गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली की ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भाग घेणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. याकडे एका व्यक्तीने सुनियोजित पद्धतशीर काम केले नसणार असे न म्हणता वेगळया प्रकारे पहावे लागेल. अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे हा. अनेक अंगांनी पोखरलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेव्हढे लक्ष घालणे गरजेचे आहे तेव्हढे महत्व दिले जात नाही असे म्हणावे लागेल.
या व्यवस्थेचे तेज हरवत चालले आहे. एका बाजूला सरकार उत्पन्नाचा मोठा भाग त्यावर खर्च करते आहे, दुसर्या बाजूला खाजगी मार्गदर्शन करणार्या संस्थांचे महत्व वाढते आहे, त्या फोफावत चालल्या आहेत. पालक आणि मुले नावाजलेल्या संस्थांमधे प्रवेश मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात, पण एकदा प्रवेश मिळाला की अगदी पूर्व प्राथमिक वर्गापासून बाहेरच्या मार्गदर्शनाची मदत घेतातच. अर्थातच त्यांचा असा समज झाला आहे की मुलांच्या यशाला याच संस्थांचे मार्गदर्शन कारणीभूत ठरते, त्यामुळे शाळेकडे असलेला त्यांचा ओढा हळु हळू संपतोच आहे. मग जेंव्हा काही आव्हान उभे राहते तेंव्हा बाह्य घटकांची मदत घेतली जाते.
अर्थात काही शिक्षण संस्था यावर मात करण्यासाठी नवे प्रयोग करीतच आहेत. नवे आदर्श उभे रहावे यासाठी प्रयत्नशील आहेत. काही संस्थांना यात यश निश्चित मिळाले, पण देशातील शिक्षण व्यवस्थेच्या आकार पाहता आणि त्यावर होणार्या परिणामाचा विचार करता ही संख्या फारच कमी आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ हे एक असे व्यासपीठ आहे, ज्यायोगे आपले पंतप्रधान मुलांना भेटतात (आभासी स्वरूपात का होईना ), त्यांचे म्हणणेही समजून घेतात, आपले अनुभव आणि विचार त्याच्या समोर मांडतात. मात्र विद्यार्थ्यांना वाटते, त्यांच्या प्रवासात शिक्षण व्यवस्थेची फार भूमिका राहिली नाही, त्यामुळे शाळांच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले जाण्याची प्रक्रिया घडताना दिसत नाही. माझ्या पिढीचा व नंतरच्या पुष्कळ पिढ्यांना अशा सर्वोच्च नेतृत्व करणार्या प्रमुख व्यक्तींशी अशा प्रकारे संवाद साधण्याची संधी नव्हतीच. मात्र ज्या मुलांना आता ती उपलब्ध आहे, ती या व्यवस्थेशी जोडलेली नाहीत. कदाचित शेवटी प्रयत्नांनी ही संख्या वाढेलही, पण प्रश्न आहे तसाच आहे.
एक परिणामकारक संस्था उभी राहायची असेल तर तिच्यामध्ये बदल, दुरुस्ती व जबाबदारी घेण्याची व्यवस्था अंगीभूत असली पाहिजे. शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे जे समाजाचे भविष्य घडवू शकते, त्यामुळे त्याची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक झाले आहे.
शिक्षकांचे प्रशिक्षण वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. आत्ता कागदावर जरी सारे असले तरी व्यवहारात मात्र त्यातील काही दिसत नाही. योग्य प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध करणे या परिणाम आधारित पद्धतीचा वापर मूल्यमापनात करावा लागेल. हे सारे सोपे नाही, पण या कष्ट करण्याला पर्याय नाही. आत्ता जर लक्ष दिले नाही तर या सार्या व्यवस्थेचा बोजवारा उडेल.
यात पालकांनाही सामावून घ्यावे लागेल. त्यांना परिस्थितीवश बाहेरून मुलांसाठी बाह्य मार्गदर्शन घेणे भागच आहे, कारण त्यांना स्वतःला वेळ नाही किंवा ते मार्गदर्शन करायला असमर्थ आहेत. अभ्यासक्रमपलीकडे अनेक मुद्दे व घटक असतातच. एकाच लेखात त्या सर्वांची चर्चा होऊ शकत नाही,पण म्हणून त्याची गरज मात्र डोळ्याआड करता येत.
आपला देश प्रगती करतो आहे. आपण वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करतोच आहे. सर्वच पातळीवर धोरणे बदलण्याचा प्रयास देखील होतो आहे. शिक्षण हा पायाभूत मुद्दा आहे. त्याला प्राधान्य द्यायलाच हवे. इतकेच.
– विद्या माधव देशपांडे