मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी ‘पाच’ थेट प्रश्न विचारत, विधिमंडळातील ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले आहे.
‘विरोधी पक्षनेतेपद द्या’, पण साडेतीन वर्षे तुम्ही कुठे होता?
उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे जोरदार टीका केली आहे.
उपाध्ये म्हणतात, “उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधी पक्षनेतेपद द्या… पण प्रश्न असा— विधिमंडळातील विरोधी पक्षात बसून गेले साडेतीन वर्ष ते नेमकं कुठे होते?”
भाजपचे ‘ते’ ५ थेट आणि धारदार प्रश्न
केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत पुढील पाच गंभीर प्रश्न उपस्थित केले:
- या अधिवेशनात तरी उद्धव ठाकरे पूर्ण काळ उपस्थित राहणार का?
- यापूर्वीच्या विधिमंडळ अधिवेशनांत ते किती दिवस उपस्थित राहीले?
- विधिमंडळात किती वेळा प्रश्न लावून धरले?
- किती वेळा राज्याच्या जनतेसाठी लक्षवेधी मांडल्या?
- वैधानिक आयुधे वापरून किती जोरदार मांडणी केली?
‘ना काम, ना लढा, नुसतीच भाषणांची हवा!’
या पाचही प्रश्नांची उत्तरे उपाध्ये यांनी अत्यंत कठोर शब्दांत दिली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या सर्व प्रश्नांची उत्तरे एकच आहेत:
‘ना काम, ना लढा, ना मुद्दा नुसतीच भाषणांची हवा आणि कॅमेऱ्यासमोरची अदा!’
भाजपच्या या थेट हल्ल्यामुळे आगामी विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. आता उद्धव ठाकरे या आरोपांवर काय प्रत्युत्तर देतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.