Monday, December 2, 2024

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प

Share

जळगाव : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी येथे व्यक्त केला. तसेच, महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा संकल्प यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, यात राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेवून लघु उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात 25 हजार स्वयंसहायता गटांना 30 कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख