Wednesday, September 23, 2026

आयुर्वेद: आजीबाईच्या बटव्यातील आधुनिक विज्ञान

Share

लहानपणी सर्दी झाली की आजी हमखास हळदीचं दूध द्यायची, पोट बिघडलं की ओवा-जिऱ्याचं पाणी असायचं, आणि जखम झाली की हळद-चुना लावला जायचा. आजही प्रत्येक भारतीय घरात असा एक आजीबाईचा बटवा असतोच! त्यात हळद, आले, तुळस, ओवा यांसारखे साधे पदार्थ असतात, पण त्यांच्यामागे दडलेले असते हजारो वर्षांचे वैद्यकीय शहाणपण! आज आधुनिक विज्ञानही या शहाणपणाला दुजोरा देत आहे आणि त्यामागील वैज्ञानिक शास्त्र मान्य करत आहे. या शास्त्राचे नाव आहे आयुर्वेद. आज, कित्येक हजार वर्षे जुना असणारा आयुर्वेद, आधुनिक विज्ञानाच्या कसोटीलाही उतरत आहे.
आपल्या आजूबाजूला पाहिल्यास सृष्टीचा खजिना जागोजाग पसरलेला आहे. त्यातील कितीतरी अद्भुत गोष्टी मानवाला अजूनही पूर्णपणे ज्ञात नाहीत. औषधी वनस्पती आणि द्रव्यांचा असाच एक विपुल खजिना आपल्या आजूबाजूच्या परिसरात शतकानुशतके विखरून पडलेला आहे. तो जाणून घेण्याची त्याचे ज्ञान करून घेण्याचे सूत्र किंवा किल्ली म्हणजेच आयुर्वेद होय.
विद् म्हणजे जाणणे, या संस्कृत धातुपासून वेद हा शब्द निर्माण होतो. ज्ञान किंवा विद्या असा या शब्दाचा मूळ अर्थ आहे. या संदर्भात आयुर्वेद या शब्दाची फोड केल्यास आयु: + वेद म्हणजेच आयुष्याचे किंवा जगावे कसे याचे ज्ञान किंवा विद्या म्हणजेच आयुर्वेद असा अर्थ सहजच समजून जातो. आयुष: वेद: आयुर्वेद: अशीच त्याची व्याख्या केलेली सापडते. निरोगी आयुष्य जगण्यासाठी हितप्रद आणि हानीकारक द्रव्ये, गुण आणि कर्मे कोणती हे समजावून सांगणारा वेद म्हणजे आयुर्वेद होय. जीवनाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या शास्त्राची निर्मिती आणि उभारणी होत गेली आहे. काही विद्वानांनी याला पाचव्या वेदाचा दर्जा दिला आहे. तर काही जण याला अथर्ववेदाचा उपवेद मानतात.

आयुर्वेदाची परंपरा
प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या स्वयंभू ब्रह्माने प्रजेच्या परिपालनासाठी प्रथम आयुर्वेद निर्माण केला’ अशा अर्थाचा श्लोक काश्यपसंहितेत सापडतो. विद्वानांनी मान्य केलेली आयुर्वेदाची परंपरा पुढीलप्रमाणे-
ब्रह्मदेव

दक्ष प्रजापती व भास्कर

सहा अश्वनीकुमार

इंद्र भरद्वाज

इतर ऋषि

(१) ब्रह्म‌देवाने आयुर्वेदाची लक्ष श्लोकात्मक संहिता लिहिली. तिचे नाव ब्रह्म संहिता होते. ही संहिता आज उपलब्ध नाही. ब्रह्मदेवाने आपली ही विद्या दक्ष प्रजापतीला दिली. दक्षाच्या आयुर्वेदविषयक परंपरेत सिद्‌धान्ताला तर भास्कराच्या परंपरेत चिकित्सा पद्‌धतीला प्राधान्य होते. दक्ष प्रजापतीकडून अश्विनीकुमारांनी समग्र अध्ययन केले.
(२) अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य होते. अमृत मिळविण्यासाठी औषध व योग्य स्थानी त्यांची निपज करणे, हे अश्विनीकुमारांचे विशेष कार्य होय. अश्विनीकुमारांनी वृद्ध च्यवन ऋषीला आपल्या चिकित्सेने तारुण्य प्राप्त करून दिले, ही कथा प्रसिद्ध आहे. त्यांनी आयुर्वेदावर ग्रंथरचनाही केली. मात्र ते ग्रंथ आता उपलब्ध नाहीत. ‘अश्विनसंहिता’ ‘चिकित्सासारतंत्र, ‘अश्विनीकुमार संहिता’ या त्यांच्या ग्रंथांचे उल्लेख इतर ग्रंथांत आढळून येतात. अश्विनीकुमारांनी इंद्राला आयुर्वेद शिकवला.
(३) चरकसंहितेत असे सांगितले आहे की, लोककल्याणाच्या आकांक्षेने ऋषींनी भरद्वाजास आपला प्रतिनिधी म्हणून इंद्राकडे पाठवले व इंद्राने त्याला आयुर्वेदाचा उपदेश केला. त्यानंतर सर्व ऋषींनी हा आयुर्वर्धक वेद भरद्वाजाकडून शिकून घेतला.
(४) या ऋष्गिणांमध्ये भगवान आत्रेय पुनर्वसु होते. त्यांनी आपल्या सहा बुद्धिमान शिष्यांना आयुर्वेद शिकवला. या शिष्यांमध्ये अग्निवेशाने लिहिलेली संहिता सर्वोत्कृष्ट होती. ही अग्निवेशसंहिता चरकाने पुन्हा संपादित केली, तीच आज चरकसंहिता म्हणून उपलब्ध आहे. चरक संहितेत, सूत्रस्थान निदा स्थान, विमानस्थान, शारीरस्थान, इंद्रियस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान व सिद्धि स्थान अशी एकूण आठ स्थाने आहेत.

चरकाप्रमाणेच आयुर्वेदातील प्रसिद्‌ध आचार्य आणि शल्यतंत्र पारंगत वैद्य म्हणजे सुश्रुत. सुश्रुत हा विश्वामित्राचा पुत्र होता, असे सुश्रुतसंहितेतून कळते. दिवोदास धन्वंतरीने त्याला ही विद्या शिकवली. सुश्रुताचा शल्यतंत्रावर आधारित ग्रंथ म्हणजे ‘सुश्रुतसंहिता होय. सुश्रुत हा त्वचारोपण-तंत्राचाही मोठा जाणकार होता.
धन्वंतरी ही संपूर्ण वैद्यकविश्वाची देवता मानली जाते. समुद्र मंथनाचे वेळी जी चौदा रत्ने समुद्रातून बाहेर आली, त्यात धन्वंतरीचा समावेश आहे. त्यांना विष्णूचा अवतार मानण्यात येते. ‘शिल्परत्न’ नामक ग्रंथानुसार हा तेजस्वी व चतुर्भुज असून त्याने पीतवस्त्र परिधान केलेले असते. त्याचा एक हात अभय मुद्रेत असतो आणि उरलेल्या तीन हातात कमल, अमृतघट व शल्यतंत्र ही आयुधे असतात. काही शिल्पग्रंथात शंख, चक्र, अमृतघट व जळू ही त्याची आयुधे सांगितली आहेत.
वाग्भट या आयुर्वेदाचार्याच्या काळाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. अष्टांगसंग्रह’ नावाचा आयुर्वेदावरचा ग्रंथ त्याने लिहिला. एका मतानुसार वाग्भट हा सुप्रसिद्‌ध रसवैद्य असून ‘अष्टांगहृदय’ हा त्याचा सर्वप्रसिद्‌ध ग्रंथ होय. या ग्रंथात सर्व वैद्यक शाखांचे श्लोकबद्‌ध विवेचन असून, शस्त्रक्रियेचही विस्तृत विवेचन आहे.

