Thursday, December 11, 2025

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड

Share

कालीमाता ही संपूर्ण विश्वाची जननी—ही हिंदूंची प्राचीन आणि अखंड श्रद्धा. तिची उपासना कोणालाही करता यावी, संतांच्या वचनानुसार प्रत्येकाला मार्ग मोकळा असावा, याला कोणीही विरोध करणार नाही. परंतु उपासनेच्या नावाखाली देवीचे ‘अपहरण’ करून तिचे रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे हा सरळसरळ उच्छादच. चेंबूरमध्ये काही संशयित क्रिप्टो-ख्रिस्ती आणि मिशनरी प्रवृत्तीच्या लोकांनी असा प्रयत्न केला; परंतु स्थानिक हिंदू संघटना सतर्क असल्यामुळे हे कारस्थान क्षणार्धात उधळले गेले.

हिंदू प्रतीकांशी साधर्म्य दाखवणे, लोकांना सांस्कृतिक स्वीकाराकडे ढकलणे, नंतर त्याच प्रतीकांच्या नावाने भीती निर्माण करणे आणि अखेर धर्मांतर घडवून आणणे—ही मिशनरींची जुनी, रचनाबद्ध आणि योजनापूर्ण पद्धत. विशेषतः जनजाती भागांत अशा फसवणूक-आधारित धर्मांतरामुळे लोकसंख्येचे संतुलन गंभीरपणे ढासळत आहे.

याहून धोकादायक बाब म्हणजे स्वतःला ‘सेक्युलर’ म्हणून घोषित करणाऱ्या काही राजकीय शक्तींचे या कारवायांना मिळणारे सूक्ष्म, परंतु प्रभावी समर्थन. मतपेटीच्या राजनीतीपोटी या शक्ती हिंदू हितविरोधी भूमिका घेतात आणि त्यामुळे मिशनऱ्यांना सहाय्यक वातावरण उपलब्ध होते. म्हणूनच राज्यातील महायुती सरकार कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे.

तथापि, फक्त कायदा करून प्रश्न सुटत नाही. अशा कारवाया रोखण्यासाठी समाजाने सावध आणि एकसंध राहणे, तसेच स्थानिक ते केंद्र शासनपर्यंत धर्माचा आदर करणाऱ्या नेतृत्वालाच साथ देणे अत्यावश्यक आहे.

पुजाऱ्याचा ‘स्वप्नात देवी दिसल्याचा’ दावा

रविवारी दर्शनाला आलेल्या भाविकांना कालीमातेच्या विग्रहावर मदर मेरीसारखे अलंकरण दिसताच धक्काच बसला. त्यांनी लगेचच पूजाऱ्याकडे चौकशी केली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पूजाऱ्याने ‘कालीमातेने स्वप्नात येऊन मला असे सजवण्याची आज्ञा केली’ असा दावा केला. परंतु हे स्पष्टीकरण लोकांना अजिबात पटले नाही; संताप वाढला आणि तक्रार हिंदू संघटनांकडे पोहोचली.

सुदैवाने या भागातील हिंदू संघटना सजग आणि कार्यरत आहेत. तसेच हा प्रभाग भाजपा-प्रणित महायुतीचा प्रभावक्षेत्र असल्याने कार्यकर्त्यांनी तातडीने मंदिरात धाव घेऊन, सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांना पाचारण केले.

यानंतर ‘रमेश’ असे नाव सांगणाऱ्या पुजाऱ्याला आरसीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले. भारतीय दंड संहिता कलम २९५अ अंतर्गत—धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यासाठी—त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत: तो छद्म-ख्रिस्ती आहे का? मिशनऱ्यांकडून किंवा इतरांकडून त्याला पैसे मिळाले काय? त्याने हे कृत्य भय, लालूच किंवा दबावाखाली केले काय?

चेंबूरमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांची वाढती सक्रियता

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, चेंबूरमध्ये ख्रिस्ती पंथीयांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली आहे. मिशनरी संस्था आर्थिक मदतीच्या आधारावर धर्मप्रसार करत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यांच्या एजंटकडून घरोघरी जाऊन धर्मांतराचे ‘प्रोत्साहन’ देण्यात येते. या धर्मप्रसारकांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असून त्या तपकिरी साड्या नेसून वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये फिरताना दिसतात—चेंबूर कॅम्प, वाशीनाका, भारतनगर अशा भागांत ही चळवळ सक्रिय असल्याचे सांगितले जाते.

या परिसरात अनेक समाजसेवी संस्था असून त्यांना ऑस्ट्रेलिया, अमेरिका आदी देशांतून निधी मिळत असल्याचा आरोपही स्थानिक करतात. वाचनगटांच्या नावाखाली काही सुशिक्षित महिलांकडून मार्क्सवादी लेखकांच्या पुस्तकांवर चर्चा घडवून हिंदू धारणांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला जातो, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.

हिंदू देवतांची विटंबना—मिशनरींची जुनी कार्यपद्धती

मिशनरी प्रथम भारतात आले तेव्हा येथे हिंदू धर्माची मुळे अत्यंत खोल आणि सुदृढ असल्याचे त्यांना स्पष्टपणे दिसले. दशकानुदशके प्रयत्न करूनही फार थोडेच लोक धर्मांतरित होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘धर्मसंस्कृतीकरण’ (inculturation) ही युक्ती अवलंबली—हिंदूंच्या प्रथा, परंपरा, प्रतीके आणि भावनांचा वापर करून ख्रिस्ती प्रसार करणे.

भगवे कपडे धरणे, बायबलला ‘येशुवैद’ म्हणणे, येशूची आरती, ‘सत्य येशू पूजा’ अशा पद्धतींनी साध्या, अनभिज्ञ हिंदूंना धर्मांतराच्या दिशेने वळवणे ही याच रणनीतीची उदाहरणे आहेत.

कालीमातेला मदर मेरीच्या रूपात सादर करण्याचा प्रयत्नही त्याच पद्धतीचा भाग—कालीभक्तांना गोंधळवून ख्रिस्ती धारणांचा स्वीकार करवून घेण्याचा स्पष्ट प्रयत्न. अशी बुद्धीभेदाची प्रक्रिया किती खोलवर चालते याची कल्पना ही घटना देऊन जाते.

मुंबईतील चर्चची वाढती संख्या

विकिपीडिया, चर्चच्या अधिकृत वेबसाइट्स आणि इतर विश्वसनीय स्रोतांवरून संकलित माहितीनुसार—मुंबईतील चर्चांची संख्या २०२३ च्या तुलनेत ६.७९% ने वाढली असून २०२५ मध्ये ती ७९६ इतकी झाली आहे. त्यासोबतच ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या ५% च्या पुढे गेली आहे.

धर्मांतरविरोधी कायदा—काळाची गरज

फसवणूक, जोरजबरदस्ती किंवा लोभ दाखवून होणाऱ्या धर्मांतरामुळे राज्यातील अनेक भागांत—विशेषतः जनजाती बहुल भागांत—लोकसंख्येचे संतुलन बिघडत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा कारवायांमुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होत आहेत. म्हणूनच सध्या सत्तेत असलेली भाजपा-प्रणित महायुती फसवणूक-आधारित धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा आणण्याच्या तयारीत आहे. हिवाळी अधिवेशनात यासंबंधी विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.

परंतु, कायदा करूनच प्रश्न मिटत नाही. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी दृढ राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असते—आणि ती इच्छाशक्ती जनतेच्या स्पष्ट आणि सक्रिय समर्थनावरच उभी राहते. धर्मांध शक्तींच्या कारवाया रोखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी, धर्माचा आदर करणाऱ्या नेतृत्वालाच स्थानिक ते केंद्र अशा सर्व स्तरांवर निवडून देणे गरजेचे आहे.

चेंबूरमधील घटनेतून धडा घेता येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांनी सजग राहून भाजपा-प्रणित हिंदुत्ववादी, रादष्ट्रीय विचारांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत देणे ही काळाची गरज बनली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख