लातूर : “२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना ग्वाही दिली. श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर, आई गंजगोलाई आणि माता भवानीच्या चरणी नतमस्तक होत नेतृत्व घडवणाऱ्या लातूर भूमीला वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ लातूरकरांना संबोधित केले. यावेळी लातूरच्या सर्वांगीण आणि आधुनिक विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेशअप्पा कराड यांसह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
लातूरच्या पाणीप्रश्नावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार आणि धनेगाव-हरणगाव नवीन पाईपलाईनद्वारे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला जाईल
पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी
लातूरच्या विकासासाठी पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते, भूयारी गटारे, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, अत्याधुनिक रुग्णालय, पीएम ई-बस सेवा, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फूट उंच पुतळा, आधुनिक नाट्यगृह तसेच पुरापासून संरक्षणासाठी भिंत उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
घर, रोजगार आणि उद्योगांना चालना
येत्या काळात लातूरमधील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन आवास योजनेतून पक्की घरे उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच लातूरला मंजूर झालेल्या रेल्वे कोच फॅक्टरीमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.
लातूरला औद्योगिक जिल्हा बनवण्यासाठी लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लातूरपासून जेएनपीटी व वाढवण बंदरापर्यंतचे अंतर कमी होईल आणि उद्योगांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“लातूरचा विकास हेच माझे ध्येय आहे. यासाठी येत्या १५ तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढील पाच वर्षे लातूरची काळजी आम्ही घेऊ,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना केले.