प्रस्तावना
सुपरमार्केटच्या झगमगत्या रॅकवर किंवा क्विक-कॉमर्स अॅपच्या स्क्रीनवर आज आपण जेव्हा एखादे बिस्कीट, ब्रेड, ब्रेकफास्ट सिरीअल किंवा स्नॅक्सचे पाकीट निवडतो, तेव्हा आपल्याला समोर मोठ्या आणि आकर्षक अक्षरांत ‘१००% आटा’, ‘झिरो मैदा’, ‘हाय फायबर’, ‘रिअल फ्रूट’ किंवा ‘बेक्ड’ असे आश्वासक दावे दिसतात. आरोग्याची काळजी घेणारा मध्यमवर्गीय ग्राहक हे शब्द वाचून समाधानाने ते पाकीट खरेदी करतो. मात्र, त्याच पाकिटाच्या मागील बाजूला भिंग लावून वाचावे लागेल इतक्या बारीक अक्षरांत साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि मिठाचे धोकादायक प्रमाण लपवलेले असते.
खाद्यपदार्थ कंपन्यांच्या या मार्केटिंगच्या जाळ्याला आता सर्वोच्च न्यायालयाने थेट वेसण घातली आहे. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी खंडपीठाने भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या दर्शनी भागावर स्वतंत्र लाल षटकोन छापणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे भारतातील कोट्यवधी ग्राहकांना आरोग्याचे नवे सुरक्षाकवच मिळणार आहे; तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या अन्न उद्योगाच्या अर्थकारणापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नेमका काय आहे?
‘3S अँड अवर हेल्थ सोसायटी’ या संस्थेने २०२४ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अन्नपदार्थांवरील स्पष्ट माहितीला थेट संविधानाच्या कलम २१ (जगण्याचा व आरोग्याचा मूलभूत अधिकार) अंतर्गत स्थान दिले आहे.
- एखाद्या पदार्थात साखर, मीठ किंवा सॅच्युरेटेड फॅट यांपैकी एक जरी घटक मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा तिन्ही घटक जास्त असल्यास एकत्रित नाही, तर तीन स्वतंत्र लाल षटकोन (High Sugar, High Fat, High Salt) छापणे बंधनकारक असेल.
- प्रत्येक षटकोनात मजकुरासोबत प्रमाणित चित्ररूपी चिन्ह असेल, जेणेकरून इंग्रजी न येणाऱ्या सामान्य ग्राहकालाही धोका एका नजरेत समजेल.
- प्रत्येक षटकोनाने पाकिटाच्या मुख्य दर्शनी भागाची किमान ४ ते ५ टक्के जागा व्यापणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे, तर ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स अॅप्सवरील लहान चित्रांतही हे इशारे स्पष्ट दिसले पाहिजेत.
- केवळ वरून टाकलेली साखर न मोजता पदार्थातील एकूण साखर आणि सॅच्युरेटेड फॅट विचारात घेऊन मर्यादा ठरवाव्यात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
कंपन्यांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम सकारात्मकच!
भारतातील पाकिटबंद खाद्यपदार्थांची बाजारपेठ झपाट्याने वाढत असून, २०२० मधील ९५.४५ अब्ज डॉलरवरून ती २०२६ मध्ये सुमारे ११.५ लाख कोटी रुपयांहून अधिक इतकी प्रचंड झाली आहे. इतक्या मोठ्या बाजारपेठेत ‘लाल षटकोना’ची सक्ती लागू झाल्यावर कंपन्यांच्या व्यवसायावर आणि नफ्याच्या गणितावर अनेक पातळ्यांवर थेट परिणाम होणार आहेत:
१. ‘हेल्थ हॅलो’ चा फुगा फुटणार
अनेक कंपन्या ‘झिरो मैदा’, ‘१००% आटा’, ‘मल्टीग्रेन’, ‘एनर्जी बार’ किंवा ‘हेल्थ ड्रिंक’ या नावाखाली चढ्या किमतीने उत्पादने विकतात. मात्र, या उत्पादनांमध्ये साखर आणि पाम ऑईल भरपूर असते. जगभरातील अभ्यासांनुसार—विशेषतः चिलीमध्ये २०१६ मध्ये असे इशारा लेबल लागू केल्यानंतर—ज्या उत्पादनांची प्रतिमा ‘पौष्टिक’ अशी बनवली होती, त्यांच्या मागणीत सर्वाधिक तीव्र घट नोंदवली गेली. लाल रंग हा जगभरात धोक्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे ग्राहकाला समोरच लाल रंगाचा धोक्याचा षटकोन दिसताच ग्रामीण भागातील नागरिक, इंग्रजी न येणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही एका सेकंदात कोणते पाकीट टाळायचे हे ठरवू शकतील.
२. पॅकेजिंग डिझाइन, छपाई आणि इन्व्हेंटरीचा प्रचंड खर्च
जर एखाद्या उत्पादनात साखर, फॅट आणि मीठ तिन्ही जास्त असतील, तर पाकिटाच्या पुढील भागाची १२ ते १५ टक्के जागा केवळ लाल षटकोन व्यापतील. यामुळे कंपन्यांना आपली संपूर्ण ब्रँडिंग, आकर्षक ग्राफिक्स, सेलिब्रिटींचे फोटो आणि छपाईचे सिलिंडर्स नव्याने तयार करावे लागतील. विशेषतः भारतात ग्रामीण व निमशहरी भागात मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या ५ आणि १० रुपयांच्या छोट्या पाकिटांवर इतकी जागा देणे डिझाइन आणि खर्चाच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरेल. तसेच संक्रमण काळात जुन्या पॅकेजिंगचा साठा निकाली काढताना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
३. रेसिपी बदलाचा खर्च
लाल षटकोन टाळण्यासाठी कंपन्यांना आपल्या उत्पादनांतील साखर, मीठ आणि स्वस्त पाम ऑईलचे प्रमाण कमी करावे लागेल. मात्र, साखर आणि पाम ऑईल हे केवळ चवीसाठीच नव्हे, तर पदार्थाचा पोत, खुसखुशीतपणा आणि टिकवणक्षमता वाढवण्यासाठी वापरले जातात. त्यांच्या जागी आरोग्यदायी पर्याय वापरण्यासाठी संशोधन व विकासावर (R&D) मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि कच्च्या मालाची किंमत वाढेल. मात्र न्यायमूर्ती पारडीवाला यांनी नोंदवलेले निरीक्षण आहे की,“केवळ शब्दांतील लेबल ग्राहकांचे दोन वर्ग निर्माण करते—ज्यांना ही माहिती समजते ते आणि ज्यांना समजत नाही ते”. त्यांना अधिक आरोग्यदायी पर्याय निवडणे सोपे जाणार आहे.
लघु आणि मध्यम अन्न उद्योगांपुढील आव्हान
बहुराष्ट्रीय आणि बड्या भारतीय कंपन्यांकडे संशोधन प्रयोगशाळा, आर्थिक बळ आणि तज्ज्ञ डिझायनर्स उपलब्ध आहेत. परंतु भारतातील हजारो स्थानिक फरसाण, नमकीन, बेकरी, चिक्की आणि मिठाई उत्पादक (MSMEs) यांच्यासाठी प्रयोगशाळेतील अचूक चाचण्या करणे, सातत्याने रेसिपी सुधारणे आणि नवे पॅकेजिंग करणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत जड जाऊ शकते. परंतु यापेक्षा अधिक गंभीर म्हणजे भारतात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांनी भयावह रूप धारण केले आहे.
पुढची दिशा
सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला पुढील १० आठवड्यांत मसुद्याच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, अंमलबजावणीत कोणतीही अनावश्यक दिरंगाई न करण्याचा इशारा दिला आहे. अल्पकाळात हा निर्णय पॅकेज्ड फूड कंपन्यांसाठी खर्चीक आणि वेदनादायक ठरू शकतो. मात्र,दीर्घकाळात जे प्रामाणिक भारतीय ब्रँड्स आणि स्टार्टअप्स खरोखरच कमी साखर, कमी मीठ आणि नैसर्गिक घटकांपासून उत्पादने बनवतील,त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी असेल. कारण ज्या देशातील नागरिक सर्वाधिक आरोग्यदायी असतील, त्या देशाच्या आरोग्यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचेल—कारण तोच निरोगी समाज कोणत्याही अर्थव्यवस्थेचा खरा कणा असतो.