आयुर्वेदातील प्रमुख सिद्‌धान्त

पंचमहाभूत सि‌द्धांत, त्रिदोष निद्धांत आणि रस-वीर्य-विपाक सिद्‌धांत हे आयुर्वेदातील मुख्य सिद्‌‌धान्त आहेत. त्यातील प्रमुख घटकांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते

शरीरधातूनां प्रकृतिभूतानां तु खलु वातादीना फलमारोग्यम्,
-चरक

त्रिदोष:- प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानानुसार संपूर्ण विश्वाची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून झाली. मानवी शरीरात ही पंचमहाभूते त्रिदोष, सप्तधातू व मल यांच्या योगाने व्यक्त होतात व कार्य करतात. माणसाने भक्षण केलेल्या अन्नापासून सजीव कण बनतात व त्या कणांचे शरीरात तीन स्थूल धातू बनतात. हे तीन धातू म्हणजे कफ-पित्त व वात हे होत. हे धातू शरीराचे मुख्य आधार असून ते शरीरव्यापी असतात. त्यांच्याच संतुलनावर शरीरस्वास्थ्य अवलंबून असते. हे तीन धातू समस्थितीत असतानाच त्यांना धातू अशी संज्ञा आहे (धारणाद् धातवः) अन्यथा त्यांच्यात वैषम्य निमर्माण झाल्यावर शरीरात विकृती निर्माण होते तेव्हा त्यांनाच ‘दोष’ असे म्हणतात. (दूषणात् दोषाः।) दोष वाढून त्यांचा प्रकोप झाला की त्यांना, अथवा शरीरव्यापारात उत्पन्न होणान्या निरुपयोगी द्रव्यांना ‘मल’ अशी संज्ञा आहे. मलिनीकरणात् मलः|)
धातु आणि पंचमहाभूते यांचा संबंध पुढेल प्रमाणे स्पष्ट करता येतो-

वात = आकाश + वाय वायु, पित्त = अग्न आणि कफ = जल + पृथ्वी.

‘साम्यं प्रकृतिरुच्यते। धातूसाम्याला प्रकृती असे म्हणतात, धातूसाम्य असल्यान शरीर निरोगी राहते. धातूवैषम्य उत्पन्न झाल्यास ते विकृत होते. धातूवैषम्याकरता असात्मिन्द्रियार्थसंयोग (नेहमीच्या सवयीचे नसलेले आहार-विहार), प्रज्ञापराध (जाणून बुजून आपल्या मानसिक मानास भावनेच्या विरुद्ध वर्तन) आणि परिणाम( ऋतु, रात्र, दिवस यातील शीतोष्णादि फरक) हे घटक कारणीभूत ठरतात. हा आयुर्वेदातील चिकित्सेचा पाया आहे.
आहारविहाराला ही आयुर्वेदात फार महत्त्व दिलेले आहे. आहारविहार योग्य तऱ्हेने सांभाळला, तर औषधाची गरजच उरणार नाही, असे चरकसंहितेत म्हटले आहे; कारण आहारविहारातील प्रमादामुळेच मुख्यतः व्याधींचा उद्‌भव होतो. म्हणून आहारविहाराच्या माध्यमातूनच व्याधींचा प्रतिबंध केला पाहिजे, असे आयुर्वेद सांगतो. ‘आहारशुद्‌धौ वित्तशुद्धि’ या वचनाप्रमाने मानसिक आरोग्यही आहारविहारावर अवलंबून असते हे त्यात स्पष्ट केले आहे.

