मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे.
‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’
संजय राऊत यांच्या विधानांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हणत शेलार यांनी त्यांच्या राज ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. शेलार म्हणाले, “संजय राऊत तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आलात, अनिल परब यांना सोबत घेऊन फुगडीही घातलीत, पण तिथला ‘चाफा ना डोलेना, ना बोलेना’ अशी तुमची अवस्था झाली आहे. वारंवार शिवतीर्थाच्या पायऱ्या झिजवण्यामागे तुमचा नेमका हेतू काय? ही मनधरणी सुरू आहे की पायधरणी, हे एकदा स्पष्ट करा.”
उद्धव ठाकरेंच्या ‘अकड’वर प्रश्नचिन्ह
मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवरही शेलार यांनी टीकास्त्र सोडले. “जेव्हा शिवसेना भाजपसोबत युतीत होती, तेव्हा चर्चेसाठी नेत्यांना मातोश्रीवर बोलावले जात असे. तिथे एक वेगळीच अकड असायची. मात्र, आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंची ती अकड कुठे गेली?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.