Thursday, January 1, 2026

मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे…

Share

परवाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तक ला जय हिंद उत्सवात दिलेली एक मुलाखत ऐकण्यात आली…

आपल्या मराठी भाषेच्या आग्रहाचा मुद्दा पटवून देताना… त्यांनी १९७१ साली झालेल्या बांगलादेश निर्मितीची जी कारण मिमांसा राज ठाकरे यांनी केली… ते विश्लेषण ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले… कंठ दाटून आला… सर्वांगावर रोमांच उभे राहिले…

“बांगलादेशवासीयांनी आम्हाला वेगळे मुस्लिम राष्ट्र द्या म्हणून मागणी केली नाही तर… आमची भाषा वेगळी आहे म्हणून आम्हाला वेगळे राष्ट्र हवे आहे… अशी मागणी केली”…

अरेच्चा… मग बांगलादेशच्या मुक्ती दिनापूर्वी म्हणजे १६ डिसेंबर १९७१ पूर्वी या देशाचे नाव काय होते?… थोडा इतिहास चाळला तर लक्षात आले…

१४ ऑगस्ट १९४७ पासून १६ डिसेंबर १९७१ मुक्ती दिनापर्यंत आज आपण ज्याला बांगलादेश म्हणतो तो “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान (पूर्व)” म्हणून अस्तित्वात होता… आपण त्याला “पूर्व पाकिस्तान” म्हणून ओळखत होतो…

म्हणजे धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे इतिहासात पहिल्यांदा विभाजन झाले तेव्हा… १४ ऑगस्ट १९४७ रोजी याच पूर्व पाकिस्तानच्या बंगाली भाषिक जनतेने धर्माच्या आधारावर… लक्षावधी हिंदूंची नृशंस कत्तल करून… आधीच पूर्व पाकिस्तान पदरात पाडून घेतले होते… भाषेच्या आधारावर नाही तर धर्माच्या आधारावर…

एकदा धर्माच्या आधारावर वेगळी भूमी वेगळा देश मिळाल्यावर… परत त्याच धर्माच्या आधारावर… तीच भूमी तोच देश कसा मागता येऊ शकतो?…

१९४७ ते १९७१… २५ वर्षे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे इस्लामच्या आधारावर एक देश म्हणून ओळखले जात होते… पाकिस्तान मध्ये १९७० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळूनही पूर्व पाकिस्तानच्या शेख मुजबूर रहमान यांच्या आवामी लीगला पश्चिम पाकिस्तानने सत्ता सोपवण्यास नकार दिल्याबरोबर… पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोषाचा आगडोंब उसळला आणि बंगाली भाषेच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी झाली… क्षणभर कल्पना करा जर पश्चिम पाकिस्तानने शेख मुझिबूर रहमान यांना सत्ता सोपवली असती तर… ना पूर्व पाकिस्तानच्या जनतेने बंगाली भाषेच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी केली असती ना आज बांगलादेश अस्तित्वात असता… आजही पूर्व व पश्चिम पाकिस्तान आपल्या “इस्लामी उम्मत”च्या आधारावर सुखाने नांदत असते…

१९७१ भाषेच्या आधारावर वेगळ्या बांगलादेशच्या झालेल्या मागणीचा इतिहास सांगताना… १९४७ साली धर्माच्या आधारावर झालेल्या फाळणीचा इतिहास राज ठाकरे सोईस्करपणे लपवत आहेत… अर्धसत्य सांगून ते इतिहासाशी प्रतारणा करत आहेत… बांगलादेश निर्मितीचा इतिहास त्यांना सांगायचा असेल तर तो त्यांनी १४ ऑगस्ट १९४७ पासूनचा… धर्माच्या आधारावर झालेल्या

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीच्या इतिहासापासून सांगावा…

बांगलादेशच्या जनतेचे आपल्या इस्लाम धर्मापेक्षा बंगाली भाषेचे एवढेच प्रेम उतू जात असेल तर… तीच बंगाली भाषा बोलणाऱ्या आपल्याच देशाच्या दिपू चंद्र दास या बंगाली तरुणाला अक्षरशः ठेचून मारून.. त्याचे पार्थिव झाडाला उलटे लटकवून ते जाळण्यापर्यंतचे राक्षसी कृत्य… त्याच्या बंगाली भाषिक सहकाऱ्यांनी का केले?… या प्रश्नाचे उत्तर देखील राज ठाकरे यांनी द्यावे… पण ते देणार नाहीत… कारण दिपू चंद्र दास याचे “हिंदू असणे” हा  त्याचा “बंगाली भाषिक” असण्यापेक्षा मोठा गुन्हा होता… धर्माच्या द्वेषाने भाषेच्या प्रेमावर मात केली होती…

राज ठाकरे यांना देखील हे उत्तर ठाऊक आहे पण… ते हे सत्य सांगणार नाहीत कारण त्यासाठी त्यांना “हिंदू” हा शब्द उच्चारावा लागेल… आणि आपण “हिंदू” हा शब्द उच्चारला तर मुंबई महापालिका आपल्या हातातून निसटेल अशी अनामिक भीती त्यांना वाटते आहे… त्यांनी पूर्ण सत्य सांगावे… अर्धसत्य सांगावे… किंवा पूर्ण असत्य सांगावे… मुंबई महापालिका अशीही त्यांच्या हातून निसटली आहे…

राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर “मत चोरी” चा आरोप केल्याबरोबर… आपल्या मनसे सैनिकांना… ” बघा मी सांगत होतो ना… आपल्याला मते मिळतात पण ती मतपेटीतून चोरीला जातात”… म्हणून  ज्ञानामृत पाजणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडून आम्हाला कसलीच अपेक्षा नाही… सत्याची तर अजिबात नाही…

फक्त इतकं खोटं रेटून बोलणाऱ्या राजनेत्याच्या हातात आपण मुंबई महापालिका सोपवायची का?… याचा गंभीरपणे विचार मुंबईकरांनी करावा एवढीच अपेक्षा आहे…

मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे…

– मालवणी खवट्या

याआधीचे भाग वाचा –

१) २४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती…

२) निवडणूक MM नाही HMचं होणार…

३) हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे…

अन्य लेख

संबंधित लेख