याबरोबरच नाडीविज्ञान (मनुष्याची नाडी पाहून त्याच्या रोगाचा पूर्वेतिहास, त्याची सद्यस्थिती यांची परीक्षा करणे), पशु व वृक्ष आयुर्वेद, Pharmacognosy म्हणजे वृक्षाच्या विविध भागांपासून औषधांची निर्मिती अशा विविध शाखांचा स्वतंत्रपणे विकास सुरू आहे. व्यायाम आणि आयुर्वेद, योग आणि आयुर्वेद यांचाही विशेष अभ्यास सुरु आहे. दक्षिण-पश्चिम भारतसमुद्र‌किनाऱ्यावरील केरळ हे तर आयुर्वेदातील प्रगतीकरता विशेष प्रसि‌द्ध आहे. दक्षिण केरळ आणि उत्तर केरळ प्रांतात नैसर्गिक साधनसंपत्तीच्या सुबत्तेमुळे आयुर्वेदातील विविध तंत्रांचा विशेष विकास होत आहे.
सध्याच्या धकाधकीच्या आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव, अनियमित आहार आणि झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशा वेळी आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान — निसर्गाशी सुसंगत राहणे, संतुलित आहार घेणे आणि मन-शरीराचा समतोल राखणे — अत्यंत उपयुक्त ठरते. आजीच्या बटव्यातील अनेक घरगुती उपाय आज विज्ञानाच्या कसोटीवरही उतरत आहेत. हळदीतील कर्क्युमिनचे दाहशामक व अँटिऑक्सिडंट गुणधर्म जगभरातील हजारो संशोधनांतून सिद्ध झाले असून, आधुनिक औषधांतही त्याचा वापर होतो. अश्वगंधा ताणतणाव व कॉर्टिसॉल कमी करत असल्याचे क्लिनिकल अभ्यास सांगतात, तर योग-प्राणायामाचे हृदय व मनःस्वास्थ्यावरील फायदे वैद्यकीय जगतानेही मान्य केले आहेत. ताणतणाव व्यवस्थापनासाठी देखील श्वास-मन संतुलनाचा संबंध आज मान्य झाला आहे. त्रिफळा आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते, हेही संशोधनातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, आयुर्वेदातील “वेळेवर व मर्यादित आहार” ही संकल्पना आज “इंटरमिटंट फास्टिंग” या नावाने जगभर लोकप्रिय झाली आहे. थोडक्यात, आजीचे शहाणपण आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील हे नाते दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालले आहे.
आयुर्वेद शास्त्राची तसेच वैद्यकीय ज्ञानाची काही क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊनही काही साध्या आणि गंभीर आजाराची कारणे व चिकित्सा अद्यापही गूढ राहिल्यामुळे परदेशातीलही अनेक शास्त्रज्ञ व वैद्यकीय व्यावसायिक आयुर्वेदाकडे आकृष्ट झाले आहेत. म्हणूनच जगभरात योग आणि आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून, अनेक देशांमध्ये याला “पर्यायी चिकित्सा” म्हणून मान्यता मिळत आहे. त्यामुळे युरोप, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये गेल्या दशकान स्थापन झालेल्या अनेक संस्था त्या त्या देशांत आयुर्वेदाचा जोमाने प्रचार करत आहेत. भारत सरकारनेही आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

मुळात आयुर्वेद फक्त आजारी किंवा रोगी व्यक्तीला बरे करणे इतक्या मर्यादित हेतूनेच या ज्ञानाकडे पाहत नाही. अधिकाधिक संतुलित आणि विकरराहित जीवनमान कसे मिळवावे आणि त्यायोगे आपल्या आजूबाजूच्या परीसराशी आणि सृष्टीशी संतुलन साधत निसर्ग तत्वाच्या अधिकाधिक जवळ जात परिपूर्ण व शांत जीवन कसे जगावे हे त्याचे अंतिम उद्दिष्ट आहे. केवळ शरीरच नव्हे तर मन बुद्धी आणि त्यायोगे आत्म्याचा विकास व उन्नती साधत मानवाने स्थिर आयुष्य मिळवावे हा विचार आयुर्वेदाचा गाभा आहे, म्हणूनच अन्य कोणत्याही वैद्यकशाखेपेक्षा तो वेगळा आणि सर्वांग परिपूर्ण ठरतो. आज, वैद्यांच्या योग्य सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच आयुर्वेदाच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास आरोग्यदायी आणि संतुलित जीवन जगणे सहज शक्य आहे. आयुर्वेदाची सर्वसमावेशक दृष्टी, निसर्गाशी समतोल साधणारी चिकित्सा आणि अन्य आधुनिक वैद्यकशास्त्रे यांचा संयोग ही मानवजातीच्या दृष्टीने एक अपूर्व देणगी ठरत आहे.

-मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख