Monday, November 24, 2025

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले

Share

मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सपकाळ यांनी फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि “महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा” असे अपमानजनक अपशब्द वापरले होते. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळ यांच्या ‘गांधीवादा’वर थेट आणि बोचरी टीका करणारे ट्विट केले आहे. त्यांनी सपकाळ यांचा गांधीवाद हा ‘महात्मा गांधीवादी’ नसून ‘राहुल गांधीवादी’ असल्याचा आरोप केला.

उपाध्ये यांचे ट्विट: गांधीवादाचे पितळ उघडे
केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला.

“हर्षवर्धन सपकाळ हे गांधीवादी असल्याचा गवगवा खूप झाला होता. जी भाषा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरली, ती पाहता त्यांच्या या गांधीवादाचे पितळ उघडे पडते. बरोबर आहे! सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत!”

उपाध्ये यांनी महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञान आणि राहुल गांधींच्या सध्याच्या कार्यशैलीची तुलना करत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली

महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा व प्रेमाचा आग्रह धरला होता. सत्तेसाठी हपापलेले राहुल गांधी सत्याऐवजी असत्याचा आग्रह धरतात, वारंवार खोटं बोलतात, त्यासाठी न्यायालयाची माफीही मागतात!!

अहिंसा हा महात्मा गांधीचा आग्रह होता, इथे राहूल गांधी नेपाळसारखा हिंसाचार भारतात सुध्दा होईल असे सांगत लोकशाहीतील महत्त्वाच्या सर्व संविधानिक संस्थांवर खोटे आरोप करीत अराजकता निर्माण करायचा प्रयत्न करतात.

महात्मा गांधी प्रेमाने मने जिंकण्याची शिकवण देत, तर ‘मोहब्तत की दुकान’ मधून राहूल गांधी द्वेषाचे कारखानेच चालवतात. यातूनच ‘मौत का सौदागर’, ‘चौकीदार चोर है’ आणि आता सपकाळ यांचे फडणवीसांबद्दलचे ‘दरिंदा’ हे विधान अशी मुक्ताफळे बाहेर पडत असल्याचे म्हटले आहे.

सपकाळ यांच्या या अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून, भाजपने काँग्रेसला त्यांच्या भाषेच्या आणि मूल्यांच्या आधारावर घेरण्याची रणनीती अवलंबल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख