठ वेगवेगळ्या ठिकाणी भव्य लंगरची व्यवस्था केली आहे. यामध्ये,
१. भाई जैताजी लंगर सेवा
२. राधास्वामी ब्यास लंगर सेवा
३. बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा
४. संत सेवालाल महाराज लंगर सेवा
५. बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा
६. भगवान झुलेलालजी लंगर सेवा
७. भाई मतीदासजी लंगर सेवा
८. गुरु नानक देवजी लंगर सेवा

या आठही केंद्रांवर हजारो स्वयंसेवक अहोरात्र सेवा बजावत आहेत. पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी या सुव्यवस्थित लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या अधिकच वाढल्याचे आयोजकांनी सांगितले.

भक्ती आणि शक्तीचा जयघोष
कार्यक्रमाच्या मुख्य मंडपात श्री गुरु ग्रंथ साहिबजींच्या पावन उपस्थितीत कीर्तन आणि धार्मिक विधी सुरू होते. संपूर्ण परिसर “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल” या जयघोषाने दुमदुमून गेला होता. लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून ती समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी एक पवित्र परंपरा आहे, हे या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.

अन्य लेख

संबंधित लेख