Friday, December 5, 2025

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीला ‘दक्षता’चे पाऊल! महसूल विभागात पारदर्शकतेसाठी ‘दक्षता पथके’

Share

मुंबई : महायुती सरकारने आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात पारदर्शक आणि जनताकेंद्रित कारभारासाठी एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे.

विभागीय स्तरावर ‘दक्षता पथके’

महसूल विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध येणाऱ्या तक्रारींची प्रभावी आणि जलद चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर ‘दक्षता पथके’ स्थापन करण्यात येत आहेत. ही पथके प्रामुख्याने गौण खनिज (वाळू/माती), जमीन, मुद्रांक, जमीन मोजणी आणि संबंधित कामांमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करतील.

हे पथक आलेल्या प्रत्येक तक्रारीची ३० दिवसांच्या आत आणि अत्यंत गंभीर तक्रारींची १५ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून अहवाल सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करेन.

या विभागीय दक्षता पथकांच्या कामकाजाचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी आणि आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी राज्यस्तरावर एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीचे अध्यक्षपद महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असेल.

मागच्या वर्षी, ५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने महसूल विभागाने घेतलेला हा निर्णय पारदर्शी आणि गतिमान प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख